कुसुमाग्रज

विष्णु वामन शिरवाडकर ( २७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९ ) मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. १९३० साली हं. प्रा. ठाकरसी विद्यालयात ते होते तेव्हा 'रत्नाकर' मासिकातुन त्यांच्या कविता प्रसिध्द होत. अस्पृश्य समजल्या जाणार्‍या लोकांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून १९३२ साली जो सत्याग्रह झाला त्यात त्यांनी सहभाग घेतला होता, त्यामूळे बाल्यावस्थेतील त्यांच्या लिखाणाला प्रौढत्वाची लकाकी चढून हळूहळू त्यांच्या साहित्याने आकाशाला गवसणीच घातली. ज्यात त्यांनी फक्त कविताच नाही तर कथा, कादंबर्‍या, नाटके, ललित साहित्य याबरोबर प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धनुर्धारी व नवयुग यामध्ये पत्रकारिता पण केली. १९४२ साली प्रसिध्द झालेला 'विशाखा' हा काव्यसंग्रह म्हणजे मराठी वाङमयातील उच्च कोटीचे वैभव होय. जे आजही मराठी साहित्यप्रेमींना भुरळ घालते.

 'मराठी माती', 'स्वागत', 'हिमरेषा' यांचबरोबर 'ययाती आणि देवयानी' व 'वीज म्हणाली धरतीला' ही नाटके १९६० ते १९६६ साली प्रसिध्द झाली. सार्‍या साहित्य कृतींना राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९४६ साली 'वैष्णव' ही कादंबरी व 'दूरचे दिवे' हे नाटक प्रसिध्द झाले.
'नटसम्राट' ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती तर होतीच पण त्याचे नाटयप्रयोगही खूप गाजले. नाटयवेडया मराठी रसिकांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. अत्यंत नाजुक व भावुक विषयाला हाताळणारे हे नाटक वयोवृध्दांचा दृष्टीकोन बदलणारे ठरले कारण अनेक वृध्दांनी हे नाटक पाहिल्यावर आपले मृत्यूपत्र बदलले. तरूणांचाही वृध्दांकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला.

नाशिकमधील अनेक चळवळींचे ते प्रणेते होते.नाशिकच्या प्रसिध्द सार्वजनिक वाचनालयाचे ते १९६२ ते १९७२ पर्यंत अध्यक्ष होते. ते दशक वाचनालयाचे सुवर्णयुग समजले जाते. १९६४ च्या गोवा येथील साहित्य सम्मेलनाचे तसेच १९७० च्या कोल्हापूर येथील नाट्यसम्मेलनाचे अध्यक्ष होते. १९८९ ला मुंबई येथील जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. १९८८ साली साहित्याचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. १९९१ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन व मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.( संकलीत)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.