कोणत्याही काडीमोड कज्ज्यात वाद असतो तो पैशांचा.
युद्धकाळात ब्रिटनला प्रचंड कर्ज झाले होते. त्या कर्जाचा मोजा भारत पाकिस्तानच्या बोडक्यावर बसणारच होता.
सरकारी खात्यातला बँक निधी, बँक ऑफ इंडिया मधील सोन्याची गंगाजळी, ते अगदी दुर्गम असलेल्या नागा टेकड्यातील जिल्हा कमिशनरच्या पैशाच्या छोट्या पेटीतील उरलेल्या मळकट नोटा किंवा काही पोस्टाची उरलेली तिकिटे या साऱ्याची मोजदाद होऊन त्याची वाटणी करावी लागणार होती.
शेवटी शेवटी हे प्रकरण फारच कीचकट झाले, पटेल व चौधरी या दोघांनाही सरदार पटेल यांच्या शयनगृहात कोंडून पूर्ण एकमत झाल्यानंतरच बाहेर काढले.
रस्त्यावरच्या फेरीवाल्याशी करावी तशी घसाघीच झाल्यानंतर निर्णय झाला.
पाकिस्तानच्या वाट्याला बँकेतली रोकड व सोने याचा साडे सतरा टक्के भाग यावा व हिंदुस्थानच्या राष्ट्रीय कर्जाचाही तितकाच भाग त्यांनी उचलावा.
हिंदुस्तानच्या प्रशासकीय कचेऱ्यातून असलेल्या स्थावर मालमत्तेचा ८० भाग भारताला व २० टक्के पाकिस्तानला अशी विभागणी मान्य झाली.
देशभरातील सगळ्या कचेऱ्या आपल्या ताब्यातील साहित्याच्या याद्या तयार करू लागल्या. त्यात खुर्च्या, टेबल, खराटे, टंकलेखन यंत्रे ही आली. या सगळ्यांची वाटणी होताना वादावादी तर झालीच प्रसंगी मारामारी ही झाली.
खाते प्रमुखांनी त्यातल्या त्यात उत्तम उत्तम टाईपरायटर्स लपवून त्याऐवजी मोडकी यंत्रे दुसऱ्यांसाठी दाखवली. या धांगडधिंग्यात मी मी म्हणणाऱ्या दर्जेदार सुटा बुटातील अधिकाऱ्यांनीही सक्रिय भाग घेतला.ज्या माणसांनी आपल्या अधिकार खंडात हजारो निवाडे लिहिले ती माणसे दौत माझी, पाण्याचे भांडे तुझे, एका हॅट ठेवण्याच्या खुंटाळ्याची सांगड छत्री ठेवण्याच्या फडतळाशी, १२५ टाचणी पानांची सांगड एका शौचपात्रशी घालण्यात धन्यता मानू लागले. सरकारी निवासस्थानातील ताटे, वाट्या, चांदीची भांडी, तैलचित्रे या ही गोष्टी वादग्रस्त ठरल्या. एकाच बाबतीत चर्चा झाली नाही ती म्हणजे मद्याच्या बाटल्या ठेवयाच्या कोठे. त्या राहिल्या भारतात. पाकिस्तानला त्या मालाचा मोबदला मिळाला. अशी विभागणी होत असताना माणसाच्या शूद्र मनोवृत्तीचे संकुचित भावनांचे जे दर्शन घडले ते भयानकच होते.
एकमेकांच्या हातात हात घालून एकत्र नोकरी केलेल्यांची ही कथा !
सागरावर प्राण गमावलेल्या खलाशांच्या विद्वांना निवृत्तीवेतन कोणी द्यायचे..पाकिस्तानी एकूण एक मुस्लिम धर्माच्या विधवांची व हिंदुस्थानी हिंदू धर्मीय विधवांची मग त्या कोठेही असो जबाबदारी घ्यायची का..यासारखे ही प्रश्न पुढे आले. राष्ट्रीय हमरस्त्यावर वापरण्यात येणारे बुलडोझर, चाकाच्या मालगाड्या, खोरी, कुदळी, रेल्वेची इंजिने, डबे, मालगाडीचे डबे याची वाटणी करताना काय प्रमाण धरायचे याचाही निर्णय सहजा सहजी झाला नाही. इंडिया लायब्ररीतील ग्रंथाची वाटणी मजेशीर झाली, एन्सायक्लोपीडिया ग्रंथाचे खंड एका आड एक असे दोघांना दिले, शब्दकोशांची पाने अक्षरांच्या प्रमाणे ए पासून के पर्यंत हिंदुस्तानला व उरलेली पाकिस्तानला फाडून देण्यात आली, एखाद्या पुस्तकाची प्रत एकच असल्यास ज्या राष्ट्राला ज्या विषयात अधिक रस असेल त्याच्या हवाली ती केली गेली.
पोस्टाची तिकिटे व चलनी नोटा छापण्याचा कारखाना एकच होता साऱ्या उपखंडात. भारताने तो आपल्याकडे ठेवून घेतला.त्याचा परिणाम होऊन हजारो मुस्लिमांना भारतीय नोटांवर पाकिस्तान असा रबरी शिक्का मारून ते चलन व्यवहारासाठी वापरावे लागले.ही झाली नोकरशहांची रीत.
जहाल कट्टरांची मागणी अजबच होती.ताजमहालाचे तुकडे करावेत व समुद्रमार्गे ते पाकिस्तानला पाठवावेत ही त्यापैकी एक, कारण काय तर ताजमहल एका मोगल बादशहाने बांधला म्हणून. त्याच्या उलट हिंदू साधूंनी सिंधू नदीचा प्रवाह वळवून मागितला, कारण पंचवीस शतकापूर्वी तिच्या तीरावरच त्यांच्या पवित्र वेदग्रंथांचे लेखन पुरे झाले होते.
ब्रिटिश साम्राज्याच्या झगमगटाची साक्ष असणाऱ्या व्हाईसरॉयच्या राजेशाही किमती गाड्या ताब्यात घेताना कोणीही पुसटसा देखील नाखुशीचा सूर काढला नाही. व्हाईसरॉयची शुभ्र सुवर्णांकीत रेल्वेगाडी भारताला मिळाली.
सेना प्रमुख व पंजाबचे गव्हर्नर यांच्या खाजगी मोटारी पाकिस्तानला.
या सर्वांवर ताण करणारी विभागणी व्हाईसरॉय निवासातील घोडा गाड्यांची. एकूण गाड्या होत्या बारा. नक्षीदार बेलगुट्टी काढलेल्या, सोन्या चांदीच्या पत्रांनी मढवलेल्या, त्यांची चकचकीत खोगीरे, त्यांच्या मखमलीच्या गाद्या गिरद्या, सगळी वैभवाची डामडौलाची प्रतीके एकेकाळी भारतीय जनतेच्या रोशास पात्र ठरलेली, तेव्हा या गाड्यांची मोडतोड करणे मूर्खपणाचे ठरणार हे निश्चित. तर मग असे ठरले..एकाने सोन्याच्या व एकाने चांदीच्या घेऊन हा प्रश्न मिटवायचा पण माउंटबॅटन यांचे एडीसी लेफ्टनंट कमांडर पीटर हाॅव्ज यांनी सुचवले की नाणेफेकीचा कौल घ्यावा..
मग एक बाजूला मेजर याकुब खन, दुसरीकडे मेजर गोविंदसिंग तय्यार झाले.
रुपयाचे नाणे उडाले
गोविंदसिंग ओरडले.. 'छापा.. '
नाणे खाली उतरले.. जमिनीवर खळखळले.. तिघेही खाली वाकले..
मेजर गोविंदसिंग आनंदाने चित्कारले..
भारताचे दैव फळफळले !
नंतर इतर साहित्याची वाटणी झाली.
सगळ्यात शेवटी कोचमन वाजवत असलेले घोड्यांना हाकारायचे बिगुल उरले. आता त्याचे काय दोन तुकडे करायचे..?
हाॅव्ज साहेबांनी ते वर केले आणि म्हणाले, 'याची वाटणी करता येणार नाही, त्यावर एकच उपाय आहे, मीच ते माझ्यासाठी ठेवून घेतो. 'हसत हसत त्यांनी ते काखेत अडकवले आणि तिथून धुम ठोकली.
( अजून देखील ते शिंगं आता निवृत्त एडमिरल म्हणून जगत असलेले हाॅव्जसाहेब मोठ्या रसिकतेने आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना दाखवतात.)
संदर्भ - फ्रीडम ॲट मिडनाईट, ( लॅरी काॅलिन्स, डाॅमिनिक लॅपिए)