स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर


विनायक दामोदर सावरकर  (२८ मे १८८३–२६ फेब्रुवारी १९६६). भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे क्रांतिकारक. ‘मित्रमेळ्याचे ’ काम करीत असताना सावरकरांचे लेख, कविता इ. साहित्य ठिकठिकाणी प्रसिद्घ होत होते आणि प्रभावीही ठरत होते.उच्चशिक्षणासाठी लंडनला असतांना जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र व राजकारण  हा ग्रंथ अनुवादित केला. १८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर  ह्या ग्रंथाचे हस्तलिखितही पूर्ण केले. 
ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनची हत्त्येत सहभागी असल्याने त्यांना भारतात आणुन खटला चालवला, त्यात त्यांना पन्नास वर्षाची जन्मठेपेची शिक्षा सुनावली व अंदमानात कैदेत ठेवले, तीथे अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांनी 'कमला' हे खंडकाव्य रचले.

 काही वर्षांनी तिथून  सुटका झाली पण रत्नागिरीत स्थानबद्ध ठेवले,तिथे त्यांनी हिंदुत्व (मूळ ग्रंथ इंग्रजी मराठी अनुवाद, १९२५) आणि माझी जन्मठेप  (१९२७) हे ग्रंथ लिहिले.

 सावरकर हे वृत्तीने कवी होते. ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता त्यांना एका तीव्र भावावेगाच्या प्रसंगी सुचली. रानफुले  (१९३४) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहात त्यांचे कमला  हे खंडकाव्य, काही स्फुट काव्ये आणि वैनायक वृत्ताचा विशेष सांगणारा एक निबंध अंतर्भूत आहे. त्यांची संपूर्ण कविता सु. १३,५०० ओळींची भरेल. सावरकरांची कविता  (१९४३) ह्या नावाने त्यांची कविता संकलित करण्यात आली आहे. माझी जन्मठेप  ह्या त्यांच्या ग्रंथात अंदमानातील तुरुंगवासाचा आत्मचरित्रपर इतिहास आहे. माझ्या आठवणी  (जन्मापासून नाशिकपर्यंत, १९४९), भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने  (२ खंड, १९६३) आणि शत्रूच्या शिबिरात  (१९६५) हे त्यांचे अन्य काही उल्लेखनीय ग्रंथ होत. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने   ह्या ग्रंथात बौद्घकाळाच्या आरंभापासून इंग्रजी राजवटीच्या अखेरीपर्यंत ज्या स्त्री-पुरुषांनी राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी पराक्रम केला, त्यांचा इतिहास आहे. 

शत्रूच्या शिबिरात  हे त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांपैकी एक. मला काय त्याचे   ? अथवा मलबारांतील मोपल्यांचे बंड (आवृ. दुसरी, १९२७) आणि काळे पाणी  (१९३७) ह्या त्यांच्या दोन कादंबऱ्या. उःशाप  (१९२७), संन्यस्त खड्‌ग (१९३१) आणि उत्तरक्रिया (१९३३) ही त्यांनी लिहिलेली नाटके. सावरकरांचे जात्युच्छेदक निबंध (१९५०) त्यांची जातिभेदनिर्मूलक भूमिका स्पष्ट करतात. त्यांच्या इंग्रजी ग्रंथांत वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स १८५७, हिंदुपदपादशाही, हिंदुराष्ट्र दर्शन, हिस्टॉरिक स्टेटमेंट्स   आणि लेटर्स फ्रॉम द अंदमान (जेल) ह्यांचा समावेश होतो. हे सर्व साहित्य समग्र सावरकर वाङ्‌मय  (खंड १ ते ८, १९६३–६५)ह्यात समाविष्ट आहे.मुंबई येथे १९३८ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.तसेच १९४३ मध्ये सांगली येथे भरलेल्या नाट्यशताब्दी महोत्सवाचे तेअध्यक्ष होते. त्याच वर्षी त्यांना नागपूर विद्यापीठाकडून डी.लिट्. ही सन्माननीय पदवी देण्यात आली. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.