भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर नेते, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व आंतरराष्ट्रीय दर्जाचे श्रेष्ठ मुत्सद्दी. जवाहरलालांचे प्राथमिक शिक्षण घरीच उत्तम शिक्षकांकडून पार पडले. त्यांपैकी फर्डिनांट टी ब्रुक्स या शिक्षकाने जवाहरलालांमध्ये विज्ञानाची व वाचनाची आवड निर्माण केली. नेहरूंचे ग्रंथलेखन इंग्रजीत असून ते कारागृहातच झालेले आहे. ग्लिम्प्सिस ऑफ द वर्ल्ड हिस्टरी (१९३९), जवाहरलाल नेहरू :ॲन ऑटोबायग्राफी (१९३६) व डिस्कव्हरी ऑफ इंडिया (१९४५) हे त्यांचे तीन ग्रंथ विशेष महत्त्वाचे मानले जातात. इतिहासासारख्या विषयातही त्यांच्या काव्यात्म व रसिक शैलीने जिवंतपणा आणला आहे. ग्लिम्प्सिस ऑफ द वर्ल्ड हिस्टरी हा ग्रंथ त्यांनी मुख्यतः आपल्या कन्येसाठी-‘प्रियदर्शिनी इंदिरा हिच्यासाठी’-लिहिला. तिला लिहिलेल्या पत्रांचे ते संकलन आहे. त्यात त्यांची इतिहासाकडे पाहण्याची शैक्षणिक दृष्टी दृग्गोचर होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथात नेहरूंनी अतिप्राचीन काळापासून सद्यःस्थितीपर्यंतचा संगतवार इतिहास संक्षिप्तपणे मांडलेला असून भारताच्या इतिहासातील प्रेरणांचे धागेदोरे जुळवून त्यांची तात्त्विक पार्श्वभूमी काय आहे, याचा शोध घेतला आहे. जवाहरलाल नेहरू : ॲन ऑटोबायग्राफी या आत्मचारित्रात त्यांनी १९३६ पर्यंतच्या जीवनाचा आढावा घेतलेला असून त्यात माता, पिता, भगिनी, पत्नी या कुटुंबियांविषयी जसे लिहिले, तसेच तुरुंगातील सन्मित्र, सेवक, पशुपक्षी यांसंबंधी सहृदयतेने लिहिले आहे. व्यक्तीच्या अंतरंगात जो संघर्ष सतत चालू असतो, तोच कोणत्याही चरित्राचा किंवा आत्मचरित्राचा महत्त्वाचा घटक मानला जातो, हे सूत्र गृहीत धरून नेहरूंनी ही आत्मकथा लिहिली आहे. नेहरूंचे आत्मचरित्र लोकप्रिय झाले. त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. लेटर्स फ्रॉम ए फादर टू हिज डॉटर (१९२९) आणि ए बंच ऑफ ओल्ड लेटर्स (१९५८) ही नेहरूंची आणखी दोन पुस्तके. यांत नेहरूंची मोतीलाल, विजयालक्ष्मी पंडित, कृष्णा हाथिसिंग, इंदिरा गांधी वगैरे कुटुंबियांना, तसेच जगातील विविध लहानथोर व्यक्तींना लिहिलेली पत्रे व काहींची उत्तरे आहेत. पत्रलेखनशैलीचे हे दोन नमुनेदार ग्रंथ आहेत. ते आमरण पंतप्रधान तर होतेच, शिवाय इतर अनेक उच्च मानमरातब जनतेने त्यांना बहाल केले. अखिल भारतीय काँग्रेसचे पाच वेळा अध्यक्ष होणारे ते एकमेव नेते होत. देशातील ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन १९५५ मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. आफ्रो-आशियाई देशांचे स्वातंत्र्य व संघटना, अलिप्ततावादाचे धोरण आणि पंचशील तत्त्व यांचा पुरस्कार करून त्यांनी आंतरराष्ट्रीय सामंजस्य व शांतता यांसाठी अविरत प्रयत्न केले. त्यांची कृतज्ञतापूर्वक दखल घेण्यासाठी भारत सरकारतर्फे आंतरराष्ट्रीय सामंजस्य व शांतता यांसाठी नेहरू पुरस्काराची योजना कार्यान्वित करण्यात आली. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)
पंडित जवाहरलाल नेहरू
0
November 13, 2022
जवाहरलाल मोतीलाल नेहरू :
Tags