ज्ञानकोश

लेखांक १. 

एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका
ज्ञानकोश - इंग्रजी

लेखक - डॉ. जगतानंद भटकर( समीक्षक, संपादक, भारतीय, जागतिक साहित्य) 


एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका हा जगात प्रसिद्ध असणारा ज्ञानकोश.


 लहानपणी टीव्ही बघताना बरेचदा कुणी तज्ञ वा त्या त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती बोलताना त्याच्या पाठीमागे जाडजूड, आकाराने आणि रंगाने  सारखी असणारी पुस्तकांची चळत दिसायची.आताही दिसते.ती चळत म्हणजे बहुधा ब्रिटानिकाचे खंड असत. 

ज्ञाननिर्मिती हे अखंडपणे चालू असणारे काम.या निर्मितीला दिशा नाही. मध्य नाही वा अंतही नाही. अशा अपरिघीय आणि अकेंद्र्कीय ज्ञानाचे नीट संयोजन आणि मांडणी करून विश्वासाने ते वाचकांसमोर ठेवणे हे कोशाचे कार्य होय. हे कार्य अठराव्या शतकापासून अव्याहतपणे ब्रिटानिकाने केले आहे. जगामध्ये इंग्रजी भाषेत प्रसिद्ध असलेल्या विश्वकोशांमध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका' या कोशाचे नांव विशेष आदर्श कोश म्हणून घेतले जाते. 

इंग्रजी भाषेतील जगातील सर्वात जुना असणारा हा कोश सर्वसमावेशक आणि  विश्वसनीय आहे. २५० वर्षांचा एक समृद्ध इतिहास या कोशाला लाभला आहे. ब्रिटानिका,अमेरिकाना, कोलीयर्स  हे कोश  'डॅडी' कोश मानले जातात. हे कोश बहुखंडात्मक आहेत. 

मराठी भाषेत बहुखंडात्मक असे दोन महत्वाचे कोश आहेत. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा महाराष्ट्रीय ज्ञानकोश (१९१६- १९२८) आणि महाराष्ट्र शासनाचा मराठी विश्वकोश. कोशातील नोंदींची संख्या, नोंदीतील माहितीची अधिग्राह्यता,अचूकपणा, नोंद्लेखकांची तज्ञता, नोंदींच्या शेवटी दिलेली संदर्भ साहित्याची यादी, नोंदींची भाषा यांसारख्या मुद्द्यांचा आधाराने कोशाची गुणवत्ता ठरविली जाते. गुणवत्तेचे हे सर्व निकष ब्रिटानिका हा कोश सिद्ध करतो.

१७६८ ते १७७१ या दरम्यान हा कोश तीन विभागात एडिन्बरो,स्कॉटलंड येथे प्रसिद्ध झाला. या ग्रंथाचे संपादक विल्यम स्मेली होते. अन्ड्रू बेल यांनी या कोशाला ग्रंथस्वरूप दिले व कॉलीन मॅकफारक्वहार यांनी या कोशाचे प्रकाशन केले. या कोशाच्या प्रथम आवृत्तीचे नाव A Dictionary of Arts and Science असे होते. १७७८-१७८४ या काळात या कोशाची द्वितीय आणि तृतीय आवृत्ती प्रसिद्ध झाली. तिसऱ्या आवृत्तीच्या मूळ प्रतीसाठी नोंदी लिहिण्याचे काम प्रथम कोशाबाहेरील अन्य विद्वानांनी केले. 

हा कोश इंग्लंडच्या राजाला अर्पण केला आहे.१९०१ साली या ग्रंथांचे मालकी हक्क अमेरिकेन संस्थेने विकत घेतले. तेव्हापासून हा कोश शिकागो येथील Encyclopedia Britannica Inc.या संस्थेतर्फे प्रकाशित होत आहे. १९व्या शतकात या कोशाच्या नियमितपणे नवीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. विसाव्या शतकात १९७४ ते २०१० या काळात परिष्कृत अशी १५ वी आवृत्ती आली. १५व्या आवृत्तीचे  संपादक रॉबर्ट मॅक्हॅनूरी आहेत. १५ वी आवृत्ती ही खऱ्या अर्थाने जगप्रसिद्ध असणारी आवृत्ती होय. या आवृत्तीपासून New Britannica Encyclopaedia या नावाने ३० खंडात प्रसिद्ध झालेला हा विश्वकोश नावीन्यपूर्ण व क्रांतिकारक ठरला. या कोशाचे तीन विभाग आहेत.

१) मायक्रोपीडिया १२ खंड. या खंडातून १ लाख लघुलेख छापले आहेत. साधारणपणे लघुलेख ७५० शब्दांचे आहेत. 

२) मॅक्रोपीडिया (Macropaedia) या विभागाचे १७ खंड आहेत. यात विविध विषयांवर ४२०० विस्तृत लेख छापले आहेत. 

३) प्रोपीडिया (Propaedia) या विभागाचा एकच खंड असून त्यात मॅक्रोपीडियात आलेल्या समकालीन विषयांवर लेखन आहे. 

सूक्ष्मविभाग,स्थुलविभाग, वार्षिक आणि सुचीखंड असे ब्रिटानिकाचे कोश  विभाग आहेत. सूक्ष्मविभागात कमीत कमी शब्दात त्या त्या घटकाची माहिती दिली आहे. स्थूल विभागात व्याप्तीलेख आहेत,वार्षिकांकात समकालीन विषयावरील नोंदी आहेत तर सुचीखंडामध्ये या सर्व खंडांतील माहितीचे निर्देश दिले आहेत.सुचीखंडातून कुठली नोंद कुठल्या खंडात आणि पानावर आहेयाचा निर्देश मिळतो. या सुचीखंडात ५००,००० निर्देश आहेत . 

या कोशाला जगात मान्यता  मिळाली त्याचे कारण म्हणजे आल्बर्ट आइन्स्टाइन, सिगमंड फ्राइड, हॅन्री फोर्ड, बर्नार्ड शॉ, सर वॉल्टर स्कॉट,टी.इ. लॉरेन्स, जॉन एफ. केनेडी, हक्सले, लिऑन ट्रॉटस्की अशा जगमान्य व्यक्तींनी या कोशात लेख लिहिले आहेत.हे सर्व लेखन विश्वव्यापी आहे. यातील माहितीची व्याप्ती जगातील सूक्ष्मतम घटकांना स्थान देणारी आहे. त्यामुळे हा कोश अभ्यासक, सर्वसामान्य वाचक,विद्यार्थी यांच्या दृष्टीने लक्षणीय ठरला .शिवाय ब्रिटानिकात लेख प्रसिद्ध होणे म्हणजे त्या विषयातील एक शोधनिबंध प्रसिद्ध 

होणे असे प्रमेय बनल्याने या कोशातील लेखन हे फार  कष्टपूर्वक आणि ससंदर्भ केलेले आढळते. त्यामुळे त्यातील  प्रत्येक विधानाला त्यामुळे ताजेपणाचा, सत्याचा,अद्ययावततेचा,विद्वत्तेचा आधार प्राप्त होतो. १९९३ साली या कोश प्रकाशनाला २२५ वर्षे झाली.आज जगात मान्य झालेल्या ५-६ कोशांपैकी हा कोश मानला जातो.

 Britannica Encyclopaedia Inc. ही सर्वात मोठी प्रकाशनसंस्था शिकागो येथे आहे. मुलांना उपयुक्त वाटेल असा Children's Britannica व Crompton's Encyclopaedia असे दोन बहुखंडात्मक कोशही या प्रकाशनसंस्थेने प्रसिद्ध केले आहेत. १९९३ साली हा कोश इलेक्ट्रोनिक पद्धतीने Instant Research System या नावाने CD-ROM वर आला आहे. हा कोश Britannica Instant Research System (CD-Rom) व Britannica Online या नांवाने संगणकावर उपलब्ध आहे. या कोशाच्या ३२ ग्रंथ विभागांतून एकूण ६५, १०० लेख दिले आहेत. मायक्रोपीडियातील एकूण कोशव्याप्तीपैकी १/३ पृष्ठे व्यापतील एवढ्या व्यक्तीनोंदी लिहिल्या आहेत.या नोंदींमध्ये माणसाच्या यशाचा आढावा, त्याच्या यशाचे ऐतिहासिक, बौद्धिक व कलात्मक महत्त्व दिलेले आहे. ब्रिटानिकाचा ग्रंथ आकार, त्याची बांधणी, ग्रंथासाठी वापरलेला टाइप, चित्रे, फोटो, नकाशे, तक्ते, ग्रंथांची भाषा, लेखनशैली या अंगांविषयी बहुसंख्य वाचक समाधान व्यक्त करतात. 

ब्रिटनमधून  (Scotland) हा कोश अमेरिकेत गेलायाबद्दल अनेक ब्रिटिश नागरिक अजूनही संताप व्यक्त करताना दिसतात. वृत्तपत्रांतून यासंबंधी पत्रे प्रसिद्ध होतात.अशा निषेधपत्रांची नोंदही अमेरिकन विद्वानांनी ठेवली आहे. इंग्लंडच्या राष्ट्रीय अस्मितेशी हा ग्रंथ असा जोडला गेला आहे.

 हा  कोश सर्वात जास्त उपयुक्त ठरल्याने त्यातील काही भाग वगळून तो चिनी भाषेत प्रसिद्ध झाला आहे. तैवान चुंग व्हा बुक कंपनीने ChineseLanguage Concise Encyclopedia Britannica या नांवाचा कोश १९८८ साली प्रसिद्ध केला.

जागतिक मनोविश्व हे संस्कृती आणि राजकारण या दोन घटकांनी सातत्याने प्रभावित असते. त्यामुळे जागतिक दृष्ट्या संस्कृती आणि राजकारण यांवर प्रभाव व्यक्ती आणि घटक संज्ञा जाणून घेणे यावर जोर असतो. हीच बाब ब्रिटानिका या कोशाने हेरून जगाचे एक सुस्पष्ट असे चित्र या नोंदीतून उभे केले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर प्रादेशिक भाषामधून लिहिले जात  नव्हते. या कोशाने या विषयातील परिभाषा जगासमोर आणल्या. 

मराठी विश्वकोशाचे संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी अमेरिकेत ब्रिटानिकाच्या संपादक मंडळासमवेत एक बैठक घेतली होती. त्याच धर्तीवर मराठी विश्वकोशाची उभारणी झाली आहे. 

जगात अनेक भाषांमध्ये या कोशाचा आदर्श घेवून कोशनिर्मिती झाली आहे. आज हा कोश संगणकावर उपलब्ध आहे. त्याची एकत्रित अशी वाचक आवृत्तीही प्रकाशित झाली आहे. 


लेखक

डॉ. जगतानंद भटकर

( समीक्षक, संपादक. भारतीय व जागतिक साहित्य) 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.