नामदेव ढसाळ


नामदेव ढसाळ ( १५ फेब्रुवारी १९४९ - १५ जानेवारी २०१४ )  कविता ही त्यांच्या स्वतःच्या प्रातिभिक सामर्थ्याची साक्ष तर आहेच, पण त्याबरोबर ती तिच्या निर्मितीकाळाशी अभिन्नपणे निगडित आहे. काळाचे सर्व चढ-उतार तिने पाहिले आहेत, पचवले आहेत. ढसाळांच्या लेखनामागे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि कृतींचा पाया आहे,सातत्याने कवितालेखन, अखंड चणचण आणि त्यासाठी करायची धावपळ, राजकीय आयुष्यातल्या उलथापालथी, दलित पॅन्थरचा उदयास्त, खासगी आयुष्यातले ताणतणाव हे सगळे पेलत, प्रदीर्घ काळ ‘मायस्थेनिया ग्राव्हिस’ या दुर्धर आजाराने ग्रासले असतानाही त्यांची कविता ताज्या दमाने उसळी घेताना दिसते. स्वतःला आणि भोवतालाला तपासत पुढे जाताना दिसते.ढसाळांच्या कवितेचा प्रभाव मराठी कवितेवर अटळच आहे. पण तो भारतीय भाषांतूनही आहे. जर्मन भूमीवर त्यांना कविता-वाचनासाठी निमंत्रित करण्यात आले (बर्लिन फेस्टिव्हल, जून २००१), त्यांची ही अविरत ऊर्जा त्यांच्या गद्यलेखनातही पाहता येते. सामना, आज दिनांक या वृत्तपत्रांतले सदरलेखन, राजकीय गरजेचे लेखन, कादंबरीलेखन हे तर आहेच. शिवाय ‘विद्रोह’, ‘सत्यता’ अशा अनियतकालिकांचे प्रकाशन, आंतरराष्ट्रीय साहित्योत्सव फेब्रुवारी -२००७ आणि फेब्रुवारी-२००८ यांचे आयोजन अशा उपक्रमांतूनही ही ऊर्जा प्रत्ययास येते.१९९९ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००४ साली साहित्य अकादमीने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सगळ्या भाषांतून एकाच कवीची निवड विशेष पुरस्कारासाठी केली; ती नामदेव ढसाळ यांची होती. ‘The Poet of Underworld’  हा त्यांच्या कविताच्या इंग्रजी अनुवादाचा ग्रंथ (अनुवाद- दिलीप पुरुषोत्तम चित्रे,) चेन्नईच्या एस.आनंद नावायन प्रकाशनातर्फे आला आणि त्या प्रकाशनाला ब्रिटीश कौन्सिलचा २००७चा पुरस्कार मिळाला. मराठी भाषेतले बहुतेक सगळे महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. ( संदर्भ - महाराष्ट्र नायक)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.