पण लक्ष्यांत कोण घेतो ?, मी, यशवंतराव खरे आणि गणपतराव ह्या त्यांच्या विशेष महत्त्वाच्या सामाजिक कादंबऱ्या होत. पण लक्ष्यांत कोण घेतो ? ही आत्मकथनपद्धतीने लिहिलेली मराठीतील पहिली कादंबरी होय. म्हैसूरचा वाघ ही त्यांनी लिहिलेली पहिली ऐतिहासिक कादंबरी.त्यानंतर गड आला पण सिंह गेला (१९०४), चंद्रगुप्त (१९०५), रूपनगरची राजकन्या (१९०९), वज्राघात (१९१५), सूर्योदय (१९१७). केवळ स्वराज्यासाठी (१९१८), सूर्यग्रहण (अपूर्ण- १९१९), कालकूट (अपूर्ण- १९२६), मध्यान्ह (अपूर्ण- १९२७) आणि उषःकाल (५ वी आवृ. १९२९) अशा आणखी दहा ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.
ऐतिहासिक कादंबर्यांच्या लेखनासाठी त्या त्या विषयासंबंधी उपलब्ध असलेल्या इतिहासाचा काळजीपूर्वक अभ्यास हरिभाऊ करीतच परंतु दंतकथा, लोककथा , पोवाडे इत्यादींचा उपयोगही तारतम्याने करून घेत. काही काल्पनिक व्यक्तिरेखाही त्यांनी निर्माण केल्या असल्या, तरी ऐतिहासिक वाटाव्या इतक्या जिवंतपणे त्या रेखाटलेल्या आहेत.त्यांची कादंबरी अवतरताच मराठी कादंबरीने प्रगतीचा एक फार महत्त्वाचा टप्पा गाठला. अनेक अनिष्ट वाङ्मयीन संकेतांतून मराठी कादंबरीस त्यांनी मुक्त केले. तिला अद्भुत आणि असंभाव्य घटनांच्या पकडीतून सोडवून वास्तवाच्या दिशेने विकसित केले.हरिभाऊंनी लिहिलेल्या स्फुट गोष्टींनी (चार भाग, १९१५) मराठी लघूकथेचा पाया घातला.
त्यांनी काही नाटके व प्रहसने लिहिली आहेत. संत सखूबाई (१९११), सती पिंगला (१९२१) ही त्यांची स्वतंत्र नाटके. याशिवाय व्हिक्टर हयूगो, काँग्रीव्ह, शेक्सपिअर, मोल्येर यांच्या नाट्यकृतींची त्यांनी रूपांतरे केली. रवींद्रनाथांच्या गीतांजलीचा त्यांनी गद्यानुवाद केला.अकोला येथे १९१२ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)