सिबिल -
लेखिका - फ्लोरा ऱ्हेटा श्राइबर
अनुवाद - माधवी कोल्हटकर
सिबिल इझाबेल डोर्सेट’ हे नाव बदलेली ही व्यक्ती खरी आहे. तिला आपली ओळख दाखवायची नाही.
अमेरिकेत घडलेली सत्यकथा आहे ही.
अगदी लहानपणापासून सिबिलला आईचे प्रेम मिळालेच नाही. मिळाला तो तिरस्कार, न केलेल्या चुकांची शिक्षा, घरातली प्लेट कोणाकडूनही फुटली तरी आळ यायचा सिबिलवरच. एकदा तिच्या आईने तिला जिन्यावरुन ढकलून दिले होते. कामाच्या व्यापामुळे वडीलांना तिच्याकडे लक्ष्य द्यायला वेळ नव्हता. आजी जवळ घ्यायची तेव्हा आई आजीलाही रागवायची.
सगळीकडून दुर्लक्षीत झाल्यामुळे ती आतल्या आत कुढत राहीली विझत राहीली.
बालपणी मन अत्यंत संवेदनशील असते. ते नेहमी स्वत: भोवती सुरक्षाकवच तयार करीत असते. कळत.. नकळतपणे!
जसं जसं वय वाढू लागलं तसतसे तिला विचित्र अनुभव यायला लागले. तिचा दिवसा-तासांचा मेळ बसेना. आयुष्यातला बराच काळ हा आपण न जगताच जातो आहे, असं तिला वाटायचं. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यापेक्षा आपलं आयुष्य काहीतरी वेगळं आहे; कुठेतरी, काहीतरी चुकतं आहे, असं वाटू लागलं. तिचे दिवस चक्क हरवत होते.शाळेत पाढे येत नाही म्हटल्यावर शिक्षक चिडून म्हणायचे काल म्हणून दाखवला होता आज कशी विसरली. तो पाढा शिकवल्याच़ तिला आठवायचंच नाही. पुढे काॅलेज मधून तिला परत पाठवलं गेलं.
शेवटी धाडस करून ती मनोविकारतज्ज्ञांकडे गेली. त्यांनी तिचा सर्व इतिहास जाणून घेऊन निदान केलं, ते भग्नव्यक्तित्वाचं.
‘सिबिल’ मध्ये एकूण सोळा व्यक्तित्वं आढळली. त्यातली पेगीसारखी काही व्यक्तित्वं भरपूर खात, हिंडत, उल्हासाने जगत, तर सिबिल ॲन्सारखी इतर काही एक पाऊल उचलण्याच्या कल्पनेनंही थकून जात. हॅटी पुष्ळकळदा तोडफोड करायची, व्हिटी मात्र शांत होती. दोन पुरुषी व्यक्तिमत्वेसुध्दा होती.
मानवी वर्तनाचे आपल्या परीने अर्थ लावणाऱ्या अबोध मनाच्या अलोट सामर्थ्याचे दर्शन तर यातून होतेच, पण विघातक कौटुंबिक संबंध, संकुचित पूर्वग्रहदूषित धार्मिक पार्श्वभूमीचा दुबळे करणारा परिणाम. घरातील व्यक्तींचे आचरण हे ही बालमनावर अदृश्यपणे परिणाम करीत असतात.
ही कहाणी म्हणजे बालसंगोपन कसे करू नये. याचा तर वस्तुपाठच आहे.
लेखिकेने ‘सायन्स डायजेस्ट’च्या मानसोपचारशास्त्र विभागात संपादक म्हणून काम केले असल्याने डॉ विल्बुरांनी सिबिलची केस सांगीतली.
ही विलक्षण घटना केवळ मेडिकल जर्नल मध्ये देऊन भागणार नव्हतं, कारण वैद्यकीय दृष्ट्या तर ती अत्यंत महत्त्वाची होतीच, पण त्याखेरीज सर्वसामान्य वाचकालाही रस वाटेल, असा व्यापक मानसशास्त्रीय आणि तात्त्विक आशयही तिच्यात होता. हे जाणून सिबिलच्या परवानगीने हा यातनामय प्रवास वाचकांसमोर आणला.
अंगावर शहारे उमटवणाऱ्या, भोवळ आणणाऱ्या विलक्षण घटनांची ही अनन्यसाधारण कहाणी उलगडून दाखवताना फ्लोरा ऱ्हेटा श्राइबर ह्यांनी सतत अकरा वर्षं चाललेल्या मनोविश्लेषणाशी संबंधित कागदपत्रांचा बारकाईने धांडोळा घेतला. एकूण २३५४ सत्रांमध्ये डॉ. विल्बुरांनी घेतलेली दैनंदिन टिपणे आणि त्यांची ध्वनिमुद्रणे; किशोरवयापासून विश्लेषणाच्या पहिल्या वर्षापर्यंतच्या काळातल्या सिबिलच्या दैनंदिन्या आणि पत्रे; घरातल्या व रुग्णालयातल्या नोंदी; डोर्सेट मंडळी विलो कॉर्नर्समध्ये रहात होती, त्या काळातली वर्तमानपत्रे आणि नगरपालिकेतील नोंदी अशा सगळ्यांचा त्यात समावेश होता.
या मुळ इंग्रजी पुस्तकाचा माधवी कोल्हटकर ह्यांनी केलेला मराठी अनुवाद वाचतांना कुठेही अडखळणं होत नाही. वैद्यकीय परिभाषेचेही योग्य शब्दांतर झाले असून राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित करुन वाचकांसाठी संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून दिला आहे.