प्रल्हाद केशव अत्रे

प्रल्हाद केशव अत्रे:
 (१३ ऑगस्ट १८९८–१३ जून १९६९). 


मराठीतील अष्टपैलू साहित्यिक, शिक्षणतज्ञ, चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते.. 

चित्रपटसृष्टीचा वाढता प्रभाव मराठी रंगभूमीस अनिष्ट ठरला होता. आर्थिक मंदीमुळेही रंगभूमीचा लोकाश्रय कमी होत होता. नाट्यविषयक अभिरुचीतही परिवर्तन घडत होते. अशा काळात अत्र्यांची मुख्यत: प्रहसनात्मक व विनोदी नाट्यदृष्टी आणि अवनत मराठी रंगभूमीच्या तात्कालिक गरजा यांचा चपखल मेळ बसला. विशेष यशस्वी झालेल्या त्यांच्या एकूण बारा नाटकांपैकी दहा नाटके प्रहसनात्मक व विनोदप्रचुर आहेत. त्या नाटकांत सामाजिक दोषदर्शन व दंभस्फोट आहेत पण उपहास, उपरोध, विडंबन व अतिशयोक्ती या विनोदसाधनांच्या द्वारा ते प्रकट केले आहेत. साष्टांग नमस्कार (१९३३), भ्रमाचा भोपळा (१९३५) व लग्नाची बेडी (१९३६) ही त्यांपैकी काही लोकप्रिय नाटके. 

त्यांच्या "तो मी नव्हेच " या गाजलेल्या नाटकातील लखोबा लोखंडे हे पात्र जणू अजरामर आहे. 

विविध विषयांवर अत्र्यांनी केलेल्या लेखनात लहानमोठी चरित्रे, व्यक्तिदर्शने, मृत्यूलेख, प्रवासवर्णने, वृत्तपत्रीय लेख, साहित्यविषयक लेख आणि भाषणे, शालेय पाठ्यपुस्तके इत्यादींचा समावेश होतो.मी कसा झालो? (१९५३) हे त्यांचे वाङ्‌मयीन आत्मशोधन होय. अत्र्यांनी आपले जीवननाट्य अत्यंत रसाळ व भावपूर्ण शैलीने प्रस्तुत पुस्तकात निवेदन केले असल्याने मराठी आत्मचरित्रपर साहित्यात त्यास विशेष महत्वाचे स्थान आहे. कऱ्हेचे पाणी या पाच खंडांतील (१९६३, १९६४, १९६५, १९६७ व १९६८) विस्तृत आत्मचरित्रात आपली जीवनकथा त्यांनी सांगितली आहे. 

मराठी चित्रपटसृष्टीत पटकथालेखक म्हणून व पुढे स्वतंत्र निर्माते म्हणून अत्र्यांनी महत्त्वाचे कार्य केले.धर्मवीर, प्रेमवीर, ब्रह्मचारी व ब्रँडीची बाटली हे त्यांचे काही लोकप्रिय चित्रपट होत. त्यांच्या श्यामची आई या चित्रपटास राष्ट्रपतींचे सुवर्णपदक (१९५४) व महात्मा फुले या चित्रपटास रौप्यपदक (१९५५) मिळाले. प्रक्षोभक वादांसाठीही अत्रे प्रसिद्ध होते. भा.वि. वरेरकर, श्री. म. माटे, ना.सी. फडके, पु. भा. भावे वगैरे व्यक्तींशी झालेले त्यांचे तीव्र वाद महाराष्ट्रात गाजले होते. अत्र्यांचे व्यक्तिमत्व गतिमान होते. अशा व्यक्तिमत्वाची स्वाभाविक गरज म्हणूनच त्यांचे अनेकांगी कर्तृत्व निर्माण झाले. त्यांची विनोदबुद्धी त्यांच्या सर्व कर्तृत्वक्षेत्रांत आढळते. केशवकुमार या नावाने लिहिलेले झेंडुची फुले हेविडंबनात्मक काव्य एक आगळी उंची दर्शवते.  विनोदकार म्हणूनच ते अधिक लक्षात राहतात. त्यांची लेखनशैली त्यांच्या व्यक्तिमत्वाची निदर्शक असून तिच्यात एक प्रकारचा अस्सल मराठमोळेपणा जाणवतो.


त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा विकास संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात झाला. वक्तृत्व व वृत्तपत्र ही राजकीय कार्याची त्यांची प्रभावी साधने होती. लोकप्रिय वक्ते म्हणूनही अत्र्यांचा लौकिक होता. त्यांचे वक्तृत्व हशा व टाळ्या यांनी गाजत असे.

नाशिक येथे १९४२ मध्ये भरलेल्या सत्ताविसाव्या महाराष्ट्र साहित्य-संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अडतिसावे नाट्यसंमेलन (बेळगाव, १९५५), दहावे मराठी पत्रकार-संमेलन (१९५०) आणि बडोदे, इंदूर व ग्वाल्हेर येथील प्रादेशिक साहित्यसंमेलने यांची अध्यक्षपदेही त्यांनी विभूषित केली होती. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.