अमेरिकेच्या सत्ताधाऱ्यांची वृत्ती, शास्त्रज्ञांची हुशारी एक संहारक शस्त्र तयार करण्यासाठी वापरली गेली आणि मानवतेला लाजवणारी ही घटना घडली,
६ ऑगस्ट १९४५ या दिवशी सकाळी "इनोला गे" या विमानातून हिरोशिमावर "लिटिल बाॅय" हा अणुबॉम्ब टाकण्यात आला. या बॉम्बची कोणतीही चाचणी घेतली गेली नव्हती; कारण यू-२३५ युरेनिअमच्या कोअरमधून वेगळे करणे ही खूप कष्टांची आणि महागडी प्रक्रिया होती. त्या वेळी जेवढे यू-२३५ अगदी शुद्ध अवस्थेत होते ते ६० किलोग्रॅम होते आणि ‘लिटल बॉय’ बॉम्बमध्ये ते पूर्ण वापरले होते. ते जेव्हा पेटवले गेले तेव्हा १२ हजार ५०० टन टीएनटी एवढा जबरदस्त स्फोट झाला. तापमान एकदम लाख डिग्री सेंटिग्रेडच्या वर गेले. त्यामुळे हवेलासुद्धा आग लागली‚ त्याचा एक प्रचंड मोठा लोळ तयार झाला. जेव्हा स्फोट झाला तेव्हा ती ऊर्जा प्रकाशाच्या रूपात उष्णता आणि दाब या माध्यमातून बाहेर पडली. प्रकाश बाह्य बाजूला झेपावला‚ त्यानंतर प्रचंड दाबाने एक धक्का देणारी लाट निर्माण झाली. तिचा वेग ध्वनीच्या वेगाइतका होता.
शहरांमध्ये असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या इमारती सोडल्यास सर्व काही क्षणार्धात नष्ट झाले. जणूकाही सगळे स्वच्छ केलेले सपाट पण जळून गेलेले वाळवंट! प्रत्यक्ष स्फोटाच्या केंद्रापासून १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खिडक्यांच्या काचा फुटून गेल्या. त्याला नेहमीच्या भाषेत ‘ग्राउंड झीरो’ म्हणतात. हिरोशिमाच्या दोनतृतीयांश इमारती उद्ध्वस्त झाल्या‚ आतील संपूर्ण भागाची पडझड झालेली‚ आणखी सगळ्या खिडक्या‚ दारे‚ फ्रेम्स‚ सज्जे उखडले गेले. त्या उष्णतेमुळे जागोजागी आगी लागल्या‚ त्यातून आगीचे लोळ तयार होऊन अनेक किलोमीटरपर्यंत ती आग पसरली. जवळजवळ ८० हजार म्हणजे हिरोशिमाच्या एकूण लोकसंख्येच्या (दोन लाख ५० हजार) ३० टक्के लोक क्षणार्धात मृत्यू पावले. खरे म्हणजे लाखापेक्षा अधिक! खरा आकडा कधीच कळणार नाही.
विशाल ज्वाला आणि धूर यांच्या ढगाखाली हिरोशिमा दिसेनासे झाले. मागच्या विमानातील बॉब कॅरॉन याने आपला कोडॅक कॅमेरा घेऊन धडाधड फोटो काढायला सुरुवात केली. त्या जांभळ्या ढगातून धुराचा एक मोठा तीन हजार मीटर उंचीचा स्तंभ तयार झाला आणि त्यातून एक प्रचंड मोठा मश्रूम आकाराचा ढग तयार झाला. ते मशरूम घुसळल्यासारखे उंच होते. त्या धुराचा स्तंभ १५ हजार मीटरपर्यंत उंच गेला. सहवैमानिक‚ लुइसने आपल्या डायरीत लिहिले‚ ‘देवा‚ काय केलंय हे आम्ही!’
दुर्दैवाने हे इथेच थांबलं नाही. ९ ऑगस्ट ला सकाळी आकरा वाजता द ग्रेट आर्टिस्टे’या विमानातून फॅट मॅन नागासाकीवर टाकला गेला...
प्रंचड शक्तिमान पांढऱ्या प्रकाशाचा जणू स्फोट झालेला दिसला. हा हिरोशिमापेक्षा जास्त तीव्र होता. आकाशातून एक गडद तपकिरी रंगाचा ढग क्षितिज समांतर (आडवा) संपूर्ण शहरभर पसरताना खालच्या बाजूला दिसू लागला. त्याच्या मध्यातून एक सरळ उभा स्तंभ प्रकट झाला. तो रंगीत होता आणि जणू उकळत होता. एक पांढरा फुगलेल्या मशरूमसारखा ढग चार हजार मीटरवर तयार झाला आणि तो ११ हजार मीटरपर्यंत उंच गेला. जेथे स्फोट झाला होता तेथे त्या टेकडीच्या वर आणि आजूबाजूला लगेच आगी भडकायला सुरुवात झाली. या स्फोटाच्या केंद्रापासून जवळजवळ एक किलोमीटर परिसर संपूर्णतः उद्ध्वस्त झाला होता. हिरोशिमाला याच अंतरावरच्या काही इमारती पडल्या नव्हत्या. पण येथे भूकंपातही पडू नयेत म्हणून विशिष्ट पद्धतीने बांधलेल्या काँक्रीटच्या इमारतीदेखील भुईसपाट झाल्या. माणसे आणि प्राणी तत्क्षणी मेले. माणसांच्या शरीरातील पाणी त्या उष्णतेच्या लाटेमुळे सुकून गेले. एक मुलगा एका विटांच्या वेअरहाउसच्या सावलीत उभा होता. जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर त्याने उघड्यावर असलेली आई आणि तिचा मुलगा यांचा अक्षरशः धूर झालेला बघितला.
खरे तर फॅटमॅन कोकीरा या शहरावर टाकायचा होता. पण संदेश देवाणघेवाणीत घोळ झाला. ताफ्यातलं एक विमान दिसेनासं झालं. भरीत भर यामुळे इंधन कमी झालं ते भरणं शक्य नव्हतं म्हणून मग फॅटमॅन समुद्रात टाकण्याऐवजी नागासाकी टाकला गेला.
जपानी लोक आता एक वाक्प्रचार वापरतात‚ ‘कोकुराचे नशीब.’ म्हणजे असे मोठे संकट टळणं‚ जे येण्याची तुम्हाला चाहूलही लागली नव्हती.
सूप्रसिद्ध दूरचित्रवाणी निर्माता आणि दिग्दर्शक असलेल्या क्रेग कोली यांचे नागासाकी हे पुस्तक म्हणजे जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या दुसऱ्या महायुद्धकाळात होरपळलेल्या शहराचे वर्णन आहे. हिरोशिमामध्ये बॉम्बमुळे झालेला संहार भयानक असला तरी त्या वेळच्या वृत्तपत्रांमध्ये त्याबाबत त्रोटक माहिती होती. मुळातच प्रशासनानेच संपादकांना तशा सूचना दिल्या होत्या. बातम्या देण्यासाठी वृत्तपत्रांवर बंदी होती, त्यामुळे त्या शहरावर प्रत्यक्ष काय गुदरले हे कोणाला फारसे समजलेच नाही. जे थोडेसे जिवंत राहिले त्यांनी सांगितलेलं गोष्टी कल्पनेपलीकडील अविश्वसनीय वाटल्या.
लेखकाने प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती घेऊन देशी विदेशी अहवाल अभ्यासून, या पाच दिवसांचे व त्या अगोदरच्या पंधरा दिवसाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे चित्र रेखाटले आहे. ते सगळेच काही काळेकुट्ट नाही. त्यात उजळणारे रंग सुध्दा आहेत. दुसऱ्या महायुद्धातील ही घटना या युद्धाला कलाटणी देणारी युद्धाचं पारडं पूर्णपणे फिरवणारी किंबहुना महायुद्ध समाप्तीकडे नेणारी होती. पण त्याच बरोबर हे कृत्य अतिशय क्रूर आणि नृशंस असे होते. मानवाने विज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या या संहारक अस्त्राचे दुष्परिणाम किती खोलवर जाऊ शकतात हेच यातून दिसून आले. या भयावह घटनेनंतर जग बदलले आणि त्यानंतर अद्याप अणुबॉम्बचा वापर झालेला नाही. जपान जणू काही राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा उभा राहिला. पण हा नरसंहार किती भयावह आणि मानवतेला काळिमा फासणारा होता, हे जाणून घेण्यासाठी ही कादंबरी वाचायला पाहिजे.