नाशिक जिल्हा

नासिक कलेक्टरेट आणि नासिक जिल्ह्याला 26 जुलै रोजी 155 वर्ष पूर्ण



नासिक हे मौर्य, सातवाहन, यादव, मोगल, मराठे ,निजाम आणि उत्तर मराठीशाहीतील पेशवे यांच्या कारकिर्दी मधील एक महत्त्वाचे शहर म्हणून नेहमीच गणले जात असे. नाशिक म्हणजे नाशक आणि खानदेशाला आशक असे हे नाव असल्याचे दिसून येते. प्रचंड मोठ्या डोंगराळ भाग आणि लांबवर पसरलेल्या कुरणांमुळे इतिहासामध्ये मोठमोठ्या लढाया या भागात झाल्याचे दिसून येते.

सुंदर वातावरणामुळे मोगलांनी याचे नाव गुलशनाबाद ठेवले होते.

1751 मधील भालकीच्या तहामधे नाशिक निजामाने मराठ्यांना द्यायचे ठरले होते मात्र  ते हातात येत नव्हते, मधल्या काळात नानासाहेब पेशव्यांने चातुर्याने निजामाकडून नाशिकचा ताबा मिळवला. नाशिक ही पेशव्यांची उपराजधानी होती तर त्र्यंबकेश्वर चा किल्ला हे प्रमुख संरक्षक ठाणे होते. नासिकला नाशिक हे नाव या काळातच मिळाले.

ज्याच्या ताब्यात त्रंबकेश्वरचा किल्ला तो नाशिकचा मालक असा काहीसा समज त्या काळात होता. दुसरा बाजीराव पळपुटा हा पुण्याजवळील खडकीचे युद्ध हरल्यानंतर अठराशे अठरा साली इंग्रजांनी विना प्रतिकार नाशिक शहर जिंकून घेतले. कारण पेशव्यांचे सशस्त्र सैनिक हे सर्व त्र्यंबकेश्वरला आराम करण्यासाठी गेले होते.

इंग्रजांनी शहर ताब्यात घेतल्या वरती आपल्या पद्धतीने शहरात सुधारणा करण्यास सुरुवात केली.

जुन्या काळी नाशिक हे पंचवटी , सध्याचा मेन रोड पुरतेच मर्यादित होते . एक गलिच्छ, घाणेरडे, धार्मिक ठिकाण जेथे वारंवार साथीचे व रोग येत असत असा नाशिकचा नावलौकिक होता व तो मिटवायचा इंग्रजांनी बराच प्रयत्न केल्याचे दिसून येते.  चांगल्या हवामानामुळे इंग्रजांनी नाशिकला देशाची राजधानी बनवायचा हे प्रयत्न केला मात्र तो सफल न झाल्याने तोफखाना केंद्र ,गोल्फ क्लब, डिस्टिलरी, नोट प्रेस इत्यादी महत्त्वाचे सरकारी उपक्रम नाशिकला आणायचा सफलता पूर्ण प्रयास केल्याचे दिसून येते.

तर माझ्याकडे उपलब्ध कागदपत्रांनुसार 1842 श्री बेल यांनी श्री आर डी लॉर्ड यांच्याकडून उपजिल्हाधिकारी या पदाचा ताब्यात असल्याचे दिसून येते. तर 1843 साली श्री टेलर अहमदनगर जिल्हाधिकारी यांचे दुय्यम सहाय्यक आणि न्यायाधीश होते त्यांची वणी- दिंडोरी तालुक्याला उपजिल्हाधिकारी म्हणजेच सब कलेक्टर म्हणून बदली झाल्याचे आणि नाशिक तालुक्यावरून कार्यमुक्त केल्याची नोंद आढळते.

1855 साली नाशिक शहरातून महु पर्यंत टेलिग्राफ म्हणजेच तारेची लाईन गेल्याचे दिसून येते, तर पुढील काही वर्षांमध्येच सातपुड्यापर्यंत जी रेल्वे लाईन टाकली गेली यामध्येही नाशिक वरून रेल्वे जाईल अशी व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून येते.

त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या नगपालिकां नंतर 1865 साली नाशिक म्युनिसिपालिटी म्हणजे नगर पालिका झाल्याचे दिसून येते. यामध्ये माझ्याकडे उपलब्ध कागदपत्रांनुसार श्री हॅवलोक यांचे आदेशाद्वारे 6 ऑगस्ट 1865  रोजी श्री करशेटजी नुसर्वाणजी हे नासिक म्युनिसिपल कमिशनर झाल्याचे दिसते ,मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की ते नाशिक शहराचे पोलीस इन्स्पेक्टर ही होते.

पण या आधी नासिक पेक्षाही अहमदनगर जिथे इंग्रजांचा महत्त्वाचा सैनिकीतळ होता तेथून नासिकचे कामकाज बघितले जायचे. थोडक्यात सांगायचे तर अहमदनगर हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण होते तर नासिक हा तालुका होता .

नासिक चा एकंदरीत पसारा वाढत असतानाच अहमदनगर वरून सर्व कार्यभार सांभाळणे अवघड जात असल्याने तत्कालीन मुंबई प्रांतामध्ये झालेल्या बैठकीनुसार दिनांक 10 जुलै 1869 रोजी भडोच ,कुलाबा, सोलापूर सोबतच नासिक हे स्वतंत्र कलेक्टरेट म्हणजे जिल्हा झाल्याचे जाहीर करण्यात आले , मात्र नाशिक कलेक्टरेट हे न्यायालयीन कक्षा ठाणे ( Tanna)  याच्याशी संलग्न असल्याचे दिसते. तर याच नोटिफिकेशन नुसार अकोला तालुका हा न्यायालयीन कामासाठी सिन्नरला जोडल्याचे व सिन्नर हे ठाणे न्यायक्षेत्राच्या अंतर्गत असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.

श्री आर सी ओवेन्स हे नाशिकचे पहिले जिल्हाधिकारी होते तर माझ्याकडे उपलब्ध कागदपत्रांनुसार श्री ए एच प्लंकेट, हुजूर डेप्युटी कलेक्टर यांनी 28 सप्टेंबर 1869 रोजी नाशिकचा कार्यभार सांभाळल्याचे दिसते.

लेफ्टनंट डब्ल्यू सी ब्लॅक हे सुपरन्युमरी असिस्टंट सुपरीटेंडंट नासिक रिव्हिजन सर्वे या पदावर दिनांक 18 नोव्हेंबर 1869 रोजी नियुक्त झाल्याचे दिसते

यानंतर 26 जुलै 1869 च्या शासन आदेशानुसार अहमदनगर आणि खानदेश जिल्ह्यांमधील काही तालुके नवीन झालेल्या नाशिक जिल्ह्यासाठी वर्ग करण्यात आले ते खालील प्रमाणे:-  नासिक, सिन्नर, इगतपुरा , दिंडोरी, चांदोर ,निफाड, सावरगाव, अकोला आणि पेठ हे अहमदनगर मधील तालुके नाशिक तालुक्याला जोडण्यात आले. तर मालेगाव ,नांदगाव आणि बागलाण हे खानदेश मधील तालुके नाशिक कडे वळवण्यात आले.

एक लक्षात घ्या की पूर्वी त्रंबकेश्वर तालुका नव्हता,1996 मधे इगतपुरी आणि नाशिक तालुक्यातील काही भाग एकत्र करून त्रंबकेश्वर तालुका बनवण्यात आला. येवला इंग्रज काळात कधीतरी नंतर जोडण्यात आला , तर सावरगाव (गंगापूर धरणा जवळील जमिनीच्या गैरव्यवहारांसाठी प्रसिद्ध असलेले ) हे महत्त्वाचे गाव असल्याने त्याला पहिले तालुका बनवण्यात आले होते मात्र नंतर त्याचा तालुक्याचा हुद्दा काढून घेण्यात आला. बरीच वर्ष सांभाळ केल्यानंतर अकोला तालुका परत नगर जिल्ह्यास जोडण्यात आला. सुरगाणा हे राजे पवार देशमुख यांचे स्वतंत्र संस्थांनं होते जे 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर नाशिकचा एक तालुका म्हणून जोडले गेले

तत्कालीन कागदपत्रांनुसार नाशिकचे स्पेलिंग हे Nassick असे लिहिले जात असे. प्रत्येक इंग्रज अधिकारी आपल्या उच्चारानुसार व सोयीनुसार लोकांची आणि गावांची नावे लिहीत असत यामुळे फार गोंधळ उडत असल्याने 20 मार्च 1879 रोजी मुंबई प्रांतातील सर्व गावांची नावे ही आदेश जारी करून नक्की करण्यात आली व यामध्ये Nassick  हे Nasik झाले.

अशा पद्धतीने 26 जुलै 1869 च्या शासन आदेशानुसार नाशिक जिल्ह्याच्या स्थापनेचा श्री गणेशा झाला.

अंबरीश मोरे
नाशिक

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.