(२७ मे १९३८).मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक, कवी, अध्यापक, लघुनियतकालिक चळवळीतील एक अग्रणी कार्यकर्ते – देशीविदेशी साहित्याचे पुरस्कर्ते.
यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीची सुरुवात फेब्रुवारी १९५६ पासून झाली. ‘निळे मनोरे’ ही त्यांची पहिली कविता, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रथम प्रकाशित झाली. त्यांनतर विविध नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. १९७० मध्ये मेलडी हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर १९९१ मध्ये देखणी हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. यांच्या कवितेला कोणत्याही एका काव्यपरंपरेत समाविष्ट करणे अवघड आहे. त्यांच्या कवितेत विशाल मानववादाचा उत्कट करुणेचा आविष्कार दिसतो. तसेच त्यांचा अनेक कविता निवेदक ‘मी’ चे आत्मचरित्र सांगणाऱ्या आहेत.
पण त्यांना खरी ओळख मिळाली १९६३ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘कोसला’ या कादंबरीमुळे आणि नंतरच्या त्यांच्या समीक्षालेखनामुळे. कोसला पासून हिन्दूपर्यंत आपल्या प्रत्येक साहित्यकृतीने आणि लेखकाच्या नैतिकतेपासून देशीवादाच्या आग्रहापर्यंत प्रत्येक उक्तीने मराठी साहित्यविश्वात वादाचे मोहोळ उठविणारे भालचंद्र नेमाडे हे प्रखर भाषिक आत्मभान असलेले लेखक आहेत. कोसला या पहिल्याच कादंबरीने मराठी कादंबरी लेखनाची परिमाणेच बदलून टाकली. या कादंबरीतून महाविद्यालयीन तरुणाचे-नायक-पांडुरंग सांगवीकरचे भावविश्व समर्थपणे रेखाटले आहे.
कोसला नंतर १९७५ मध्ये बिढार ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर जरिला, हूल, झूल या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनुभवाचा भाग या कादंबऱ्यात आला आहे. महाराष्ट्राच्या या भागातील जीवनाचे त्यातील भाषाविशेषांसकट चित्रण आहे. आपल्या शैक्षणिक तसच सामाजिक जीवनाचे अंतर्भेदी चित्रण करून वाचकांना अंतर्मुख करायला लावले.
हिंदू ही दीर्घ कादंबरी आहे. नेमाडे यांनी हिंदू संस्कृतीचे केवळ भारतदेशाच्या संदर्भातच नव्हे तर संपूर्ण भारतीय उपखंडाच्या नकाशावर, आपल्या देशी अस्तित्वानिशी मांडलेले आख्यान केवळ अपूर्व आहे. आज उग्र होऊ पाहणाऱ्या हिंदुत्वाच्या विचारधारेला आव्हान देणारा आणि हिंदू या संकल्पनेचाच मूळापासून विचार करायला लावणारा हा व्यापक पट आहे.
नेमाडे जसे समर्थ कादंबरीकार आहेत. तसेच ते समर्थ, परखड समीक्षकही आहेत. अनेक दिग्गज लेखकांवर त्यांनी टीकास्त्र सोडले.
या व्यतिरिक्त त्यांचे अनेक शोधनिबंध, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या साहित्याचे इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मलयाळम्, गुजराती, पंजाबी, उर्दू, उडियामध्ये अनुवाद झाले असून विशेष म्हणजे त्यांच्या झूल आणि हिंदू कादंबरीचे ब्रेल या अंधांसाठीच्या लिपीतही रूपांतर झाले आहे.
त्यांच्या साहित्यसेवेच्या सन्मानार्थ त्यांना ह. ना. आपटे पुरस्कार (१९७६ बिढारसाठी), कुरुंदकर पुरस्कार (१९८७), साहित्य अकादमी पुरस्कार (१९९१), कुसुमाग्रज पुरस्कार (१९९१), बहिणाबाई पुरस्कार (१९९१), महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (२००१), लाभसेटवार फाउंडेशन पुरस्कार (२००३), पद्मश्री (२०११), जनस्थान पुरस्कार (२०१३), साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार (२०१४) इ. अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)