वासुदेव सीताराम बेंद्रे :(१३ फेब्रुवारी १८९४ - १६ जुलै १९८६ ). व्यासंगी मराठी इतिहासकार. इतिहास संशोधन आणि इतिहास लेखन ह्या क्षेत्रा मध्ये ज्यांनी अनन्य साधारण असे काम केले अशा दिग्गजांच्या यादीतील एक क्रियाशील व्यक्ती म्हणजे इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे होय.वेगवेगळ्या विषयांची हाताळणी सविस्तरपणे करण्यात म्हणजेच वैविध्य आणि वैपुल्य या दोन्ही आघाड्यांवर वा.सी.बेंद्रे ह्यांची कामगिरी अतुलनीय आहे बेंद्रे ह्यांचा पहिला ग्रंथ साधनचिकित्सा (१९२८) हा होय. शिवशाहीच्या इतिहासाचा हा प्रास्तविक खंड असून इतिहाससंशोधनाच्या साधनांची मार्मिक चिकित्सा त्यात करण्यात आली आहे. त्यानंतर मराठी इतिहासावर त्यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत. तथापि छत्रपति संभाजी महाराज (१९६०) हा त्यांचा सर्वांत गाजलेला ग्रंथ होय. संभाजी महाराज हे एक तेजस्वी, कर्तबगार व पराक्रमी पुरुष होते निग्रही स्वराज्यनिष्ठेने आपल्या कारकीर्दीचा क्षण न् क्षण त्यांनी परकीय आक्रमणाशी झगडण्यात घालविला व शेवटी स्वतःचे बलिदान केले, असा निष्कर्ष बेंद्रे ह्यांनी ह्या ग्रंथात काढलेला आहे. त्यांनी बलिदान केले की त्यांचे बलिदान झाले याविषयी मतभेद होऊ शकेल, तथापि संभाजी महाराजांबद्दलच्या रूढ समजुतींना बेंद्रेकृत ह्या चरित्राने धक्का दिला.संत तुकाराम महाराजांबद्दलही बेंद्रे ह्यांनी केलेले संशोधन फार मोलाचे आहे.त्यांच्या अन्य ग्रंथांत सतराव्या शतकांतील गोवळकोंड्याची कृत्बशाही, अ स्टडी ऑफ मुस्लिम इन्स्क्रिप्शन्स, महाराष्ट्र ऑफ द शिवाजी पिरिअड व श्री छत्रपती शिवाजी महाराज इ. ग्रंथांचा त्यात समावेश होतो. तारीख–इ–इलाही, राजाराम चरितम् हे त्यांनी संपादिलेले उल्लेखनीय ग्रंथ होत. लघुलेखनावरही त्यांनी मराठी ग्रंथलेखन केले आहे.( संदर्भ - मराठी विश्वकोश , म ना अदवंत)