काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा संग्रह करण्याचा छंद असतो. पोस्टाची तिकिटे, बाप्पाच्या मूर्ती,किंवा बापाचे फोटो, नाणी, नामवंतांच्या स्वाक्षऱ्या, जुन्या गाण्यांच्या कॅसेट्स, रेकॉर्ड्स, असं काही काही संग्रह करत असतात.
चंद्रकांत कोकितकर हे ग्रहस्थ साहित्यिकांच्या अक्षरांचा संग्रह करतात.
त्यांच्याकडे आत्तापर्यंत पाचशेहून अधिक साहित्यिकांची पत्रे आहेत.
लहानपणापासूनच त्यांना वाचनाची आवड होती. कौटुंबिक परिस्थिती साधारण असूनही मिळेल तिथे कथा कादंबरी कविता लेख नाटक असं विविध साहित्य वाचन करीत. वाचता वाचता लेखकांना पत्र लिहून आपला अभिप्राय कळवावा अशी इच्छा मनात आली .
कुसुमाग्रजांचा विशाखा वाचल्यावर प्रथम त्यांनी कुसुमाग्रजांना पहिले पत्र लिहिले. महिन्याभरानंतर कुसुमाग्रजांच्या हस्ताक्षरातच त्यांना पत्र मिळाले त्या पत्रावरची तारीख होती ३१ डिसेंबर १९९६.
कुसुमाग्रजांनी त्यांची दखल घेऊन चांगल्या साहित्याचे वाचन करीत रहा असा संदेशही दिला. हर्षभरीत होऊन त्यांनी पुस्तक वाचून झाल्यावर लेखकाला पत्र लिहून पुस्तकावरील अभिप्राय पाठवण्याचा छंद लागला. तेव्हापासून आजतागायत पुस्तक वाचन झाल्यावर ते लेखकांना त्यांचा अभिप्राय पत्र लिहून कळवतात. लेखकही पत्र पाठवून त्यांची दखल घेत कौतुक करायचे. कुसुमाग्रजांनंतर य.दि.फडके, श्री. ना. पेंडसे, ना.स.इनामदार, गंगाधर गाडगीळ, मंगेश पाडगावकर, विंदा, शिवाजी सावंत, आनंद यादव, रत्नाकर मतकरी, रणजित देसाई, पु.भा.भावे, पु ल देशपांडे गो. नी. दंडेकर अशा अनेक मान्यवरांची पत्रे ही त्यांच्या संग्रही आहेत.
पूलंनी त्यांना पाठवलेल्या पत्रात लिहिलय, "हस्ताक्षर संग्रहासाठी पत्र मागितले की माझ्या छातीत धडकी भरते एक तर माझे हस्ताक्षर सतराशेसाठ प्रकारचे येते, हस्ताक्षरावरून माझा स्वभाव निदान वीस पंचवीस प्रकारचा आहे असे ठरवता येईल. "
कविवर्य मंगेश पाडगावकरांनी अत्यंत अर्थ गर्भ अशा ओळी लिहून पाठवले आहेत "ज्यांची हृदय झाडाची त्यांनाच फक्त फुले येतात."
मराठी राजभाषा दिना निमित्ताने लांजा येथे लोकमान्य वाचनालयातर्फे या अक्षर संग्रहाचे प्रदर्शन करण्यात आले.
हा अनमोल असा साहित्याचा खजिना श्री चंद्रकांत कोकितकरांनी आपल्या छोट्याशा घरात संग्रहित केलेला आहे हा खजिना नक्कीच विद्यार्थ्यांना व रसिकांना उपयुक्त व मार्गदर्शक ठरणारा आहे.
श्री चंद्रकांत कोकितकर हे मूळचे कोल्हापूर मधील चंदगड तालुक्यातल्या कुदनूर गावचे. घरच्या गरिबीमुळे बारावीनंतर त्यांना शिक्षण सोडून द्यावे लागले. उदरनिर्वाहासाठी त्यांनी गावातच किराणामालाचे दुकान टाकले पण न चालल्यामुळे ते दुकान बंद करावे लागले. २००८ च्या आसपास ते मुंबईत आले प्रथम त्यांनी सांताक्रुज पूर्व येथील पालिका विभाग कार्यालयाच्या कॅन्टीनमध्ये वेटर म्हणून काम करायला सुरुवात केली.नंतर काही काळ वाॅचमनचे काम केले. आता ते गावी एका कारखान्यात कार्यरत आहेत.
ह्या धकाधकीच्या काळातही त्यांच्यातला वाचक, लेखक जीवंत होता.
सर्वच वाचक लेखक होतातच असे नव्हे, पण कोकितकर याला अपवाद आहेत. त्यांना लेखनाची सुद्धा आवड असून काही नियतकालिकात त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांचं एक कवितासंग्रह ही प्रकाशित झालेला आहे.
शिवाय ते गेल्या काही वर्षांपासून साहित्य समृद्ध असा "ताम्रकाठ " हा दिवाळी अंक संपादन करुन प्रकाशित करतात.
चंद्रकांत कोकितकरांना आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🌹