शांताराम

शांताराम - लेखक-  ग्रेगरी डेव्हिड राॅबर्ट्स
अनुवाद - अपर्णा वेलणकर 


ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट हे त्याचं खरं नाव,लीन,हे चोरलेल्या पासपोर्टवरचं नाव,लीनबाबा हे झोपडपट्टीत मिळालेलं नाव आणि शांताराम....मित्राच्या गावी गेल्यावर त्याच्या आईने ठेवलेलं नाव..

अनुवादक अपर्णा वेलणकर यांनी ह्याच्या भेटीला जातांनाचा प्रसंग सांगितला , तो उतरलेल्या हाॅटेलचा रस्ता टॅक्सीवाल्यालाही माहीत नाही, ग्रेगला फोन केला, लॅंडमार्क विचारण्यासाठी, तर म्हणाला, "टॅक्सीवाले को फोन दो यारों. "ऑस्ट्रेलियातुन आलेल्या या माणसाने "सुनो भैय्या" म्हणत माझ्या टॅक्सीवाल्यालाचा ताबा घेतला. वहासे राइट मारणा फीर लेफ्ट लेना करत त्याने आमची टॅक्सी रस्त्याला लावली,ऊधर ट्रॅफिक बहुत होगा उधर घुसना मत अशा सुचना देत शाॅर्टकट समजवले. शेवटी, "बाकी सब ठिक? " म्हणत टॅक्सीवाल्यालाच्या घरवालीची, पोराबाळांची चौकशी करून जय रामजी की म्हणून फोन बंद केला. 

 त्याच्या मुंबईतल्या जगण्याची कथा अनुवादित करतांना अपर्णा वेलणकर कुठेही कमी पडल्या नाहीत.

शांताराम वाचतांना अंगावर येतात ती माणसं.. त्यांच्यातलं प्रेम, दिलदारी आणि खुन्नसही, नैतिक  कृत्यामागच्या अनैतिक प्रेरणांचे धागे, आणि अनैतिकाच्या चिखलात फुललेल्या शुभ्र कोमल कमळकळ्या.......भन्नाट अकल्पनीय आयुष्याची आठ वर्षे या माणसाने मुंबईत काढली.हिंदी सोबत मराठीही बोलायला शिकला. 

सशस्त्र दरोडेखोरीच्या गंभीर आरोपाखाली वीस वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेला परंतु तुरुंग फोडून फरार झालेला ऑस्ट्रेलियाचा मोस्ट वॉन्टेड मॅन, इंटरपोलच्या यादीतही त्याचं नाव आलेलं. असा हा माणूस नकली पासपोर्टवर मुंबईत येवून स्थिरावला. मुंबईतल्या लिओपोल्ड क्लबमधे देशी विदेशी जीवाला जीव देणार्या मित्रासोबत प्रेमिकाही मिळवली. कार्ला.! हिरवा झाक असलेले डोळे, सौंदर्याची खाण असलेली. मुळची स्वित्झर्लंडची. पाच वर्षांपूर्वी एका रंगेल मित्रासोबत मुंबईत आलेली. आडव्या तिडव्या अंगाचा डिडिअर लेव्ही.मुंबईतल्या सगळ्या काळाबाजारातून ज्याला जे हवं ते देणारा, मादक पदार्थांपासून हत्यारं, नकली पासपोर्ट पर्यंत सगळंच. धंदा करणारी  जर्मन तरुणी उल्ला, जगात चांगुलपणा शिल्लक राहिलेला नाही असं तिला वाटायचं. तो गाईड बनलेल्या जेमतेम सातवी शिकलेला, तळहाताच्या रेषांइतकी मुंबईची माहिती असणारा प्रभाकरचा जिवाभावाचा मित्र बनला. इतका जवळचा की त्याच्या गावी जाऊन त्याच्या कुटुंबात राहिला. प्रभाकरच्या आईशी बोलतांना भाषेची अडचण यायची तेव्हा आईने सांगितलं, माझ्याशी बोलायचं तर माझी भाषा शिकावी लागेल. तो मराठी बोलायला शिकला. आईला त्याचं नाव उच्चारता येत नव्हतं म्हणून तिने नवीन नाव दिलं... 
शांताराम  ! 

तिथून मुंबईला परत येतांना बार मध्ये भाडणं केली. तो राग मनात धरून त्या टोळक्याने त्याची लुटमार केली. पैसे गेले ह्यापेक्षा पासपोर्ट गेला ह्याचं जास्त वाईट वाटलं. मुंबईत आल्यावर पैसा कमवणं भाग होतं. तेव्हा अंमली पदार्थ विकले.झोपडपट्टीत राहू लागला. तिथली गरीबी, अस्वच्छता रोगराई पसरवायची. तिथे तो डाॅक्टर बनला. उपचारासोबत औषधही मोफत द्यायचा, ही औषधे मिळवण्यासाठी अनेक उपद्व्याप केले. 

त्याच्यावर खार खाऊन गुन्हेगारी टोळ्यांनी पोलिसांना लाच देऊन त्याला खोट्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले, तिथे सहन करावे लागलेले अत्याचार. तिथुनही त्याला माफीयाने सोडवले. केलेल्या उपकाराची जाण म्हणून गुन्हेगारी जगतात माफीयासोबत ही जगला. डाॅन कादरभाई, अनैतिक धंद्यात नैतिकता पाळणारा, मुळचा अफगाणिस्तानचा त्याने आधार दिला त्याच्यासोबत अफगाणिस्तान मधे गेला. तिकडून आल्यावर मुंबईत रस्त्यावर टोळीयुध्दात सुरेबाजी केली. 

काय नाही केल़ त्याने असा प्रश्न उभा राहतो.या पुस्तकात त्याचा एवढाच मुंबईतला आठ वर्षाचा जीवनपट आहे.

त्याचं पुढचं आयुष्य वाचण्याची इच्छा आहे. जर्मनीत विमानतळावर पकडला गेल्यावर त्याला परत ऑस्ट्रेलियन तुरुंगात पाठवण्यात आले. शिक्षा पुर्ण भोगून झाल्यानंतर आता तो पुर्णवेळ लेखक झाला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.