साने गुरुजी

साने गुरुजी : 
( २४ डिसेंबर १८९९– ११ जून १९५०).


अध्यापक, स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक, लोकशाही समाजवादाचे भाष्यकार आणि आंतर-भारती चळवळीचे प्रवर्तक. पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता ह्यांचे निर्मूलन झाले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. १९४६ मध्ये पंढरपूरचे विठ्ठलमंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले आणि त्यांच्या मंदिरप्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला. १९४८ साली त्यांनी साधना हे साप्ताहिक पुण्यात सुरू केले .समाजवादी विचारप्रणालीच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक बंधुभाव वाढीला लागावा व समतेची प्रस्थापना व्हावी, हा त्यामागील हेतू होता. विद्यार्थी (मासिक), काँग्रेस (साप्ताहिक), कर्तव्य (सायंदैनिक) अशी अन्य नियतकालिकेही त्यांनी चालवली. युवकांच्या आणि किसानांच्या संघटना बांधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.पुणे येथे १९४७ साली भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.साने गुरुजींनी कादंबरी, कथा, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र इ. साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले. त्यात बालांसाठी आणि कुमारांसाठी केलेले लेखन ठळकपणे नजरेत भरते. आपल्या मुलांचे आयुष्य उन्नत करण्याची केवढी मोठी अंतःशक्ती आईमध्ये असू शकते, ह्याचा प्रत्यय ह्या पुस्तकातून अत्यंत प्रभावीपणे येतो. श्यामची आईचे अर्धेअधिक यश प्रांजळ, सरळ आणि निश्चल आत्मनिवेदनात आहे. मराठी कादंबरीवर झालेला गांधीवादाचा अनुकूल प्रभाव लक्षात घेता कादंबरी आणि स्मृतिचित्रे यांच्या मीलनरेषेवर उभी असलेली साने गुरुजींची एकमेव कृती श्यामची आई हीच सर्वार्थाने गांधीवादी व अजरामर ठरलेली कृती होय. ‘मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र’ म्हणून वर्णिल्या गेलेल्या ह्या पुस्तकावरून आचार्य अत्रे यांनी काढलेल्या श्यामची आई ह्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट-निर्मितीचा स्वतंत्र भारतातील पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला (१९५४). साने गुरुजींनी मुलांसाठी केलेल्या अन्य लेखनात गोड गोष्टी (भाग १ ते १० १९४१–४५ ), चिमण्या गोष्टी (१९४९) ही पुस्तके विशेष उल्लेखनीय होत. मुलांसाठी पश्चिमी साहित्यातील ⇨टॉमस हार्डी, ⇨मारी कोरेली (१८५५–१९२४), ⇨व्हिक्टर ह्यूगो ह्यांच्या उत्कृष्ट कादंबऱ्यांच्या कथा त्यांनी मराठीत आणल्या. धडपडणारी मुले (दोन खंड, १९३७), आस्तिक (१९४०), क्रांती (१९४०), सती (१९४०), रामाचा शेला (१९४४) ह्या त्यांच्या सामाजिक कादंबऱ्या होत. भारतीय संस्कृती हे विचारांच्या दृष्टीने गुरुजींचे सर्वांत प्रौढ पुस्तक होय. भारतीय संस्कृतीची मूलतत्त्वे समजून घेण्याच्या दृष्टीने हा प्रबंध अत्यंत उपयुक्त आहे. गोपाळ कृष्ण गोखले, शिशिरकुमार घोष, रवींद्रनाथ टागोर, बेंजामिन फँकलिन ह्यांसारख्या थोर व्यक्तींची एकूण १९ चरित्रे त्यांनी लिहिली. त्यांच्या साहित्यात तत्कालीन जनजीवनातील आदर्शवादी व ध्येयवादी उन्मेष स्पष्टपणे प्रतिबिंबित झाले आहेत. ती एका कविहृदयाची निर्मिती होती. त्यांची साधी, सरळ, छोट्या वाक्यांची, खास मराठी मनाचा ठसा असलेली देशीभाषा आहे. ( संदर्भ - मराठी विश्वकोश, यदुनाथ थत्ते)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.