लेखक - रुझबेह भरूचा
अनुवाद - लीना सोहनी
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस
भारतीय तुरुंगात राहणाऱ्या आया व त्यांच्या मुलांना ज्या व्यथांचा व वेदनेचा सामना करावा लागतो त्याची ही कथा आहे.
देशभरातील अनेक तुरुंगांना व्यक्तिशः भेट देऊन तेथे जीवन कंठणाऱ्या अनेक कैदी स्त्रिया व त्यांच्या मुलांशीही लेखकाने संवाद साधला. तुरुंगातील परिस्थिती, असुरक्षितता, त्या कैदी स्त्रियांची व मुलांची धडपड, भविष्यातील आशा आणि स्वप्ने याचे चित्रण या पुस्तकात आढळते. तुरुंगातील कैद्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती, त्याचप्रमाणे कैदी स्त्रियांची मुले त्यांच्याशी काम करणारे समाजसेवक, तुरुंग अधिकारी आणि वकील यांच्या मुलाखती रोमांचकारी आहेत त्या वाचताना एका वेगळ्या भावनिक कल्लोळाचा अनुभव वाचकाला येतो.
तुरुंगासारख्या पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्री कर्मचारी व महिला पहारेकर्यांची संख्या फारच कमी असते. त्याचबरोबर स्त्रियांविषयी परंपरागत दृष्टिकोन हा पूर्वग्रह दूषितच असतो. त्याचमुळे कैदी स्त्रियांच्या संदर्भातील मुद्दे म्हणजे स्त्रियांची सुरक्षितता, आरोग्याच्या सुविधा, गर्भवती स्त्रिया, स्तनपान देणाऱ्या माता, त्यांच्या खटल्यावर झटपट निकाल, त्यांच्या कुटुंबीयांशी विशेषता जेल बाहेर राहणाऱ्या त्यांच्या लहान मुलांची संपर्क साधण्याची सोय, त्यांची प्रोबेशनवर सुटका, सुटल्यानंतर त्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी व समाजाशी एकरुप होणं इत्यादी घटक आहेत. परंतु या कैदी स्त्रियांची संख्या कमी असूनही या देशभरातील विविध तुरुंगामध्ये विखुरलेल्या आहेत म्हणून वर उल्लेख केलेल्या मुद्द्यासाठी अंदाजपत्रकात खर्चाची काहीही तरतूद केली जात नाही.
जेव्हा कैदी स्त्रियांविषयी विचार होतो, तेव्हा बाहेरील जगात राहत असलेल्या त्यांच्या मुलांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. नातेवाईक व समाज अशा मुलांकडे तिरस्करणीय नजरेनेच बघत असतो, परंतु काही कैदी स्त्रियांची मुले त्यांच्यासोबत तुरुंगातच राहत असतात ही तर अधिकच धोकादायक परिस्थिती जगत असतात. कोणत्याही मुलाचा जन्म आणि वाढ तुरुंगात होते हे सामाजिक दृष्टीने फार भयावह असतं, असं आढळून आलं आहे की तुरुंगाच्या वातावरणात सगळ्या बाजूने गुन्हेगारी प्रवृत्ती व निष्ठुरतेत वाढलेली मुलं एक तर अत्यंत आक्रमक वृत्तीची बनतात किंवा अगदी एकलकोंडी स्वतःच्या कोशात राहणारी बनतात. त्यांचा बाह्य जगताशी काहीच संबंध येत नसल्यामुळे त्यांची समज जाणीव व बौद्धिक वैचारिक क्षमता खुरचटून जाते, याचे एक उत्तर उदाहरण म्हणजे तुरुंगात वाढलेल्या मुलांनी जेव्हा पहिल्याप्रथम गाय पाहिली तेव्हा ती त्यांना खूप मोठ्या वाढलेल्या मांजरासारखी वाटली.
तुरूंगात असलेल्या स्रीचं मुल पाच वर्षाचं होईपर्यंत तिच्यासोबत राहू शकतं. पण या संस्कारक्षम पाच वर्षांत आसपास सगळेच गुन्हेगार असतांना बालमनावर कोणते परिणाम होतात, कोणत्या प्रकारचे संस्कार होतात याची कोणालाही काळजी नाही. मुल पाच वर्षाचं झाल्यावर मात्र ते आईसोबत राहू शकत नाहीत. अगदी सक्तीने त्यांची ताटातूट केली जाते. बरेचदा तुरुंगाच्या बाहेर गेल्यावर या मुलांना जाण्यासाठी घरच नसतं त्यांचे कुटुंबीय अथवा नातलग त्यांचा सांभाळ करायला तयार नसतात विशेषतः ती मुलगी असेल तर नाहीच नाही. जर काही नातेवाईकांनी या मुलांची जबाबदारी स्वीकारली तर बरेच वेळा या मुलांचा नंतर छळ होतो, त्यातून बऱ्याच समस्या निर्माण होतात. एका आईच्या दृष्टीनेही असे प्रसंग अत्यंत यातनामय असतात. अशा मुलांना एखाद्या शासकीय अनाथालयात जावं लागतं. ते अनाथालय त्याच शहरात असेल याची कोणतीही शाश्वती नसते. काही वेळा मग वर्षानुवर्षे त्यांची गाठभेट होत नाही. अशा काही करुण कहाण्या या पुस्तकातून उलगडतात.
काही सामाजिक संस्था पुढे येऊन या मुलांच्या शिक्षणाची
जबाबदारी घेऊन त्यांच्या भवितव्याची काळजी घेतांना दिसतात पण यांची संख्या अत्यंत कमी आहे. या संस्थांना अनेकदा निधीची कमतरता असते.
किरण बेदी तिहार तुरुंगाच्या महानिरीक्षक पदी असतांना या स्रिया व मुलांच्या बाबतीत खूप काही केलं गेलं. तो काळ त्यांनां स्वप्नवत वाटला असेल. पण त्यांची बदली झाल्यावर परिस्थिती पूर्वपदावर यायला वेळ लागला नाही.
भारतातील जवळपास सगळ्याच तुरुंगात क्षमतेच्या दुप्पट, तिप्पट कैदी आहेत. यात प्रत्यक्ष शिक्षेचा कालावधी निर्धारित कैदी फार थोडे असून खटला उभा राहण्याची प्रतिक्षा करणाऱ्या कैद्यांची संख्या फार मोठी आहे. त्यातूनही बहुसंख्य कैदी असे आहेत की त्यांच्यावर असलेले आरोप सिद्ध झाले तर शिक्षेचा कालावधी एक दोन वर्षे असू शकतो. असे अनेक जण वर्षानुवर्षे खटला उभा राहण्याच्या प्रतिक्षेत आहेत. काही कैदी असे आहेत की ते तुरूंगात का आहेत हे प्रशासनाला सुध्दा माहीत नाही.