पुस्तकाचे नाव - अँन इनकम्प्लीट लाईफ
लेखक - विजयपत सिंघानिया
अनुवाद - दिपक कुलकर्णी
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस
"आज आलेला सुज्ञपणा जर मला त्यावेळी असता, तर आज माझं आयुष्य पूर्णपणे वेगळं असतं. माझं आयुष्य बदललंय हे स्वीकारण्याचा मी प्रयत्न करतोय." आज असं म्हणणाऱ्या विजयपत सिंघानियांना आपलं सर्वस्व वाहिलेल्या कंपनीतून सक्तीची निवृत्ती घ्यावी लागली. स्वतःच्या राहत्या घराचा त्याग करावा लागला. भारताच्या या विख्यात उद्योगपतीला हे सारं परत मिळवण्यासाठी आजही लढा द्यावा लागतोय. आज ते एका भाड्याच्या घरात राहतात.
बालपणी सावत्र आईच्या क्रूर वागणुकीच्या आठवणी , कौटुंबिक नातेसंबंध आणि राजस्थानच्या सिंहाणा गावातून जेके ग्रुपच्या उभारणीची कहाणी हृदयाला चटका लावते. आजोबांनी ब्रिटिशांविरुद्ध आंदोलनात घेतलेला सक्रिय सहभाग. कानपूर मधील "कमल रिट्रीट" ही मालमत्ता एका इंग्रज माणसांकडून विकत घेतले त्याच्या मागचा नाट्यमय इतिहास समजतो. घरातील दोन व्यक्तिंचा कॅन्सरने झालेला मृत्यू, त्याला संलग्न अशा हृदयद्रावक घटना हेलावून टाकतात.
पुढे त्यांची साहसी स्वप्ने , हॉट एअर बलूनमधील जागतिक विक्रम, आणि मायक्रोलाइट या इंजिन व्यतिरिक्त लाकडी बांदणीच्या विमानातून लंडन ते दिल्ली हा विक्रमी प्रवास तसेच विमानातून जगप्रवासाचा नवा विक्रम प्रस्थापित करतांना वेगवेगळ्या देशात आलेले अनुभव, मृत्युशी थोडक्यात झालेली चुकामूकीचा थरार मनाला थक्क करतात.
सुरुवातीला रेमंड ही केवळ लोकरीच्या कापडाची उत्पादक कंपनी होती. नंतर कंपनीचा झालेला विस्तार, तयार कपडे, सौंदर्यप्रसाधने, जीन्स चे कपडे, सूट, शर्ट असं उत्पादनात आलेलं वैविध्य....रेमंडचा विश्वासार्ह ब्रँड म्हणून मिळवलेला नावलौकिक, मुंबईचं शेरीफ पद, काही वर्षासाठी केलेलं अध्यापनाचे कार्य, पद्मभूषण पुरस्कार असा वैभवशाली जीवनाचा प्रवास त्यांनी केला.
पुढे मनाला हादरवणारा प्रसंग, मुलगा गौतमला ३७.१७% शेअर्स ज्याची किंमत दोन हजार करोड रुपये होती ते देण्याची 'सर्वांत मोठी चूक, त्यांच्या या चुकीला त्यांच्या एका मित्राने शतकातील घोडचूक म्हटले.आणि त्यामुळे झालेला विश्वासघात, त्यांचा पश्चात्ताप आणि एकटेपणा वाचकाच्या हृदयाला भिडतो.
सिंघानियांची लेखनशैली प्रामाणिक आणि आत्मचिंतनाने भरलेली आहे. हे केवळ आत्मचरित्र नाही, तर एका माणसाच्या हृदयाची कथा आहे, जी वाचकाला प्रेरणा आणि दुःख दोन्ही देते.
सुरस आणि ओघवत्या अनुवादातून या सगळ्या भावना वाचकांपर्यंत पोहचतात याचं श्रेय अनुवादकाचे आहे.