लेखक - रणजित देसाई
बेळगावला जाताना वाटेवर सुतगट्टी हे गाव लागते. तेथून काकती गावापर्यंतची पंधरावीस मैलांची, अगदी दाट गहिऱ्या जंगलाने वेढलेली वाट सुतगट्टीची बारी म्हणून ओळखली जाते. भर दुपारीही अंधारून यावे असा हा भाग. त्या बारीची, त्या जंगलाच्या आसऱ्याने वाढणाऱ्या बेरड जमातीची ही कथा आहे.
पोटच्या पोराचे हातपाय दुखावले तरी बेरड हळहळणार नाही, पण जंगलातल्या उभ्या झाडावर कुणी अकारण कुऱ्हाड चालवली तर त्याचे डोळे भरून येत; असे बेरडांचे त्या जंगलावर, त्या बारीवर प्रेम. आता ते जंगल तसे घनदाट उरले नाही. बदलत्या काळाच्या सुसाट वाऱ्याने बेरडांचे जीवनही तसे राहिले नाही. सारे काही बदलून गेले आहे-रूपाने, गुणाने. बैलगाड्यांनी केलेल्या चाकोऱ्यांचे पट्टे घेऊन आजूबाजूच्या जंगलराईने अंगावरच्या लाल धुळीने धुंद झालेली आणि शिट्ट्या किंकाळ्यांनी रात्री-अपरात्री जागी होणारी ही बारी आता तोंडाला डांबर फासून रात्रंदिवस मोटारींची घरघर ऐकत निपचित पडून राहिली आहे.
त्या सुतगट्टीच्या बारीची, तिच्या आश्रयाने वाढणाऱ्या बेरड जमातीची ही कहाणी आहे.
बेरडवाडीचा ‘तेग्या’ हा या कादंबरीचा नायक आहे. तरूणपणापासून म्हातारपणाची छाया पडेपर्यंतचे तेग्याचे जीवन या कादंबरीत टप्प्याटप्प्याने आले आहे.नागीवर मन जडलं म्हणून कोणाचीही पर्वा न करता नागीला रात्री पळवून आणतो. पाट लागल्यावर नागी त्याच्याशी एकनिष्ठ राहते. तेग्याचं पुढारीपण, लुटालूट करतांना मारहाण न करण्याची घेतलेली खबरदारी, मागे राहिलेल्या सोबत्यासाठी जीवाची पर्वा करायची नाही हे मुलाला शिकवणारा, दिलेल्या शब्दासाठी भली मोठी संपत्तीच काय तर जीवही द्यायची तयारी असणारा हा तेग्या आणि त्याचे बेरड जातभाई.
सामान्यत: गेल्या अर्ध शतकातली ही कहाणी आहे. पण ही कहाणी तेग्याची असली तरी ती सुतगट्टीच्या बारीतल्या बेरडांच्या जमातीची कथा आहे. किंबहुना या जमातीसारखेच जीवन जगत आलेल्या सर्व दुर्दैवी जमातींची ही जीवनकथा आहे. ज्ञानाचा, संस्कृतीचा किंवा चरितार्थांच्या नव्या साधनांचा स्पर्शही न झालेल्या परिस्थितीत ही जमात पिढ्यान् पिढ्या राहत आली, जगत आली... घनदाट अरण्याच्या अंधाऱ्या अंतरंगात एखादा वटवृक्ष ऐटीने उभा असावा तशी! पण तेग्या ज्या पिढीचा प्रतिनिधी आहे, ती काळपुरूषाच्या अनंत प्रवासातल्या एका विलक्षण वळणावर उभी आहे.
सोबत्यांच्या मदतीने जंगलात लागलेला वणवा विझवायला तेग्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतो तेव्हा फाॅरेस्ट अधिकारी खुष होतात. आकरा वर्षे जेल भोगून आलेला तेग्या ईश्वरला पुढारीपण देऊन स्वतः मागे राहतो. लगेच केंद्रावर ईश्वरचा सत्कार केला जातो.तो हरखून जातो.
तिथे केली जाणारी प्रार्थना, सूतकताई, मिळणारी समान वागणूकची ईश्वरला भुरळ पाडते. तिथे होणाऱ्या भाषणात गोरे गेले, आपलं सरकार आलं, आपण स्वतंत्र झालो, आता सगळे बरोबरीने राहू.. हे ऐकल्यावर त्याला खूप मोठं झाल्यासारखं वाटायचं तो वरचेवर केंद्रात जाऊ लागला.
फाॅरेस्ट गार्ड लाकडं तोडणाऱ्या सगळ्या बायकांकडुन पैसे घेऊन परत पाठवून देतो मात्र ईश्वराच्या बायकोला सोडत नाही, तिच्याकडे काहीच पैसे नसतात म्हणून. तेव्हा तेग्या खवळून फरशी घेऊन जंगलात जायला निघतो, त्याला ईश्वर अडवतो, घरात कोंडून स्वतः केंद्रात जाऊन गुरूजींना सांगतो,
“पाहिलंत! तपश्चर्या वाया जात नसते. हा बेरड! बदला घेणं ही ह्याची वृत्ती! पण त्याच वृत्तीत केवढा फरक पडला. धन्य झालो मी! खरंच, ईश्वरा, , मी धन्य झालो!” हे बोलत असतानाच गुरुजींच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून फाॅरेस्ट गार्डवर कारवाईचे आश्वासन दिले.
इकडे ईश्वरची बायको घरी आल्यावर धाय मोकलून रडत होती.फाटलेले कपडे, विस्कटलेले केस, काय घडलं ते मुकपणे सांगत होते. बायका तिला समजवीत होत्या. आणि तेग्या... हातातल्या फरशीकडे जळजळीत नजरेने बघत होता. जुनी रग अजूनही अंगात होती.. पण दिवस आता बदलले होते.
तेग्याच्या व त्याच्या जमातीच्या जीवनाचे परंपरागत स्वरूप, या जीवनावर आक्रमण करणाऱ्या अनेक बऱ्यावाईट नव्या गोष्टी, आणि तेग्याच्या व या जमातीच्या या परिवर्तनासंबंधीच्या प्रतिक्रिया हे सर्व श्री. रणजित देसाई ह्यांनी हळुवार हाताने पण वस्तुनिष्ठ दृष्टीने रेखाटले आहे.