( २२ जुन १९०८ - ८ एप्रिल १९९८ ) एक मान्यवर मराठी ग्रंथकार आणि महानुभाव साहित्याचे व प्राच्यविद्येचे साक्षेपी संशोधक व संपादक.कोलते ह्यांनी कवी म्हणून साहित्यक्षेत्रात पदार्पण केले. लव्हाळी हा त्यांचा काव्यसंग्रह. तथापि त्यांचा खरा पिंड संशोधकाचा असून महानुभावीय साहित्य हे त्यांच्या संशोधनाचे खास क्षेत्र होय. भास्करभट्ट बोरीकर : चरित्र व काव्यविवेचन , महानुभाव तत्त्वज्ञान , महानुभावांचा आचारधर्म , श्रीचक्रधरचरित्र, व महानुभाव संशोधन हे त्यांचे महानुभाव पंथाविषयीचे ग्रंथ त्यांच्या गाढ व्यासंगाचे व विवेचकतेचे निदर्शक आहेत. साहित्यसंचार आणि प्राचीन मराठी साहित्य संशोधन ह्या ग्रंथांतून त्यांचे अनुक्रमे अर्वाचीन व प्राचीन साहित्यासंबंधीचे स्फुटलेखन संकलित झालेले आहे. शिलालेखताम्रपटांच्या वाचनातही त्यांना गती आहे.महाराष्ट्राच्या विविध भागांत सापडलेले शिलालेख, ताम्रपट यांचे त्यांनी वाचन केले. त्यांचे विवरण, स्पष्टीकरण केले. हे लेख संस्कृत, प्राकृत, कानडी, मराठी या भाषांमधील होते. या अभ्यासासाठी त्यांनी आवश्यक त्या संदर्भ ग्रंथांचे वाचन केले. ब्राहमी लिपीचा अभ्यास केला. भाषांचा अभ्यास केला. त्यांनी पुराभिलेख तज्ज्ञाला आवश्यक असे ज्ञान मिळवले. कोरीव लेखांचे विवरण करताना प्रखर न्यायनिष्ठा असावी लागते. हे सर्व गुण डॉ. कोलते यांच्याकडे होते. महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाचा आरंभ मौर्यकाळात आणि शेवट देवगिरीच्या यादवकाळात होतो. सातवाहन, वाकाटक काळ, राष्ट्रकूट, पूर्वकालीन चालुक्य, उत्तरकालीन चालुक्य, शिलाहार, तुघलक अशा राजवंशांचे कोरीव लेख त्यांनी अभ्यासले. त्यामुळे इतिहास लेखनात भर पडलेली दिसते. विदर्भ साहित्य संमेलनाच्या गोंदिया येथील अधिवेशनाचे (१९४८) आणि महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या भोपाळ येथील अधिवेशनाचे (१९६७) ते अध्यक्ष होते. ( संदर्भ - विश्वकोश/महाराष्ट्रनायक)