लेखिका - कांचन काशिनाथ घाणेकर
डॉ. काशिनाथ घाणेकर ह्यांना मराठीतील पहिले सुपरस्टार समजले जाते. चित्रपट सृष्टी व रंगभूमी गाजवणारा हा कलाकार कसा होता, हे त्यांच्या पत्नीशिवाय कोण जास्त चांगल्याप्रकारे सांगू शकेल.
कांचन ह्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना ह्यांच्या कन्या. एसएससी ला असतांना रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक आईबरोबर पहायला गेल्या असतांना पहिल्यांदा काशिनाथ घाणेकरांशी भेट झाली. नंतर हे भावबंध विस्तारत गेले.
डॉ. काशिनाथ घाणेकर हे एक कलाकार म्हणून कसे होते, एक माणूस म्हणून कसे होते ह्याचा गुणदोष दाखवत अगदी सहजपणे मन मोकळे केले आहे.
आपल्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी जीव तोडून अगदी जीवाची बाजी लावून अभिनय करणाऱ्या कलाकाराच्या डोक्यात यशाची नशा चढायची. यशाची नशा दारूपेक्षाही कितीतरी अधिक पटीने असायची. चार चौघांना लागू असणारे नियम आपल्यासाठी नाहीतच असा डॉक्टर समाज करून घ्यायचे. सभ्य आणि आदर्श नागरिकांनी सार्वजनिक क्षेत्रात वावरताना दुसऱ्यांना उपद्रव होईल असे वागायचे नसते, ही साधी गोष्ट ही ते नजरेआड करायचे. रंगभूमीवर प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारे डॉक्टर रंगमंचाबाहेर आपल्या वागण्याने त्यांच्या चाहत्यांना तितकेच दुःखी करायचे तरीही प्रेक्षकांनी उत्साहाने डॉक्टरांचे अमाप कौतुक केले. सुपरस्टार पदी बसवले.
डाॅक्टरांनी अनेक लोकांना मदत केली. थंडीच्या दिवसात ब्लॅंकेट वाटली. हाॅटेलमध्ये वेटर असलेल्या एका मुलाचा शिक्षणाचा खर्च उचलला.
डाॅक्टरांचा विवाह झालेला होता, पण अपत्यसुख लाभलेले नव्हते. कांचन आणि डाॅक्टरांच्या वयात पंधरा वर्षांचे अंतर होते. तरीही ते प्रेमात पडले. आपल्या पत्नीला घटस्फोट देण्यास त्यांचा विरोध होता. त्यामुळे सुलोचनाबाई या प्रेमप्रकरणाला विरोध करीत होत्या. पुढे बारा वर्षांनी जेव्हा त्यांच्या पत्नीने घटस्फोट दिल्यावर त्यांनी विवाह केला.
एकंदरीत डॉ. काशिनाथ घाणेकरांचा कलाकार म्हणून झालेला प्रवास, प्रेक्षकांचे मिळालेले उदंड प्रेम, तसेच त्यांच्या आयुष्यातील चढ उतार याचे प्रवाही वर्णन केले आहे. दिवसाला चाळीस सिगरेट ओढणारे, दारु पिणारे डाॅक्टर लग्नानंतर सुलोचनाबाईच्या घरी राहायला येतात तेव्हा सिगारेट दारुशिवाय बैचेन न होता राहू शकतात. कांचनच्या भावाच्या अकाली मृत्यूनंतर त्याच्या लहानग्या मुलीची संपूर्ण जबाबदारी घेतात. बायको मुलगी यांची भविष्यकालीन आर्थिक व्यवस्था लावणारा हा कलाकाराने नाटकाच्या दौऱ्यावर असताना शेवटची एक्झिट घेतली.