पांडुरंग वामन काणे

पांडुरंग वामन काणे  
(७ मे १८८०-१८ एप्रिल १९७२).

 विख्यात प्राच्यविद्यासंशोधक आणि धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक.
वकीलीचा व्यवसाय करीत असताना, तसेच इतर अनेक अंगीकृत जबाबदाऱ्या पार पाडीत असताना त्यांचे संशोधनकार्य सातत्याने चालू होते. हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र (१९३०-१९६२) हा पंचखंडात्मक आणि साडेसहा हजारांहून अधिक पृष्ठांचा ग्रंथ हे काण्यांच्या प्रदीर्घ कार्याचे आणि व्यासंगाचे फलित होय. हिंदू धर्मशास्त्राचे त्यात व्यापक आणि अधिकारपूर्ण विवेचन आहे. हिंदू धर्माच्या पुनर्रचनेच्या मार्गदर्शक तत्वांचा वेध घेणे, हा त्यांच्या धर्मशास्त्रसंशोधनाचा एक महत्वाचा हेतू होता. साहित्य अकादेमीने ह्या  ग्रंथाच्या चौथ्या खंडास (१९५३) पारितोषिक दिले (१९५६). ह्या ग्रंथास आंतरराष्ट्रीय कीर्तीही लाभली.

हिस्टरी ऑफ संस्कृत पोएटिक्स (तिसरी सुधारित आवृ.१९६१) हा त्यांचा आणखी एक विशेष महत्वाचा ग्रंथ. त्यातील विवेचन एकूण दोन भागांत आलेले आहे.
पहिल्या भागात भारतीय साहित्यशास्त्र विषयक महत्त्वाचे ग्रंथ, त्यांचे कर्ते आणि काल इ. विषयांचा परामर्श घेतलेला असून दुसऱ्यात अलंकार शास्त्राचे विषय आणि भारतीय साहित्यशास्त्राच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे दाखविलेले आहेत.
ह्याशिवाय पूर्वमीमांसा, शंखलिखिताचे धर्मसूत्र, कात्यायनस्मृति, हिंदू कायद्याचा वैदिक मूलाधार, शंकराचार्यापूर्वीचे वेदान्त भाष्यकार, विज्ञानेश्वरांचे पूर्वसूरी, कोहलाचे अवशेष, प्राचीन संस्कृत साहित्यातील पहलव आणि पारसिक, तंत्र वार्तिक व धर्मशास्त्रग्रंथ इ. विविध विषयावरील त्यांचे लेखन-संकलन प्रसिध्द झालेले आहे.
साहित्यदर्पण, कादंबरी, उत्तररामचरित, हर्षचरित, व्यवहारमयूख ह्यासारख्या ग्रंथांचे त्यांनी संपादन केले.भारतरामायणकालीन समाजस्थिति (१९११) आणि धर्मशास्त्रविचार (१९३५) हे त्यांच्या महत्वाच्या मराठी ग्रंथांपैकी होत. 

कालिदासाच्या धार्मिक व तत्वज्ञानविषयाक कल्पना, कालिदासीय ज्योतिष, विदर्भ व महाराष्ट्र, कवी भास व त्याची नाटके इ. विषयांवरही त्यांनी मराठीतून स्फुट लेखन केले.. . बिटिश शासनाने त्यांना महामहोपाध्याय ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. (१९४२). अलाहाबाद व पुणे विद्यापीठांनी त्यांना अनुक्रमे १९४२ व १९६० मध्ये डी. लिट. ही सन्माननीय पदवी दिली. १९५१ मध्ये लंडन स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीज ह्या संस्थेचे सन्माननीय फेलो करण्यात आले. संस्कृत भाषेचे मान्यवर विद्वान म्हणून त्यांना राष्ट्रपतींचे प्रशस्तिपत्र देण्यात आले. (१९५८). 

`भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च बहुमान त्यांना १९६३ मध्ये प्राप्त झाला. ( संदर्भ - मराठी विश्वकोश) 
    

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.