मराठी गझल विश्वातील अजरामर नाव. या नावाशिवाय मराठी गझल हा विषय पूर्ण होऊ शकत नाही.
बालपणी पोलिओने पाय अधू झाल्याने काहीसे दुर्लक्षित जगणे वाट्याला आले. आईला असलेली कवितेची आवड अनुवांशिकतेने त्यांच्यात आली आणि त्यांनी लिहायला सुरुवात केली.काही वेळा नापास होत कसेतरी शिक्षण पूर्ण करुन ते नौकरीला लागले.
ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते आणि १९६१ मध्ये ‘रुपगंधा’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. सुरेश भट यांनी उर्दू भाषेतील शेर, शायरी, गझल यांचा आयुष्यभर मनापासून अभ्यास केला. गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला. हा त्यांचा प्रयास त्यांना ‘गझल सम्राट’ हा मनाचा किताब देवून गेला.
त्यांच्या दर्जेदार कवितांमुळे एक कवी म्हणून महाराष्ट्रात ते नावाजले जाऊ लागले. त्यानंतर ‘एल्गार’, ‘रंग माझा वेगळा’, ‘झंझावात’ इ. संग्रह प्रकाशित झाल्यावर तर भटांचा वेगळा रंग सगळ्यांनाच भावला.
मृदू आणि हळूवार असणारी त्यांची कविता अनेकवेळा बाणाच्या टोकासारखी तीक्ष्ण आणि बोचरी अशी औपरोधिक बनत असे, त्यावेळी कवी म्हणून असलेल्या त्यांच्या कोमल मनाचे एक टोक तर समाजातील लाचारी, स्वार्थ, ढोंगीपणा यावर प्रहार करणारे मनाचे दुसरे टोक आपल्याला दिसते. खालील त्यांच्या गीतातून हीच प्रचिती जागोजाग येते. ‘चल उठ रे मुकुंदा’, ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’ यातून दिसणारा निर्मळ भक्तिभाव, तर ‘मलमली तारुण्य माझे’ किवा ‘मालवून टाक दीप’ या गाण्यातून उमलणारा शृंगार किवा विरहाची भावना याच्या अगदी उलट ‘पूशर्तता माझ्या व्यथेची’ वा ‘उषःकाल होता होता कालरात्र झाली’ या त्यांच्या शब्दातून उद्धृत होणारी समाजातील मूल्यहीनता आपल्या नजरेसमोर येते आणि सुरेश भटांच्या अनेक पदरी, अनेक रंगी असलेल्या प्रतिभेतून त्याचं व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर स्पष्ट होत जातं.
सुरेश भटांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फूटपाथावर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या.
बीएला दोनदा नापास झालेल्या सुरेश भटांचा ‘रंग माझा वेगळा’ हा काव्यसंग्रह नंतर ३ विद्यापिठांत एम.ए.साठी अभ्यासक्रमात क्रमिक पुस्तक म्हणून ठेवला गेला.गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.