डाॅन क्विक्झोट - मिगेल डे सरव्हॅटिस
अनुवाद - दा. न. शिखरे
मिगेल डे सरव्हॅटिस हे स्पॅनिश लेखक,( १५४७-१६१६) शेक्सपियरला समकालीन. सरव्हॅटिस ने ३० नाटके १२ कादंबऱ्या लिहिल्या. पण अजरामर झाले ते डॉन क्विक्झोट मुळे. ही विनोदी कादंबरी म्हणजे मास्टर पीस ऑफ कॉमिक रोमान्स असे विद्वान ग्रीक साहित्यिकांचे मत आहे. काही टीकाकारांनी तर या कादंबरीच्या जनकाचा गौरव ब्राईटेस्ट जीनियस ऑफ कंट्री या शब्दात केला आहे.
रशियाने टॉलेस्ट्रायच्या वॉर अँड पीस या कादंबरीचा बहुमोल अलंकार बहाल केला, इंग्लंडने जगाला शेक्सपियरच्या नाटकाचा अमोल नजरांना अर्पण केला त्याप्रमाणे स्पेनने जगाला दिलेली साहित्यिक देणगी म्हणजे सरव्हॅटिसची " डॉन क्विक्झोट " ही कादंबरी.
तुर्कांशी ऑस्ट्रेलियाचे जे युद्ध १५७१ साली झाले, त्यात सैनिक म्हणून हा सरव्हॅटिस प्रत्यक्ष लढला आणि त्याला बंदुकीच्या गोळ्यांनी तीन जखमाही झाल्या. त्याच्या पुढील वर्षी त्याने सागरी युद्धात भाग घेऊन सिसिलीच्या व्हाईसरॉयकडून गौरवाचे प्रमाणपत्र मिळवले. तुर्कांनी या सरव्हॅटिसला पकडून अल्जेरियात गुलाम म्हणून पाठवले. तेथून पळून जाण्याचा प्रयत्न त्याने दोनदा केला, पण तो फसला आणि शत्रुने त्याला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्याला दोन हजार फटक्यांची शिक्षाही झाली होती. पण पुढे ती माफ झाली. आयुष्यातील या घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात दिसते.
कैदेतील एकांतातील सूक्ष्म चिंतनाने असेल कादाचित, पण त्याने समाजाची नाडी बरोबर ओळखली आणि समाजातील दोषांवर नेमके बोट ठेवले.
सोळाव्या शतकात सरव्हॅटिसच्या वयाच्या अठ्ठावण्णाव्या वर्षी म्हणजे १६०५ साली डॉन क्विक्झोट या विनोदी कादंबरीचा पहिल भाग प्रकाशित झाला. दुसरा भाग दहा वर्षानंतर आला.
सोळाव्या शतकात मनसबदार सरदार , शिलेदारांचं मोठं प्रस्थ होतं. त्या शिलेदारांच्या प्रणय चेष्टा नाटकी पराक्रम ह्यावर या कादंबरीत चुरचुरीत टीका केलेली आहे. विडंबनाचे शास्त्र मोठ्या कौशल्याने चालवून त्या शिलेदारांचे वेडेचार उजेडात आणले आहेत. केवळ शिलेदारीवरच नव्हे तर तत्कालीन सरंजामशाही व साहित्यावरही त्यांनी चर्चा, चिकित्सा व खरपूस टीका केली आहे.
डाॅन क्विक्झोट हा स्पेनमधील एका खेड्यातील पन्नाशीचा सज्जन शांत वृत्तीचा, उदात्त भावनांचा, परोपकारी विचारांचा गृहस्थ. मानव जातीवर त्याचे अपार प्रेम. कोणाही माणसावरचे संकट दूर करण्यास व त्याच्यावरील अन्याय जुलूम नष्ट करण्यास तो सदैव तत्पर असलेला, त्यासाठीच शिलेदार बनलेला स्वतः बद्दल अवास्तव भ्रामक कल्पना बाळगून असलेला डाॅन क्विक्झोट जितका चांगला वाटतो तितकाच त्याचा मूर्खपणा व अचरटपणा हास्यास्पद व करुणास्पद वाटतो. शिलेदारीवरील ग्रंथ वाचण्याच्या नादापायी आपला जमीन जुमला विकून शिलेदारीवरचे ग्रंथ विकत घेतो व त्याचे सतत वाचन व चिंतन करतो. अन्याय निवारणार्थ अनेक मोहिमा काढतो. नव्या नव्या साहसपूर्ण प्रसंगाच्या शोधार्थ तो कोठेही जाण्यास व कोणतेही संकट अंगावर घेण्यास सज्ज असतो त्यावेळी खऱ्याखोट्याचा विवेक करण्याचे तारतम्य मुळीच राहत नसे. एखादी खानावळ पुराणकालीन किल्ला वाटे, जोरजोराने आवाज करणारी पवनचक्की शत्रूचे ओरडणारे सैन्य असल्यासारखी भासे, शेवपेटीकेतून नेल्या जाणाऱ्या प्रेताच्या जागी कोणी पळवून आणलेली राजकन्या असेल आणि ती बिचारी आपल्या सुटकेसाठी धावा करत असेल असा भास किंवा भ्रम त्याला होई. मेंढ्यांच्या कळपाला शत्रू सैन्य समजून स्फुरण चढे. प्रत्येक मोहिमेत त्याल काही ना काही साहसी घटना घडत आणि त्या आपल्या वीरवृत्तीला व दयावृत्तीला आव्हान देत आहेत असे त्याला भासे. मरतुकड्या घोड्यावर बसलेला डाॅन क्विक्झोट आणि त्याच्यामागे गाढवावर बसलेला त्याचा भेदरट नौकर सॅंको हा चेष्टेचा विषय असे.डाॅनला घरी परत आणण्यासाठी धडपडणारे त्यांचे कौटुंबिक मित्र म्हणजे पाद्री आणि न्हावी ज्या कल्पना लढवतात ते ही तितकेच मजेशीर वाटते. कथानकाच्या ओघात येणारी उपकथानके रसभंग करीत नाही हे विषेश.
केवळ हसविणे एवढेच या विनोदी कादंबरीचे ध्येय दिसत नाही. एका ड्युकने सेंको या सेवकाला एका बेटाचे राज्यपाल पद बहाल केले असता, त्यांनी राज्यकारभार कसा केला, न्याय निवाडा कसा केला हे सारे वर्णन कोणत्याही राज्यकर्त्याला विचार करावयास लावणारे आहे. त्याचप्रमाणे डॉनने त्याला राज्यकारभार विषयक ज्या काही सूचना दिल्या आहेत त्याही विचार करण्यायोग्य आहेत.
खळखळून हसवणाऱ्या अनेक प्रसंगाची गर्दी या कादंबरीत आहे आणि मार्मिकपणे रंगवलेली सुध्दा आहे. मनुष्य स्वभावाची विविधता आणि पात्रांची व प्रसंगाची गर्दी हास्य रसाला उठाव देणारीच आहे. प्रणय प्रसंग ही पुष्कळ आहेत. डॉनच्या तोंडी असलेली उसनी प्रौढ, गंभीर भाषा आपल्या हरिदास पुराणिकांची आठवण करून देणारी आहे. शिलेदारीची पोकळ ऐट आणणाऱ्या सतप्रवृत्त माणसांचा मूर्खपणा लेखकाने चांगलाच रंगविलेला आहे. समाजातील दोषांवर व व्यंगावर तो जसे अचूक बोट ठेवतो, तसेच युद्ध व शांतता या अजूनही न सुटलेल्या जागतिक समस्येचाही शहाणपणाने विचार करतो.
अशा विरोधाभासांनी नटलेल्या, विसंगतीने भरलेल्या पण त्याबरोबरच सूक्ष्म टीकेने व गंभीर विचाराने वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या या कादंबरीला शाश्वत प्रतिष्ठा व लौकिक लाभलेला आहे.
सरव्हँटीसच्या समकालीनांपेक्षा उत्तरकालीनांनी ह्या कादंबरीची विशेष दखल घेतली. विशेषत: स्पेनबाहेर. गद्य महाकाव्याच्या माध्यमातून केलेले भष्ट शिलेदारी युगाचे प्रभावी विडंबन म्हणून ह्या कादंबरीकडे पाहिले गेले. ह्या कादंबरीचे वेगवेगळे अन्वयार्थ लावले गेले. आधुनिक कादंबरीच्या इतिहासात ह्या कादंबरीचे स्थान मोठे आहे. डेफो, फील्डिंग, स्मॉलिट, स्टर्न ह्यांच्या कादंबऱ्यांवर डाॅन क्विक्झोटचा प्रभाव प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे आढळतो. एकोणिसाव्या शतकातील स्कॉट, डिकिन्झ, फ्लोबेअर, डॉस्टोव्हस्की इत्यादींच्या कादंबऱ्यांचेही डाॅन क्विक्झोटशी असलेले नाते जाणवते. सरव्हँटीसने ह्या कादंबरीच्या लेखनाच्या निमित्ताने कादंबरी ह्या साहित्यप्रकाराच्या शक्यतांचा घेतलेला शोध अधिक महत्त्वाचा आहे. सतराव्या शतकापासून ह्या कादंबरीची नाटयरूपांतरे, तिच्यावर आधारलेल्या संगीतिका, नृत्ये इ. रंगमंचावर येत राहिली. चित्रपट, दूरचित्रवाणी ह्या माध्यमांनी ह्या कादंबरीचा उपयोग करून घेतला. पिकासो, गोया ह्यांच्यासारख्या चित्रकारांनाही ह्या कादंबरीने स्फूर्ती दिली आहे. ह्या कादंबरीचे जगातील अनेक भाषांत (पूर्णतः वा अंशतः एकूण साठ भाषांत) अनुवाद झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या भाषांतर योजने अंतर्गत आतापर्यंत जागतिक अभिजात ग्रंथांची भाषांतरे प्रकाशित केली आहेत. त्यापैकी डाॅन क्विक्झोट एक आहे. त्यांच्या संकेतस्थळावर ह्या कादंबरीचे दोन्ही भाग मोफत उपलब्ध आहेत.