लेखक - पेरूमल मूरूगन
अनुवाद - दिपक कुलकर्णी
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस
मूळ तमिळ भाषेतील एरुव्होयल या कादंबरीचा अनुवाद. कारखानदारीमुळे हळूहळू लयाला जाणाऱ्या ग्रामीण संस्कृतीचे हळवे करणारे चित्रण.
ऐंशीच्या दशकाअखेर शेतमजुरांची मुलं नोकरी करण्यासाठी किंवा इतर काही संधी मिळेल या आशेने आसपासच्या शहरात जाऊ लागली. विसावं शतक उलटल्यानंतर तर शेतीच्या कामात मदत करण्यासाठी माणसंच मिळेनाशी झाली. मग मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे खेड्यातील अनेक शेतकऱ्यांना आपल्या जमीनी व्यवसायिकांना विकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. या जागेवर कारखानदारी उभी राहिली, पाठोपाठ या कागारांसाठी वसाहती उभ्या राहिल्या.
या पुस्तकाचे लेखक पेरुमल मूरूगन यांची वडिलोपार्जित जमीनही याच प्रकाराने विकली गेली होती. म्हणून यातील दाहकतेची जाणीव या कथानकात प्रतिबिंबीत होते.
अशाच एका कुटुंबातील सेल्वन नावाच्या मुलाची ही कथा.
सेल्वनचे दारुडे वडिल, बिचारी आई, हिंमत न हारलेले त्याचे आजी आजोबा या़ंच्याभोवती कथानक फिरतं. गावातील संधीसाधू नेते सर्वसामान्यांचा त्याचं घर, त्यांची शेतजमीन विकायला कसं भाग पाडतात याचेही अंतर्म करणारं रेखाटन आहे. दारु पाजून, पैसे उसने देऊन जाळ्यात ओढायचं, मग कर्ज वाढवत नेऊन त्या माणसाला जाणीव करून द्यायची की तुझं निम्म शेत विकलं तर कर्जफेड होईल. राहिलेली जमीन कसून तुझा उदरनिर्वाह होऊ शकतो.
सेल्वनच्या वडिलांनी आपल्या वाट्याची जमीन विकायची ठरवल्यावर त्यांच्या भावांनी अडथळे आणले. आई वडिलांची काळजी कोणी घ्यावी, कोणी त्यांना साभाळावं यावरही वादंग झाले.
हळूहळू गावातली शेती कमी होत गेली. कारखानदारी वाढू लागली. गावातील तसेच आसपासच्या गावातीलही तरुण स्थिर उत्पन्नाच्या आशेने नौकरीसाठी येऊ लागले. त्यांच्या राहण्यासाठी वसाहती आकार घेऊ लागल्या. गावात राहणारे जुने लोक, आणि आसपासच्या गाव शहरांतून कारखान्यात कामाला आलेल्या लोकांमध्ये दुराव्याची अदृष्य भिंत उभी राहत होती.त्यावरुन प्रसंगी हाणामारीही होत होती.
हे सगळं बघत सेल्वन जस जसा मोठा होत होता तसं तसा तो निराश होत गेला. वडिलोपार्जित घर विकल्यावर जेव्हा लहानशा घरात राहायला गेले तेव्हा रस्त्यावरच्या दिव्यांमुळे चंद्राप्रकाश पुर्वीप्रमाणे तेजस्वी राहीला नाही याची जाणीव त्याची उदासी वाढवत राहते. हा होणारा बदल सेल्वनचा पाळलेला कुत्रा सुध्दा सहन करु शकत नाही. जो अनेक वर्षांपासून सेल्वनच्या सोबत होता आणि कधीही त्यांच्या गळ्यात पट्टा घालण्याची गरज वाटली नव्हती.
कारखानदारीमुळे ग्रामीण भागाचे जे कृत्रिम शहरीकरण होते त्यात स्थानिक ग्रामस्थ कसे भरडले जातात. घर जमीन विकल्यावर मिळालेल्या एकरकमी पैशांनाही कशा वाटा फुटतात. या लोकांच्या स्वभावातला मूळ कनवाळुपणा, आपलेपणा हळूहळू लोप पावत जातो. शेजारी राहणाऱ्यांच्या सुखदुःखाबद्दल फारशी आत्मियता वाटेनाशी होते याचं अत्यंत विदारक चित्रण अंतर्मुख करतं.