पुस्तकाचे नाव - १९४६ स्वातंत्र्याचे अंतिम युद्ध
लेखक - प्रमोद कपूर
अनुवाद - जी.बी.देशमुख
जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झालं होतं तेव्हापासून ते महायुद्ध अधिकृतरीत्या समाप्त होईपर्यंत रॉयल इंडियन नेव्हीची ताकद ४० जहाजांपासून १३२ आणि १७०० खलाश्यांपासून २७,००० अशी अफाट वाढली होती. विशाल आकाराच्या फलकांवर भरतीच्या जाहिराती चिकटवण्यात आल्या होत्या. नौदलात एका स्वप्नवत् आयुष्याचं वचन देणारी हस्तपत्रकं भारतभर वितरित करण्यात आली होती. अत्यंत गाजावाजा करून केलेल्या जाहिरातींना भुलून रॉयल इंडियन नेव्हीकडे आकर्षित झालेल्यांना भ्रमनिरास झाल्याची जाणीव, ते जहाजांवर अथवा तटीय आस्थापनांमधे रुजू होताच झाली. कारण वास्तव भयावहरीत्या वेगळं होतं. गर्दीनं ओसंडून वाहत असलेल्या बराकीत राहायला भाग पाडण्यात आलेल्या खलाश्यांना वांशिक अवहेलना अनुभवावी लागली, बेचव अन्न खावं लागलं होतं आणि शिवराळ तोंडाच्या गोर्या अधिकार्यांकडून आदेश स्वीकारावे लागत होते. त्यांना दीर्घकालीन आणि कायम सेवेचं वचन देण्यात आलं होतं; पण १९४६ येईपर्यंत, हे स्पष्ट झालं होतं की त्यातील अनेक जणांना नाममात्र मोबदला देऊन सेवेतून कमी करण्यात येणार होतं. सगळा असंतोष खदखदत होता.
मग उठावाची योजना आखली गेली. पहिली ठिणगी एच.एम.आय.एस. तलवार या जहाजावर पडली. खलाशांना शिविगाळ करणाऱ्या कमांडर आर्थर फ्रेडरिक किंग विरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेतली नाही, वास्तविक उच्चाधिकार्यांविरुद्ध एकत्रित तक्रार करण्याला बंड केल्याचं समजलं जात आणि व्यक्तिगतरीत्या अशी तक्रार करणं हीसुद्धा एक गंभीर कृती होती.
लेफ्टनंट कमांडर शाॅ यांनी खलाशांना समजवण्याचा प्रयत्न केला. परिणामांचा विचार करण्याचा सल्ला दिला, इतकंच नव्हे तर त्यांचं भविष्य मातिमोल होईल, अशी धमकीही त्यांनी देऊन पाहिली; पण हे शूर आणि स्वाभिमानी तरुण ‘झालं तितकं पुरे’ या बाण्यावर कायम राहिले.
शाॅ यांनी किंग यांना हे प्रकरण संवेदनशील पणाने हाताळण्याचा सल्ला दिला तो किंगने कानाआड केला.भारतीय नौसैनिकांच्या सर्व तक्रारींना त्याचं एकच उत्तर होतं ‘भिकार्यांना निवड करण्याचा अधिकार नसतो.:
आणि पडलेल्या ठिकाणीने वणवा पेटला.खलाशांनी तलवार जहाजवर ताबा घेतला. जल्लोशात तलवार- वरील युनियन जॅक खाली खेचला गेला आणि त्या जागी काँग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मुस्लीम लीगचे ध्वज चढविण्यात आल पाठोपाठ मुंबईच्या सर्व भागांतून मिळून दहा हजार पेक्षा अधिक खलाश्यांनी बंदराकडे वाटचाल सुरू केली होती. त्यांनी त्यांची कामं आपसात वाटून घेतली आणि आर.आय.एन.च्या प्रत्येक जहाजावर ते आरूढ झाले. प्रत्येक जहाजावरील अत्यंत तिरस्कृत असं रॉयल नेव्हीचं पाढरं निशाण आणि युनियन जॅक खाली खेचून त्याच्या जागी अभिमानानं तीन भारतीय ध्वज चढविण्यात आले. लवकरच मद्रास, सिंध, मर्हट्टा, तीर, धनुष आणि आसामसारख्या इतर जहाजांवर तैनात असलेल्या खलाश्यांनी तशीच कृती केली.
खलाश्यांनी ताबा मिळवल्यासरशी, नि:शब्द झालेल्या आणि घाबरलेल्या अधिकार्यांनी कोंडाळं केलं. एका जहाजावर एका अनाम इंग्रज अधिकार्यानं पांढरं निशाण खेचण्याच्या कृतीला विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा खलाशी त्याच्या अंगावर धावून गेले आणि त्याला चांगलाच बुकलून काढला. त्या घटनेनंतर मात्र कुठेही विरोध झाला नाही. बंडखोरी आणि बदल्याची भावना आसमंतात पसरली होती आणि इंग्रजांचं नियंत्रण सुटण्यास सुरुवात झाली होती.कलकत्ता, कराची, वाइझाग आणि मद्रास येथील आर.आय.एन. केंद्रांवर हा संप पसरल्यामुळे, हा आता एक राष्ट्रीय मुद्दा झाला होता.
या नौसैनिकांना अरुणा असफ अली यांनी सुरूवातीला खुप मदत केली.जवाहरलाल नेहरूंना मुंबई ला येण्याची विनंती केली.ते निघाले सुद्धा.पण सरदार पटेलांची गणितं काही वेगळी होती.महात्मा गांधीना सांगून त्यांनी नेहरुंना थांबवले.
नेहरू आणि पटेल यांचे लक्ष सौहार्दपूर्ण सत्तांतराकडे केंद्रित होते. त्यांचा विश्वास होता की, स्वातंत्र्य रक्तरंजित संघर्षातून ओरबाडायचं नाही. शांतिपूर्ण पद्धतीनं भारतीय नेत्यांच्या हाती सत्ता सोपविल्या जाण्याच्या होऊ घातलेल्या प्रक्रियेस या बंडामुळे विलंब होईल, अशीही एक भीती व्यक्त करण्यात येत होती. मुस्लिम लिगने सुध्दा दुर्लक्ष केले. कम्युनिस्ट पक्षाने मात्र पाठिंबा दिला. त्यांनी नौदल खलाश्यांच्या समर्थनार्थ दिलेल्या संपाच्या हाकेला प्रतिसाद देत तीन लाख गिरणी कामगार, विद्यार्थी, वाहतूक क्षेत्रातील माणसं आणि संघटना इंग्रज-विरोधी निदर्शनं करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. घाबरलेल्या इंग्रजांनी जनतेचं हे समर्थन चिरडण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर बख्तरबंद गाड्या उतरवल्या, त्यामुळेच हा जमाव इंग्रजांविरोधात हिंसक कारवाया करू लागला. त्याचा परिणाम असा झाला की, दोन दिवस चाललेला गोंधळ आणि रस्त्यावरील धुमश्चक्रीत जवळपास चारशे माणसं ठार झाली आणि दीड हजारच्या वर जखमी झाली.
खलाश्यांचं बंड केवळ चार दिवस टिकलं; पण सामान्य जनतेला ते प्रेरणा देऊन गेलं, ज्यातून ते एकजुटीच्या भावनेनं रस्त्यावर उतरले. मुंबई या घटनेचा केंद्रबिंदू असला आणि या शहराने सगळ्यात जास्त त्रास झेलला असला, तरी कराची, विशाखापट्टणम्, मद्रास, कलकत्ता, अहमदाबाद, तिरुचिरापल्ली, मदुराई, कानपूर आणि इतरत्रसुद्धा हे लोण पसरलं होतं. आर.आय.एन.च्या बंडापासून प्रेरणा घेत जनता जिवाची जोखीम घेऊन देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात उतरली होती.
राजकीय नेत्यांवर त्यांनी विश्वास ठेवला. त्यांच्याकडून विश्वासघात झाल्यांनतर आणि एका क्रूर आणि बेपर्वा व्यवस्थेकडून चिरडले गेल्यानंतर अनेकांना अत्यंत अवमानजनक स्थितीत कार्यमुक्त करण्यात आलं.विविध केंद्रांवरून सामूहिक अटकसत्रात दोन हजारपेक्षा अधिक खलाश्यांना ताब्यात घेण्यात आलं असावं. ही माणसं इतिहासाच्या पानावरून गायब झाली. हे एक बर्यापैकी विश्वासार्ह अनुमान आहे;
या आंदोलनात कोणताही राजकीय पक्षाने मनापासून सहभाग घेतला नाही. राष्ट्रीय नेत्यांनी या प्रकरणी जी धरसोड प्रवृत्ती दाखवली त्यामुळे या विलक्षण घटनेला स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात हवं ते स्थान मिळू शकलं नाही.
लेखकाने अत्यंत परिश्रमपूर्वक संशोधन करुन या सबंध घटना अगदी बारकाईने मांडल्या आहेत.लंडनला ब्रिटिश लायब्ररी, द नॅशनल आर्काइव्ह क्यू, द इम्पिरीअल वॉर म्यूझिअम, द नॅशनल आर्मी म्यूझिअम आणि द नॅशनल मॅरिटाइम म्यूझिअम, ग्रीनविच इत्यादी ठिकाणीची कागदपत्रे अभ्यासली.
जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात शिकविणारे सैन्य इतिहासकार रोनाल्ड स्पेक्टर म्हणतात, ‘१९४६ ची रॉयल इंडियन नेव्ही संपाची घटना ज्या प्रमाणात वादग्रस्त ठरली, आणि तिच्याकडे इतिहासकारांचं जितकं दुर्लक्ष झालं, तेवढं भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील फार थोड्या घटनांच्या बाबतीत घडलं असावं.’