मराठी विश्वकोश

लेखांक - २  मराठी विश्वकोश
ज्ञानकोश - मराठी

लेखक - डॉ. जगतानंद भटकर( समीक्षक, संपादक, भारतीय, जागतिक साहित्य) 




मराठी विश्वकोश निर्मितीचे कार्य  १९६०च्या दशकापासून सुरु आहे. जाणून घेऊया मराठी विश्वकोशाचा प्रवास....! 

कोशीय लेखन हे भाषेच्या अस्तित्वाचा प्रधान आणि मूलभूत पाया असते. भाषेला मातृभाषा, लोकभाषा आणि व्यवहारभाषा म्हणून जे एक अस्तित्व असतं, ते अस्तित्व ज्ञानभाषा म्हणून परिवर्तित व्हायला कोशीय लेखनाचाच पाया लागतो. याच मुख्य प्रेरणेने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची उभारणी केली. 

मराठी विश्वकोश हा त्यातील एक बृहद् प्रकल्प होय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या प्रकल्पांचे सारथ्य केले. मराठी माणसाला सर्वस्तरीय ज्ञान आणि माहिती मराठी भाषेतून मिळावी आणि त्यायोगे मराठी भाषा समृद्ध व्हावी, हा त्यामागे महत्त्वाचा उद्देश होता. 

१९६० च्या दशकापासून सुरू असणार्‍या या प्रकल्पाचे २० संहिता खंड प्रकाशित झाले आहेत. कोश वाङ्मयात अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा सूचिखंडही प्रकाशित झाला आहे. या २० संहिता खंडांमध्ये विज्ञान-तंत्रज्ञान आणि मानव्यविद्या या दोन विद्याशाखांमधील सर्व विषयांतील घटकांची माहिती देणारे १८४२० लेख प्रकाशित झालेले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच मानव्यविद्येतील अर्थशास्त्र, भूगोल, तत्त्वज्ञान, पाश्चिमात्त्य साहित्य या विषयांवरील लेखन लक्षात घेता हे मराठी भाषेच्या दृष्टीने झालेले अभूतपूर्व कार्य आहे. 

भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये ज्या २२ भाषांचा उल्लेख आहे, त्या भाषांत मराठी विश्वकोशासारखे सर्वसमावेशक, सर्वविषयक संग्राहक आणि परिभाषायुक्त कार्य झालेले नाही. 

शब्दकोश आणि विश्वकोश हे कोशाचे दोन प्रकार. शब्दकोशात शब्दाचे अर्थनिर्णयन केले जाते, तर विश्वकोश घटकांची, स्थलांची, संकल्पनेची, व्यक्तींची, सिद्धांतांची माहिती पुरवितो. 

मराठी भाषेला शब्दकोशाची एक मोठी परंपरा आहे. प्राचीन संतवाङ्मयातील शब्दांचे अर्थनिर्णयन करणारे अनेक कोश उपलब्ध आहेत. शिवाय, श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशासारखा प्रकल्प मराठीचा मानबिंदू म्हणून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातच प्रकाशित केला आहे. मराठीतील कोशीय लेखनाची ही परंपरा लक्षात घेता ज्ञान-विज्ञानाच्या वैश्विक परिप्रेक्ष्यातून सर्वविषयक संग्राहक कोशनिर्मितीची गरज होती. तर्कतीर्थांनी ही बाब लक्षात घेऊन, वैश्विक स्तरावर मान्यताप्राप्त असणार्‍या ‘इनसायक्लोपीडिया ब्रिटानिका’ या कोशग्रंथाच्या धर्तीवर मराठी विश्वकोशाची निर्मिती केली आहे. 

सर्वविषयक संग्राहक कोश तयार करण्यासाठी काही भाषिक आणि संदर्भ सामग्रीचे मोठे आव्हान त्या काळात होते. त्यामध्ये सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा प्रत्येक घटक अंतर्भूत करायचा होता. स्थापत्य अभियांत्रिकी, मानवी वैद्यक, रसायन, भौतिकशास्त्र, तत्त्वज्ञान, कायदा यांसारख्या विषयांवर मराठीतून लेखन करायचे, हे कार्य त्या काळाच्या दृष्टीने कठीण होते. सामान्यत: पाश्चिमात्त्य देशांमध्ये विशेषत: जर्मनी, ब्रिटन येथे या विषयांचे अध्ययन, अध्यापन आणि संशोधन मध्य काळापासून सुरू होते. 

ज्या विद्यापीठाला किमान आठशे वर्षांचा इतिहास आहे, त्या विद्यापीठात कायदा, तत्त्वज्ञान आणि मानवी वैद्यक या विषयांवरच प्राधान्याने अध्ययन होत असे. माहिती मांडण्यासाठीची परिभाषा पाश्चिमात्त्य कोशकारांना उपलब्ध होती. 

मराठी विश्वकोश निर्मितीसाठी तुलनेने परिभाषा ही बाब अवघड होती. यासाठी तर्कतीर्थ आणि संपादक मंडळाने आधी परिभाषा निर्मितीचे कार्य केले. इंग्रजी विश्वकोशाचे वाचन, त्यातील महत्त्वाच्या शब्दांचे संकलन, त्याचे भारतीय आणि मराठीच्या संदर्भात भाषांतर या पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असा परिभाषा कोश मराठी विश्वकोशाने प्रारंभीच निर्माण केला आणि त्या आधारावर लेखनाचे कार्य आरंभिले.सर्व विषयांच्या मांडणीसाठी अधिकृत अशा संदर्भग्रंथाची गरज होतीच. त्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात आले. 

त्या त्या देशातील दूतावासांकडून संबंधित देशातील अधिकृत संदर्भ ग्रंथ मिळविण्यात आले. जागतिक दर्जाची नियतकालिके विश्वकोशात नियमितपणे मिळण्याची सोय केली गेली. प्रत्यक्ष लेखनकार्य करण्याअगोदर जागतिक दर्जाच्या विश्वकोशांचे मूल्यमापन करण्यात आले.कोणत्या कोशाने कोणत्या घटकाला महत्त्व दिले, किती महत्त्व दिले, किती शब्दमर्यादा दिली, त्यानुसार मराठी विश्वकोशात घ्यावयाच्या घटकांची निश्चिती करण्यात आली, शब्दमर्यादा ठरविण्यात आली. मराठी संस्कृती, भारतीय संस्कृती आणि वैश्विक परिप्रेक्ष्य हा घटकमांडणीचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. 

लेखन-समीक्षण आणि संपादन या महत्त्वाच्या बाबीसाठी तर्कतीर्थांसह संपादक मंडळाने विशेष प्रयत्न केले. तो तो विषय, त्या त्या विषयतज्ज्ञांकडूनच लिहिला जाईल, याचे व्यवस्थापन करण्यात आले. या सर्व प्रयत्नांतून विश्वकोशाचे सर्व संहिताखंड निर्माण झाले. तर्कतीर्थानंतर मे. पु. रेगे, रा. ग. जाधव, श्रीकांत जिचकार, विजया वाड यांनी मराठी विश्वकोशाच्या निर्मितीमध्ये विशेष योगदान दिले. विजया वाड यांनी शेवटच्या ३ खंडांचे कार्य मोठ्या गतीने करवून घेतले. वाड यांच्याच प्रयत्नातून माहिती-तंत्रज्ञानाच्या बाबतीत विश्वकोश अधिक लोकाभिमुख झाला. 

१९६० च्या दशकातून गेली सहा शतके विश्वकोश निर्मिती मंडळाचे हे कार्य सुरू आहे. कालखंड मोठा आहे, तरीही मराठी भाषेच्या भाषिक अभिसरणाच्या दृष्टीने याकडे पाहणे गरजेचे आहे. कोशनिर्मिती करत असताना बदलत्या काळाचे प्रतिबिंब त्यात आवश्यक असते. मराठी विश्वकोशाने ही बाब अगत्याने जपली आहे. 

भाषा-परिभाषा निर्मिती, नवीन विषयांची दखल, त्यांचा अंतर्भाव या सर्व बाबींवर विश्वकोशाने कार्य केले आहे. त्यामुळे मराठी विश्वकोशात ज्ञान आणि माहितीच्या संदर्भात एक कालसुसंगतता दिसून येते. 

ज्ञानाची उपलब्धता ही आजच्या काळातील प्रक्रिया वरकरणी सोपी वाटते आणि आहेही. परंतु, ज्ञानाची अधिग्राह्यता आणि विश्वासार्हता याबाबतीत मात्र आपण आजही हतबल आहोत. एका क्लिकवर आपल्याला सगळं मिळतंय. पण जे मिळतंय, त्याच्या संदर्भतेबद्दल साशंकता आहेच. अशाही अवस्थेत ज्ञानाचे अधिग्राह्य आणि विश्वासार्ह संदर्भमूल्य मराठी विश्वकोशाने जपले आहे. हे संदर्भमूल्य त्या त्या काळात मराठी विश्वकोशात लेखन-समीक्षण आणि संपादनासाठी योगदान देणार्‍या तज्ज्ञ लेखकांच्या कष्टसाध्य प्रतिभेनेही साध्य झालेले आहे. 

विज्ञान -तंत्रज्ञान या विभागात डॉ. जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. विजय भटकर, डॉ. बाळ फोंडके यासारख्या मातब्बरांनी योगदान दिले आहे, तर मानव्यविद्या विभागात खुद्द लक्ष्मणशास्त्री जोशी, वि. भि. कोलते, ना. गो. कालेलकर, सरोजिनी बाबर, पु. ल. देशपांडे, आ. ह. साळुंखे, राम शेवाळकर, म. वा. धोंड, दत्ता भगत, यु. म. पठाण, मे. पु. रेगे यांसारख्या प्रतिभावंतांनी योगदान दिले आहे. त्यामुळे मराठी विश्वकोश हे महाराष्ट्रातील या प्रतिभावंतांच्या अस्तित्वाचे एक ज्ञानचित्र म्हणून समोर आले आहे.

२०१५ नंतर झालेल्या एकूण सर्व खंडांचे अद्ययावतीकरण यासंदर्भात विद्यमान संपादक मंडळाने कार्यारंभ केला. त्यासाठी ६० विषयांची ज्ञानमंडळे स्थापन केले. महाराष्ट्रातील सर्व संशोधन संस्था, विद्यापीठे यांना एकेका विषयाचे पालकत्व द्यावे आणि तेथील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विषयाचे लेखन, संपादन आणि प्रकाशन करावे, या पद्धतीने ज्ञानमंडळाची ही संकल्पना राबविण्यात आली. या ज्ञान मंडळाद्वारा ७००० नव्या अद्ययावत नोंदी प्रकाशित केल्या आहेत. 

शालेय विद्यार्थ्यांसाठी कुमार विश्वकोश हा एक प्रकल्पही मंडळाने राबविला आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरण या विषयातील ३ खंड प्रकाशित करण्यात आले आहेत. विश्वकोशाची हे सर्व खंड महाराष्ट्रातील बालभारती केंद्रावर उपलब्ध आहेत. marathivishwakosh.org या संकेतस्थळावरही ही सामग्री उपलब्ध आहे. तसेच मराठी विश्वकोश या अ‍ॅपचे (उपयोजक) लोकार्पणही केले आहे.


लेखक - डॉ. जगतानंद भटकर( समीक्षक, संपादक, भारतीय, जागतिक साहित्य) 

https://play.google.com/store/apps/details?id=io.marathi.vishwakosh

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.