( २७ ऑगस्ट १९१९ - १५ एप्रिल २०१३ )
वामन पंडितांच्या ‘यथार्थदीपिका’ या ग्रंथाचा एक गीताभाष्य या दृष्टीने चिकित्सक अभ्यास करून १९५७ साली पुणे विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी त्यांनी मिळवली.‘भगवद्गीतेचे तीन टीकाकार’ , ‘ग्रंथवेध’, ‘रामकृष्ण संघः-एक शतकाची वाटचाल’ , ‘ज्ञानेश्वरी दर्शन’, ‘वेध ऋणानुबंधांचा’, ‘ज्ञानदेवांचा गीतासंवाद’ , ‘ज्ञानदेव : विवेकानंद’, ‘तीन सरसंघचालक’, ‘विश्वमानव स्वामी विवेकानंद खण्ड एक ते तीन’ , ‘रामकृष्ण विवेकानंद आणि गुरुबंधू’ , ‘ख्रिस्त, बुद्ध आणि श्रीकृष्ण’, हे करंदीकर यांचे ग्रंथलेखन आहे.
त्यांचे ‘विदेश संचार आणि मुक्त चिंतन’ हे प्रवासवर्ण इंग्लंड व अमेरिका या देशांत घडलेल्या प्रवासावर आधारित आहे. ‘कुणा यात्रिकाचा जीवनसंवाद’ हे करंदीकर यांचे साडेसहाशे पृष्ठांचे आत्मचरित्र त्यांच्या आयुष्यातील बहुतेक सर्व महत्त्वाच्या प्रसंगांची हकीकत विस्ताराने नोंदवते.
समीक्षक या नात्याने ‘ग्रंथवेध’ आणि ‘ग्रंथशोध’ या दोन पुस्तकांत त्यांनी केलेली विस्तृत परीक्षणे आली आहेत.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने सिद्ध व्हावयाच्या मराठी शब्दकोशाचे प्रमुख संपादक या पदावर ते चार वर्षे कार्यरत होते.१९८८ मध्ये पुणे विद्यापीठात स्थापन झालेल्या ज्ञानदेव अध्यासनाचे प्राध्यापक म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले. सुमारे साडेतीन वर्षे त्यांनी ते काम केले.
( संदर्भ - महाराष्ट्र नायक )