डॉ. बाबासाहेब आंबेडकर


 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर





( १४ एप्रिल १८९१ - ६ डिसेंबर १९५६ ) 

भारतीय घटनेचे शिल्पकार आणि बौद्ध धर्माचे अर्वाचीन संजीवक म्हणून विश्वविख्यात झालेले विधिज्ञ, समाजसुधारक, राजकारणपटू, दलितांचे अग्रणी, इतिहाससंशोधक आणि धर्मचिंतक. समाजकारण आणि राजकारण या दोन्ही आघाड्यांवर लढत असताना आंबेडकरांनी केलेला व्यासंग आणि ग्रंथरचना थक्क करणारी आहे. त्यांचे ग्रंथलेखन सरसकट इंग्रजीमध्ये आहे. हे लिखाण (भाषणांसह) प्रसिद्ध करण्याचं कार्य महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेले असून आतापर्यंत ११-१२ खंड प्रकाशितही झालेले आहेत. अर्थशास्त्र, इतिहास, समाजविज्ञान, भारतविद्या, राज्यशास्त्र असे चौफेर लेखन बाबासाहेबांनी केले. त्यातील विशेषतः जातिसंस्थेविषयक लिखाण हे नावीन्यपूर्ण आणि धक्का देणारे आहे. त्यात कास्टस् इन इंडिया : देअर मेकॅनिझम, जेनेसिस ॲड डेव्हलपमेंट सारखा शोधनिबंध, ॲनिलिसेशन ऑफ कास्टस्, हू वेअर दि शूद्राज?, दि अन्‌टचेबल्स इ. पुस्तकांचा समावेश होतो. भारताचा इतिहास लिहिणाऱ्यांनी बौद्ध कालखंडाची केलेली घोर उपेक्षा त्यांनी अचूक दाखवून दिलेली आहे. 




तत्कालीन ज्ञानव्यवहाराच्या आवश्यकतेमुळे आंबेडकरांना इंग्रजीमधून ग्रंथलेखन करावे लागले. परंतु मराठी भाषा बोलणाऱ्या अस्पृश्यांचे प्रश्न घेऊन केलेल्या चळवळीची गरज म्हणून आंबेडकरांनी अनेक मराठी वृत्तपत्रे चालविली व त्यातून मराठी लेखन केले. पत्रकार या नात्याने त्यांनी केलेले मराठी लेखन अत्यंत महत्त्वाचे असून त्याचा स्वतंत्र विचार करणे आवश्यक ठरते.पूर्ववयात केलेला संतवाङ्‌मयाचा व्यासंग आणि समकालीन मराठी साहित्याचे वाचन यामुळे, अगदी पहिल्यापासूनच आंबेडकरांची लेखणी प्रौढ आणि भारदस्त वाटते. 



मूकनायका ची स्थापना केल्यानंतर अवघ्या पाचसहा महिन्यांतच आंबेडकर उच्च शिक्षणासाठी परदेशी प्रस्थान गेल्याने त्यांच्या गैरहजेरीत हे पत्र बंद पडले.बहिष्कृत भारत हे आंबेडकरांचे दुसरे पत्र होय. बहिष्कृत भारता मधील आंबेडकरांचे अग्रलेख मराठी भाषेवरील लेणी ठरावीत इतके उत्कृष्ट वठले आहेत. जातिसंस्थेच्या आणि अस्पृश्यतेच्या समर्थकांशी आंबेडकरांनी जे बुद्धिनिष्ठ युक्तिवाद केले ते फार महत्त्वाचे आहेत. भारतीय टपाल खात्याने पाच वेळा त्यांच्या जन्मदिनानिमित्त टपाल तिकीट काढले होते. त्यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने २०१५ सालच्या नाण्यावर एका बाजूला त्यांचे चित्र कोरलेले होते. १९९० ला त्यांना मरणोत्तर "भारतरत्न" हा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले.  ( वाड्मय कोश) 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.