लेखिका - आयफर टंक
अनुवाद - अरुणा श्री दुभाषी
प्रकाशक - पाॅप्युलर प्रकाशन.
आयफर टंक या तुर्की भाषेतील प्रस्थापित लेखिका व पत्रकार आहेत. अझिझ बे हादिसेसी ही मुळ तुर्की भाषेतील अत्यंत गाजलेली, बेस्ट सेलर ठरलेली कादंबरी आहे. एका संगीतकाराचे बालपणापासून ते त्याच्या अखेर पर्यंतचे आयुष्य उभे करतांना भावभावनांचे विविध कंगोरे उलगडले आहेत.
अनोळखी परकी वाटणारी संस्कृती जेव्हा या कथानकात आपल्यासमोर येते तेव्हा तिच्यातील उत्कटपणाने सांस्कृतिक परकेपण आपोआप गळून जाते आणि कादंबरी थेट मनाला जाऊन भिडते.
अझिज बे ने ज्या वाटा चोखाळल्या त्या इतरांसारख्या नव्हत्या.अशा वाटा प्रतिष्ठित जीवन जगणाऱ्यांच्या दृष्टीने समजायला अवघड आणि गुंतागुंतीचे होत्या. संवेदनशील आणि भावनाप्रधान तसेच दुराग्रही आणि हेकेखोर असलेला अझिझ बे वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत उनाडपण करीत राहिला. समुद्रकिनाऱ्यावर लाईफ गार्डची नोकरी केली, टॅक्सी चालवली.इतरही सटरफटर नौकऱ्या केल्या. त्याचे वडील सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर आर्थिक व मानसिक अवस्था ढासळली. ते कर्जत बुडाले होते. त्यांना अझिझ करून मोठ्या अपेक्षा होत्या, पण दिवास्वप्नात हरवलेल्या अझिझला कशाचेही भान नव्हते. अडगळीत पडलेला आजोबांचा तंबोरा हाती आल्यावर मात्र शेवटपर्यंत त्याने तो तंबोरा कधीच सोडला नाही. या तंबोऱ्यामुळेच त्याला उपाशी राहावं लागलं नाही,असंही म्हणता येईल.
वेगवेगळ्या नाइट क्लब मधे त़बोऱ्यावर संगीताला साथ देत असायचा. त्याला अनेक आमंत्रणे यायची.मोठे होऊ पाहणारे गायक आपल्याबरोबर साथीला वाजवण्याची विनंती करीत.तो कधी जायचा तर कधी नाही.
नंतर तो मरियमच्या प्रेमात पडला आणि त्यांच्या शोकांतिकेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मरियमचं कुटुंब बैरूतला स्थलांतरीत झाल्यावर काही दिवसांनी तिचं पत्र आल्यावर तो परत स्वप्नरंजनात मग्न झाला.त्यामुळे त्याची नौकरी गेली,मग बापानेही घराबाहेर काढलं. तो थेट बैरुतला गेला,त्याने मरियमला शोधूनही काढलं. तिने अगोदर उत्साहीत केलं .सलग काही दिवसांच्या भेटी नंतर खंड पडू लागला.नंतर तो तिच्याकडून दुर्लक्षित झाला. तो परत घरी आला तेव्हा आई गेलेली होती. वडिल पुर्णपणे थकलेले असुनही त्यांनी अझिझला माफ केले नाही. अनेक दिवस विनवण्या करुनही ते पाघळले नाही.कारण ज्या दिवशी अझिझने घर सोडले होते त्याच दिवशी त्या धक्क्याने तिने जगाचा निरोप घेतला होता.
घराचं घरपण संपून गेलेलं होतं.
आजोबांचा त़बोरा मात्र अजूनही अझिझच्या सोबत होता. विरहगीते गात तो क्लबमध्ये, खानावळीत लोका़ची करमणूक करु लागला.
वुसलतशी लग्न झाल्यानंतरही तो मरियमला विसरु शकला नाही. प्रेमभंग अनेकांच्या वाट्याला येतो पण अझिझ बेच्या वाट्याला आलेला प्रेमभंग थेंबा थेंबाने झिरपत त्याच्या आयुष्याच्या क्षणाक्षणात पसरत गेला.दिवसेंदिवस तो जास्तच आत्ममग्न होऊ लागला.आणि एका संध्याकाळी जे होऊ नये ते घडलं.
या कथानकात अझिझ बे ज्या तऱ्हेने घडत जातो ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. कादंबरीची सुरुवात अझिज बे च्या मृत्यूच्या घटनेपासून सुरू होते आणि पुढे सरकत राहते.
मग भुतकाळ उलगडत जातो. या प्रवासात अझिझ बेचे बालपण, प्रौढपण, कुटुंब, आवड, प्राविण्य त्याचबरोबर त्याच्या स्वभावातले अनेक कंगोरे ही उलगडत जातात. अत्यंत आत्मकेंद्रित अझिझ बे चं पात्र आपल्यासमोर सजीव होऊन वावरतांना दिसतं ते लेखिकेचं ( आणि अनुवादकाचंही) कौशल्य आहे.त्याच्या अवतीभवती असणारी मोजकी पात्रेही मनात घर करतात.
वेडंपिसं करणाऱ्या बेपर्वाईने तो जगला.अनिर्बंध हर्षवायू आणि तीव्र दुःख, शौकात्म जगणं आणि हास्यास्पद मरण असे विरोधाभास त्याच्या आयुष्यात होते.
अझिझ बेची शोकांतिका ही एकाच वेळी एका संगीतकाराची आणि त्याचवेळी एका सामान्य माणसाची ही शोकांतिका आहे कलावंत आणि सामान्य माणूस यांच्यातील तोल उत्तमपणे सांभाळत कथानक पुढे जात राहते यातच कादंबरीचे मोठे यश आहे.
अरुणा दुभाषी यांनी केलेला अनुवाद अत्यंत सूरस व प्रवाही झालेला आहे.