लेखक - अब्दुल्ला खान
अनुवाद - उल्का राऊत
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस
बिहार राज्यातील चंपारण जिल्ह्यातील एक गाव मोतीहारी.
जिथून गांधीजींनी पहिल्यांदा सत्याग्रहाची वाट चालायला सुरुवात केली होती आणि जिथे जॉर्ज ऑर्वेलचा जन्म झाला होता. सत्य आणि काल्पनिकतेचे मिश्रण असलेलं उत्कंठावर्धक कथानक.
अस्लमचा जन्म मोतिहारी गावात एका पडीक बंगल्यात झाला होता. त्याचे कुटुंब शेजारच्या गावातून परतत असतांना वाटेतच त्याच्या गर्भवती आईच्या पोटात कळा यायला सुरुवात झाल्याने नाईलाजाने थांबावं लागलं होतं. तिथे पांढरे कपडे घातलेली स्वत:ला सुईण म्हणवून घेणाऱ्या वृध्द स्रीच्या सुचनेनुसार सगळं उरकल्यावर दुपट्यात गुंडाळलेल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला म्हणजेच अस्लमला घेऊन सगळे लागोलाग घरी आले होते. कारण ती वृध्द स्री म्हणजे भूत होती असं काहींच म्हणणं होतं.
पुढे समज आल्यावर आपल्या जन्माची ही सनसनाटी कहाणी वारंवार ऐकून अस्लमला त्या स्रीला भेटण्याची इच्छा होत होती. म्हणून एकदा शाळा चुकवून तो गावाबाहेर असलेल्या त्या बंगल्यात जाऊन आला होता. तिथे ती स्त्री काही भेटली नाही. आता त्या बंगल्यात खुपच पडझड झाली होती. नंतर त्याला एका मित्राने माहिती दिली की, सुप्रसिद्ध लेखक जाॅर्ज ऑर्वेल चा जन्म सुध्दा त्याच बंगल्यात झाला होता. या योगायोगाने आश्चर्यचकित झालेल्या अस्लमला आपणही लेखक होऊन जागतिक पातळीवर नाव कमवावं असं वाटू लागलं.. अशा अस्लमच्या आयुष्याची ही उत्कंठावर्धक कथा. मोतिहारीपासून सुरु भारतातल्या अनेक शहरात फिरून अमेरिकेत जाऊन परत भारतात, मोतीहारीला येणारी.
शाळेत असतांना बोर्डाच्या परिक्षेची तयारी करतांना लोक राममंदिराची चर्चा करू लागले. डोक्याला भगव्या कापडाच्या पट्या बांधलेल्या लोकांच्या मिरवणुका निघायला लागल्या. तेव्हा एकदा अस्लमच्या वस्तीवर रात्री दगडफेक झाली होती. तेव्हापासून त्याचे काही जीवलग मित्र त्याला टाळू लागले. याचं कारण समजायला थोडा वेळ लागला. पण जेव्हा तो बॅंकेत नौकरीला लागला. प्रशिक्षणासाठी अहमदाबादला होता तेव्हा उसळलेल्या जातीय दंगलीत त्याच्या अरविंद नावाच्या मित्राला जाळून मारलं कारण त्याने भगवे झेंडे फडकावत मोठमोठ्या घोषणा देणाऱ्या जमावासमोर कपडे उतरवण्यास नकार दिला होता.
पुढे अस्लमची मुंबईत बदली झाली तेव्हा लोकलमध्ये झालेले बाॅम्बस्फोट, नंतर दहशतवादी हल्ला यामुळे त्याचे सहकारी त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने बघायचे याचं त्याला खूप वाईट वाटायचं.
या दरम्यान तो नौकरी संभाळून वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतून लेख लिहित होता. पत्रकार म्हणून त्याला मान्यता मिळू लागली. जेसिका ही मुळची इंग्लिश असलेली एक अभिनेत्री काही हिंदी सिनेमात काम केलेली तिची मुलाखत घेण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली तेव्हा ती पुर्वी पाॅर्नस्टार होती हे समजल्यावर तो खूप गोंधळून गेला होता. तिला भेटल्यावर तिने ज्या पध्दतीने त्याचे स्वागत केले, जे काही बोलणे झाले तेव्हा ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही असे त्याने ठरवले.
पुढे लाॅस एंजेलिस ला त्याची बदली होऊन तो अमेरिकेत गेला तेव्हाशी कुठे त्याची धार्मिक विद्वेषातून सुटका झाली. तिथे परत त्याची जेसिकाशी गाठ पडली.
यानंतरच्या अनेक अनपेक्षित घटना अस्लमच्या आयुष्यात आल्या काही सुखद होत्या तर काही दु:खद. जातिविद्वेषाने छळणारे होते, तर फक्त माणूस म्हणून त्याला संरक्षण देणारेही होते. त्याचं डेबिट कार्ड ताब्यात ठेऊन घरच्यांना पैसे पाठवले तर सोडून जाईल अशी धमकी देणारी बायको, आणि आजारपणात त्याची सेवासुश्रुशा करणारी जेसिका.. ही स्रीयांची दोन रुपे त्याला दिसली.
त्याचं लग्न अयशस्वी झालं होतं. पण लेकीत जीव अडकलेला होता. तिचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात जायची त्याची तयारी होती. या सगळ्या प्रवासात लेखक होण्याचं स्वप्न त्याच्यासोबत होतं. आपल्याला लेखक म्हणून मान्यता मिळेल की नाही हा अनुत्तरित प्रश्न त्याला छळायचा. तो पानं च्या पानं लिहायचा, खोडायचा, परत लिहायचा.त्याला जाॅर्ज ऑर्वेल खुणवायचा, त्याच्या जन्माच्या वेळी पाढऱ्या कपड्यातली स्री स्वप्नात यायची. त्याला पारसनाथ म्हणून हाक मारायची. नंतर तो आणि जेसिका भारतात आले तेव्हा त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला.
अस्लमच्या वाट्याला आलेलं अल्पसंख्याकांचं जगणं, पोटजाती, उपजाती यांचे आपसातले हेवेदावे, तंटे
अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतं. आपण खरोखर पुढे चाललो आहोत ना.... हा प्रश्न उभा राहतो.
,