ए.पी.जे अब्दुल कलाम
(१५ ऑक्टोबर १९३१ - २७ जुलै २०१५)
हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. तसेच त्यांनी २००२ ते २००७ या काळात भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते. अवुल पाकीर जैनुलाब्दीन हे त्यांचे नाव. भारताच्या नागरी अंतराळ कार्यक्रमात आणि लष्करी क्षेपणास्त्र विकासाच्या प्रयत्नांमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासावर केलेल्या कामामुळे ते भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले. १९९८मध्ये भारताच्या पोखरण-२ अणुचाचण्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण संघटनात्मक, तांत्रिक आणि राजकीय भूमिका बजावली.
त्यांचे लेखन विज्ञानाधिष्ठित भविष्याचा वेध घेणारे आणि प्रेरणादायी होते ज्यातून विद्यार्थ्यांना तरुणांना मार्गदर्शन मिळत होते. भारताचे परिवर्तन होत असून ते कोणत्या दिशेने केले तर सोयीस्कर होईल याचे विश्लेषण त्यांच्या लेखनात आढळते.
कुटुंबाच्या तुटपुंज्या उत्पन्नात भर घालण्यासाठी लहानपणी वर्तमानपत्रे विकणारा सर्वसामान्य मुलगा ते असामान्य शास्रज्ञ व राष्ट्रापती पदासाठी अराजकीय परंतु सर्वमान्यता यातच त्यांचे श्रेष्ठत्व जाणवते. भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळवलेल्या कलामांनी राष्ट्रापती भवन सोडतांना फक्त आपली पुस्तके सोबत घेतली. शास्रज्ञ किंवा राष्ट्रापती याऐवजी माझी ओळख अध्यापक हीच असावी हा नम्रपणा त्यांच्या ठायी होता. त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
( संकलित)