लेखक - तहसीन युचेल
अनुवाद - शर्मिला फडके
प्रकाशन - पॉप्युलर प्रकाशन
तहसिन युचेल हे एक प्रसिद्ध तुर्की साहित्यातील एक महत्त्वाचे नाव आहे, ते लेखक, अनुवादक, निबंधकार आणि साहित्य समीक्षक होते. त्यांनी इस्तंबूल विद्यापीठात फ्रेंच भाषा आणि साहित्यातून पदवी प्राप्त केली. ते मुख्यत्वे फ्रेंच भाषेचे अनुवादक म्हणून ओळखले जातात.
तहसिन युचेल यांनी पाश्चिमात्य संस्कृती आणि तुर्की समाज यांच्यातील संघर्ष साहित्यातून दाखवला. त्यांचे निबंध, कादंबऱ्या आणि लघुकथा प्रसिद्ध आहेत.
मुळ तुर्की भाषेतील गोकडेलेन या नावाने प्रसिद्ध झालेली ही कादंबरी आपल्यासमोर भविष्यातील जवळपास अर्धशतकांनतरचे २०७३ सालातील सामाजिक व राजकीय चित्र उभे करते. भौतिकतेसाठी निसर्गाला दुर्लक्षित करण्याचा विचार अत्यंत भयावह आहे.
एका खटल्याची सुनावणी चालू असतांना न्यायधीश आरोपीला काही खाजगी प्रश्न सगळ्यासमोर विचारतात, तेव्हा आरोपीचे म्हणजे बचाव पक्षाचे वकील न्यायाधीशांच्या प्रश्न विचारण्याच्या पध्दतीस हरकत घेतात. तेव्हा न्यायधीश वकिलाचा अपमान करतात. त्याचा निषेध म्हणून वकिल कोर्टातून निघून जातात. कारण असे अपमान वारंवार होत होते. न्यायधिशांची एकाधिकारशाही न्यायव्यवस्था आपली मक्तेदारी समजू लागली होती.
अपमानित वकिल साहेब आपल्या गाडीत बसता बसता मदतनीस वकिलाला म्हणतात, “जसं सगळ्याचं खाजगीकरण केलं आहे तसं न्यायसंस्थेचंही का करत नाहीत खाजगीकरण! मला खात्री आहे त्यामुळे गोष्टी खूप सुरळीत होतील.”
सगळे लोक त्यांना न्युयॉर्कर म्हणूनच ओळखायचे. न्युयॉर्क सारख्या गगनचुंबी इमारत बांधण्यात त्यांचा हातखंडा होता. तुर्कस्तान देशातील अनेक शहरात त्यांनी दोनशे तिनशे मजली इमारती बांधून खूप पैसे कमवले होते. त्याच्या समोर एक अडचण उभी होती, सुरूवातीला छोटीशी वाटणारी अडचण आता खूप मोठी वाटायला लागली होती. त्यांना जिथे इमारत बांधायची होती तिथला जमिनीचा छोटा तुकडा ज्या व्यक्तिचा होता तिने तो विकायला सपशेल नकार दिला होता. प्रेमाने समजवून झालं होतं. दुप्पट चौपट किंमत द्यायची तयारी होती तरीही नकार मिळाल्याने काही गुंड धमकावून गेले होते. या सगळ्याला न घाबरता त्या व्यक्तीने कोर्टात प्रकरण दाखल करून स्वतः साठी सुरक्षा मागीतली होती, आणि हा खटला अत्यंत कुर्मगतीने सरकत होता म्हणून न्युयॉर्करही न्यायव्यवस्थेवर नाराज होता. त्यांनाही वाटायचं की न्यायव्यवस्थेचं खाजगीकरण व्हायला पाहिजे.
न्यायाधिशांनी ज्या वकिलांचा अपमान केला होता तेच वकिल न्युयॉर्करचे कायदेविषयक सल्लागार होते. आणि दोघांनी मिळून न्यायव्यवस्थेचं खाजगीकरण कसं करता येईल याची रुपरेषा आखायला सुरूवात केली.
पत्रकारांना पैसे देऊन या विषयावर माध्यमातून चर्चा सुरू केली त्यावेळी समाजातला एक वर्ग याला विरोध करु लागला. जर न्यायव्यवस्थेचं खाजगीकरण झाले तर त्यातून आर्थिक उत्पन्न कसे मिळवता येईल याचा विचार काही श्रीमंत वर्ग करू लागला. समाजातील विचारवंत यामुळे कशी अराजकता पसरेल याबद्दल भविष्यवाणी करु लागले. तर सरकारातील काही लोक खाजगीकरण झाल्याने सरकारला किती आणि आपल्याला किती याचा हिशोब मांडण्यात गर्क झाले. पण न्यायव्यवस्थेचे खरी लाभार्थी असलेली सर्वसामान्य जनता या प्रक्रियेत कोणाच्याही खिजगणतीत नव्हती. आता खाजगीकरण करण्याचं काय शिल्लक आहे याची काही जण कुजबुज करीत होते.
अशा भयाण भविष्याची जाणीव करून देत असतांनाच अर्धशतकानंतर तंत्रज्ञान कोणत्या स्वरुपात दिमतीला असेल हे ही दर्शवले आहे. आणि खाजगीकरणाचे समर्थन करणाऱ्यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो, सगळ्याच जर खाजगीकरण होणार असेल तर मग सरकार काय काम करणार....?? गगनचुंबी इमारतीत राहणाऱ्या, अवकाश वाहनातून फिरणाऱ्या धनिकांना अनेकदा सर्जवसामान्यांच्या जगण्याची त्यांच्या अस्तित्वाचीही जाणीव नसावी हे या कादंबरीतील चित्रही दारूण आहे.
जेव्हा कोणकोणत्या संस्थांचे खाजगीकरण करावं याला काही धरबंध राहत नाही तेव्हा समाजातील ठराविक वर्ग स्वतःला सोयीस्कर ठरेल अशी यंत्रणा उभी करता येईल का याची चाचपणी करता करता अशा यंत्रणेसाठी पैशांच्या थैल्या सैल सोडून त्या पैशाला प्रवाही करतो तेव्हा त्या प्रवाहात साधनशुचीतेच्या गप्पा मारणारेही प्रवाह पतीत होतात. याचं विदारक चित्रण या कथानकातून समोर येते.
येणारा काळ नेमक्या कोणत्या मार्गाने आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने घेऊन जाईल हे आपल्यासारख्या सामान्यांना ठरवताच येणार नाही याची जाणीव अस्वस्थ करून टाकणारी आहे.
न्याय हा मौल्यवान असतो आणि त्याहीपेक्षा पवित्र असतो. आणि तो तसाच रहायला हवा.