पुरुषोत्तम भास्कर भावे : (१२ एप्रिल १९१० - १३ ऑगस्ट १९८०).
मराठीतीस एक अष्टपैलू व प्रतिभासंपन्न लेखक. कथा, कादंबरी, नाटक, ललित गद्य, व्यक्तिचित्र, चिंतनात्मक लेख, चित्रपटकथा, प्रवासवर्णन इ. विविध साहित्यप्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले. लेखन हा भाव्यांचा जीवनव्यापी व्यवसाय होता. वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी त्यांनी ‘ओम् फस्’ ही कथा लिहिली व आपल्या लेखनतपस्येचा श्रीगणेशा केला. त्यांची लेखनतपस्या आमरण टिकून होती.
लेखन हा भाव्यांचा जीवनव्यापी व्यवसाय होता. वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी त्यांनी ‘ओम् फस्’ ही कथा लिहिली व आपल्या लेखनतपस्येचा श्रीगणेशा केला. त्यांची लेखनतपस्या आमरण टिकून होती.
भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या त्यांच्या नौका या कथासंग्रहातील कथा तर एकूण मराठी कथासृष्टीत आपल्या पृथगात्म स्वरूपाने उठून दिसतात. जीवनातील तारूण्याचे व कारूण्याचे, शाश्वतेचे व नश्वरतेचे ते सारख्याच समरसतेने चित्रण करतात. करूणरसाप्रमाणेच हास्यरसाचेही दर्शन ते तेवढ्याच प्रभावीपणे घडवितात ‘आइसक्रिम’ ही त्यांची विनोदी कथा दृष्टीने उल्लेखनीय आहे. त्यांचे एकूण सत्तावीस कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांतूनही हेच जीवनदर्शन आढळते. नाटककार म्हणूनही भाव्यांनी लौकिक प्राप्त केला होता. अहमदनगर येथे १९६४ साली भरलेल्या मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करून नाट्यरसिकांनी भाव्यांच्या नाट्यसेवेचे कौतुक केले होते. भावे हे साहित्यक्षेत्रातील एक निरलस कर्मयोगी होते. त्यांची साहित्यसेवा लक्षात घेऊन पुणे येथे १९७७ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. ते उत्कृष्ट वक्ते होते. त्यांचा वक्तृत्वगुण त्यांच्या लेखनशैलीमध्ये उतरलेला दिसतो. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)