📚सिंहासन -
लेखक - अरुण साधू
मराठी साहित्यातील मैलाचा दगड समजली जाणारी ही कादंबरी प्रसिद्ध होऊन चार दशकांपेक्षाही जास्त कालावधी ऊलटून गेलाय. काळाच्या प्रवाहात आता पात्रांची नावे दुसरी असतील, प्रवृत्ती मात्र तीच...
परंतु त्या वेळचा दिगू टिपणीस हा पत्रकार आत्ता क्वचितच दिसतो..बातमी छापायची की नाही हे मी ठरवणार असं मुख्यमंत्र्यांना सुनावणारा..
अर्थमंत्री राजीनामा देणार ही बातमी बाहेर आल्यावर सुरु झालेलं गटा तटाचं शक्तिप्रदर्शनाचे खेळ.. विरोधी गटातील आमदारांना जुन्या अडचणीत आणणाऱ्या प्रकरणांची करून दिलेली जाणीव, चौकशी थांबवुन, दडपून त्यावेळी कसं वाचवलं याची करून दिलेली आठवण...
खरंतर अर्थमंत्र्यांनाच मुख्यमंत्री व्हायचे वेध लागलेले आहेत त्यासाठी आपल्याला किती आमदारांचा पाठिंबा आहे याची चाचपणी करतानाच काही वरिष्ठ नेत्यांनाही आपली ताकद आजमावून घ्यावीशी वाटते.
सत्ता आणि सत्तेची लालसा भोवती फिरणारे राजकारण,
त्यासाठी टाकले जाणारे डाव-प्रतिडाव, बेरजा- वजाबाक्यांची समीकरणं,
सत्तातुरांनी सत्ता मिळवण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी केलेल्या शह काटशहाच्या खेळ्या,
ह्या धबडग्यात लांबलेल्या पावसाने आलेलं दुष्काळाचं सावट, कोलमडणारा शेतकरी, ग्रामीण आरोग्यसेवांवर विरोधीपक्ष सदनात प्रश्न विचारतोय त्याकडे बघायला एकाही मंत्र्याला सवड कुठली..?
आणि पक्षाध्यक्ष हताश होऊन हा तमाशा बघताहेत, त्यांना कोणी काही विचरीतच नाही. काय होतंय हे त्यांना वर्तमानपत्रातील बातम्या मधूनच समजतंय. ....
चार दशकांपूर्वी प्रसिद्ध झालेली ही कादंबरी जो पर्यंत लोकशाही आहे तोपर्यंत तरी कालबाह्य होणार नाही.