(५ सप्टेंबर १८९५-१३ एप्रिल १९७३).
श्रेष्ठ मराठी संशोधक व लेखक. प्रियोळकरांनी साक्षेपीपणे संपादिलेल्या विविध ग्रंथांत रघुनाथपंडितकृत दमयंती स्वयंवर (१९३५) आणि मुक्तेश्वरकृत महाभारताचे आदिपर्व (खंड १ ते ४ ) हे विशेष उल्लेखनीय होत.
आधुनिक पाठचिकित्साशास्त्राचा अवलंब करून, अनेक हस्तलिखितांच्या आधारे, प्रियोळकरांनी त्यांच्या संहिता निश्चित केल्या आणि त्या निमित्ताने आधुनिक, शास्त्रीय पाठचिकित्सेची तत्त्वे आणि मराठीतील ग्रंथांच्या संदर्भात पाठचिकित्सेसमोर उपस्थित होणारे प्रश्न ह्यांची चर्चा केली.
दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे आत्मचरित्रही ज्यांनी संपादिले . दादोबांच्या आत्मचरित्रात त्यांच्या जीवनातील १८४७ पर्यंतच्याच घटना आलेल्या असल्यामुळे प्रियोळकरांनी ह्या आत्मचरित्राला पूरक म्हणून दादोबांचे चरित्र लिहिले. त्यांच्या अन्य संपादित ग्रथांत जगन्नाथशास्त्री क्रमवंत, गंगाधरशास्त्री फडके आणि बाळशास्त्री घगवे या शास्त्रीत्रयाने रचिलेले महाराष्ट्र भाषेचे व्याकरण , प्रा. केरूनाना छत्रे ह्यांची टिपणवही, आणि लोकहितवादीकृत निबंधसंग्रह ह्यांचा समावेश होतो. काही ख्रिस्ती मराठी साहित्यही त्यांनी संपादिले आहे. मराठी मुद्रणकलेच्या आरंभकालातील मराठी
ग्रंथांची यादी मराठी दोलामुद्रिते ह्या नावाने त्यांनी केली आहे .ग्रंथसंपादनाबरोबरच मौलिक असे इंग्रजी-मराठी ग्रंथलेखनही प्रियोळकरांनी केलेले आहे. द प्रिंटिंग प्रेस इन इंडिया , गोवा री-डिस्कव्हर्ड , द गोवा इंक्विझिशन, ग्रांथिक मराठी भाषा आणि कोंकणी बोली हे असे काही ग्रंथ होत. श्रेष्ठ संशोधक म्हणून प्रियोळकर प्रसिद्ध असले, तरी आरंभी त्यांनी कविता, कादंबरी असे काही ललित लेखन केलेले आहे. प्रिय आणि अप्रिय ह्या त्यांच्या लेखनसंग्रहातूनही लालित्याचा प्रत्यय येतो.
१९५१ला कारवार येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
(संदर्भ - मराठी विश्वकोश)