दुर्गा भागवत

दुर्गा भागवत 
(१० फेब्रुवारी १९१०- ७ मे २००२ ). 
श्रेष्ठ मराठी लेखिका लोकसंस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक समाजशास्त्र, मानववंशशास्त्र व बौद्धधर्म यांच्या अभ्यासक आणि लेखन-विचार-स्वातंत्र्याच्या झुंजार पुरस्कर्त्या. 

संशोधनपर वैचारिक लेखनाने दुर्गाबाईंनी लेखनास प्रारंभ केला. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, लोकसाहित्यशास्त्र या विषयांवरील त्यांचे लेखन मुख्यतः इंग्रजीत आहे. भाषाशास्त्रावरील ए डायजेस्ट ऑफ कम्पॅरेटिव्ह फिलॉलॉजी (१९४०) बौद्ध व जैन धर्माच्या अभ्यासात हाती आलेल्या प्रेमकथांच्या अन्वयार्थांवर आधारित रोमान्स इन सॅक्रिड लोअर (१९४६) मानववंशशास्त्राचे परिचायक ए प्राइमर ऑफ अँथ्रॉपॉलॉजी (१९५०) भारतीय लोकसाहित्याच्या संशोधनावर आधारित ॲन आउटलाइन ऑफ इंडियन फोकलोअर (१९५६) व रिडल इन इंडियन लाइफ, लोअर अँड लिटरेचर (१९६६) हे त्यांचे काही इंग्रजी ग्रंथ. 

त्यांचे बरेचसे महत्त्वाचे लेखन लेख रूपांतही आहे. 

हिंदुइझम अँड इटस् प्लेस इन द न्यू वर्ल्ड सोसायटी (१९४७) हा डॉ. केतकरांच्या समाजशास्त्रीय ग्रंथाचा दुर्गाबाईंनी केलेला अनुवाद होय.पाली जातकथांच्या आधारे त्यांनी जातककथा मराठीत आणल्या (सिद्धार्थ जातक). हेन्री डेव्हिड थोरोच्या ग्रंथाच्या वॉल्डनकाठी विचार विहार (१९६४) व चिंतनिका (१९६८) या अनुवादांतून तसेच ऑगस्ट डलर्थेलिखित थोरोच्या चरीत्राच्या अनुवादातून (काँकॉर्डचा क्रांतीकारक, १९६९) त्यांनी या अमेरिकन तत्त्ववेत्त्याचे जीवनकार्य व विचार मराठीत आणले. 

पैस म्हणजे दुर्गाबाईंच्या ललितलेखनाचा एक उत्कर्षबिंदू आहे. व्यासपर्व (१९६२) ही त्यांची आणखी एक कसदार निर्मिती. महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखांचा व त्यांच्या जीवनाचा सर्जक अन्वयार्थ लावणारे हे व्यासपर्व अलौकिकतेचा, अमानुषतेचा मानुषतेशी दुवा जोडून एका विशाल अनुभूतीचा प्रत्यय घडवते.आणिबाणीच्या काळात दुर्गाबाईंनी लेखन विचारस्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केला व त्यासाठी कारावासही पतकरला.कराड येथे  १९७५ च्या एक्कावन्नाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्यांच्या पैस ह्या ग्रंथास  १९७१ चा साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.