( १४ एप्रिल १९२७ - २ ऑक्टोबर २०२१ )
मिरासदारांनी ग्रामीण विनोदी कथांचे लेखन केले. प्रत्यक्ष पाहिलेले, ऐकलेले काही प्रसंग, भेटलेली नमुनेदार माणसे यांना मिरासदारांच्या कथेत नवे रूप लाभले. त्यांचे कथालेखन स्वतंत्र वळणाने घडत गेले .
प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचा आधार घेऊन, एक नवीनच मध्यवर्ती घटना घेऊन मिरासदारांनी कथा लिहिल्या. या मध्यवर्ती घटनेशी एकरूप झालेला भोवतालचा परिसर, कथेतली माणसे, वातावरणनिर्मिती यांच्या एकत्र परिणामातून संपूर्णपणे नवीन ग्रामीण कथा मिरासदारांनी लिहिली. त्यांच्या कथेत असणारी मुख्य घटना, त्या घटनेमध्ये सहभागी असणारी माणसे, त्यांचे विशिष्ट असे स्वभाव, त्या स्वभावांमुळे घडणारे गमतीदार प्रसंग, माणसांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वभावांतून व्यक्त होणार्या मानवी वृत्ती, प्रवृत्ती, यांचे चित्रण केलेले दिसते.
द.मा.मिरासदारांच्या ग्रामीण विनोदी कथांमध्ये त्यांच्या स्वतंत्र कल्पनाशक्तीमधून जन्माला आलेले प्रसंग कथेमध्ये विनोद उत्पन्न करतात. कथेतल्या एखाद्या पात्राची होणारी फजिती, साक्षीदार असणारी दुसरी पात्रे त्या माणसाच्या फजितीला हसतात. हसताहसता आपणही इतरांच्या दृष्टीने कसे आणि कधी हास्यास्पद झालो, हे माणसांच्या लक्षात येत नाही. एका व्यक्तीकडून पसरत जाणारी हास्याची लाट कथेमध्ये जिवंतपणा आणते. ‘बापाची पेंड’, ‘नव्याण्णवबादची सफर’ यांसारख्या त्यांच्या कथा त्या दृष्टीने वाचण्यासारख्या आहेत.
पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
( संदर्भ - महाराष्ट्र नायक)