लेखांक ३ - मराठी विश्वचरित्र कोश
ज्ञानकोश - मराठी
लेखक - डॉ. जगतानंद भटकर( समीक्षक, संपादक, भारतीय, जागतिक साहित्य)
प्राचीन ते समकालीन काळातील वैश्विक परिप्रेक्ष्यामधील सर्व महान आणि लक्षणीय व्यक्तीचरित्रांची माहिती देणारा मराठी भाषेतील महत्वपूर्ण चरित्रकोश. श्री.श्रीराम पांडुरंग कामत हे या चरित्रकोशाचे प्रमुख संपादक असून सल्लागार संपादक म्हणून सु.र. देशपांडे आणि अ.ना.ठाकूर यांनी यात कार्य केले आहे. रघुनाथ माशेलकर आणि मे.पुं. रेगे या थोर तज्ञांनी या कोशाच्या निर्मितीमध्ये विश्वस्त म्हणून योगदान दिले आहे. विश्वचरित्र संशोधन केंद्र, गोवा संस्थेमार्फत या कोशाचे प्रकाशन झाले आहे. मानवी संस्कृतीच्या इतिहासावर ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे,अशा सर्व स्त्री पुरुष व्यक्तींच्या चरित्ररेखा या कोशात संकलित करण्यात आल्या आहेत. विज्ञान,तंत्रज्ञान,धर्म, साहित्य,कला, क्रीडा ,उद्योग,आणि व्यापार, राजकारण, जागतिक प्रवासी, सांस्कृतिक,सामाजिक जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्या सर्व इतिहासाला ज्ञात असलेल्या व्यक्तींची चरित्रे या कोशात आढळतात. चरित्राबरोबरच मानवी संस्कृतीच्या इतिहासाविषयी माहितीही या कोशात संग्रहीत करण्यात आली आहे. सर्वविषय संग्राहक आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या कुठल्याही कोशाची निर्मिती ही सोपी बाब नाही. अनेक पिढ्या या कमी खर्ची पडतात. राम शेवाळकर यांचे कोशनिर्मिती बद्दल एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे .त्यांच्या मते कोशनिर्मिती प्रकल्प हा अक्रोडाची बाग लावण्यासारखा असतो. अशा कष्टसाध्य कार्यात स्वतःचे अख्खे आयुष्य खर्च करणारे लोक या कोशानिर्मितीच्या इतिहासात दिसतात. मराठी संतानी अनेक ओव्या आणि अभंगांतून काही संतचरित्रांची मांडणी केली आहे. हा मराठीतील चरित्रकोश निर्मितीचा अनोखा प्रयत्न आहे.जागतिक पटलावर ज्ञान-माहितीची देवाण घेवाण व्हावी यासाठी कोश रचले गेले. मात्र चरित्राकोशांची निर्मिती त्या प्रमाणात आढळत नाही. ख्रिश्चन गोटलीप जोखर या जर्मन चरित्रकारांनी संकलित केलेला आल्जिमीजेस गेलेर्टेन लेक्सिकोन (इंग्रजी शीर्षक : जनरल स्कॉलरली लेक्सिकॉन) हा १७५०-५१ साली प्रसिद्ध झालेला जागतिक पातळीवरचा महत्वाचा चरित्रकोश होय. जे. एफ. मीशॉ व एल्.जी. मीशॉ यांनी संकलित केलेला बायोग्राफी युनिव्हर्सल (१८११-२८) आणि जे.सी. एफ. होएफर यांनी संपादित केलेला नोव्हेली बायोग्राफी जनरल (१८५२ - ६६. इंग्रजी शीर्षक - न्यू जनरल बायोग्राफी) हे आणखी दोन महत्वाचे चरित्रकोश होत. अर्थात चरित्रकोश निर्मितीच्या प्रारंभी आंतरराष्ट्रीय पातळीवर या कोशांना विशेष महत्त्व होते.
त्यानंतर डिक्शनरी ऑफ सायंटिफिक बायोग्राफी (१९७०-८१) हा वैज्ञानिक चरित्रकोश तयार झाला. मॅग्रो-हिल मॉडर्न मैन ऑफ सायन्स, मँग्रो-हिल मॉडर्न सायंटिस्ट्स अँड एंजिनिअर्स आणि द बायोग्राफिकल एन्सायक्लोपीडिया ऑफ सायंटिस्ट्स असेही चरित्रकोश प्रकाशित झाले. मॅग्रो - हिल एन्सायक्लोपीडिया ऑफ वर्ल्ड बायोग्राफी (१९७३. बारा खंड) व वेबस्टर्स न्यू बायोग्राफिकल डिक्शनरी (१९८३) हे इंग्रजी भाषेतील दोन प्रसिध्द आणि सर्वाधिक वापरले जाणारे सर्वविषयसंग्राहक विश्वचरित्रकोश आहेत. वेबस्टर्स बायोग्राफिकल डिक्शनरी या चरित्रकोशात गेल्या पाच हजार वर्षांतील व्यक्तीच्या नोंदी आहेत.या चरित्रकोशाची सुधारित आवृत्ती वेबस्टर्स न्यू बायोग्राफिकल डिक्शनरी या नावाने १९८३ साली प्रसिध्द झाली.हा चरित्रकोश जगभर प्रमाणभूत मानला जातो.पौराणिक, ऐतिहासिक, मुत्सद्दी व राजकारणी, उद्योगव्यवसायी,वैज्ञानिक, तंत्रज्ञ, संशोधक, साहित्यिक, कलाकार, क्रीडापटू इत्यादींचे वेगवेगळे विशिष्ट प्रकारचे चरित्रकोशही कालांतराने प्रकाशित होत आहेत. सिध्देश्वरशास्त्री चित्राव यांच्या भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश (१९३२), भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश (१९३७) व भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश (१९४६) या कोशांनी मराठीतील चरित्रकोशांचा पाया रचला.
प्र. न. जोशी यांनी शास्त्रज्ञांचा चरित्रकोश (१९६८) व जागतिक शास्त्रज्ञकोश (१९९१) हे मराठीतील वैज्ञानिकांचे चरित्रकोश संपादित केले आहेत. अर्वाचीन मराठी वाङ्मयसेवक (१९३१) हा खानोलकर यांचा साहित्यिकांचा चरित्रकोश आहे. संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास ( लक्ष्मण दत्तात्रय जोशी, १९३५), क्रांतिकारकांचा चरित्रकोश ( शं. ग. दाते), स्वातंत्र्यसैनिक चरित्रकोश ( न.र. फाटक) असे काही मराठी चरित्रकोश वाचकांसाठी उपलब्ध आहेत. मराठी भाषेत या पलीकडे जावून सर्व विषय संग्राहक अशा चरित्रकोशग्रंथ असावा या प्रेरणेने गोव्याला विश्वचरीत्र संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले. बा.भ. बोरकर हे या मंडळाचे पहिले अध्यक्ष होते. दत्तो वामन पोतदार, सिध्देश्वरशास्त्री चित्राव, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पं. महादेवशास्त्री जोशी, डॉ. उमाशंकर जोशी, प्रभाकर पाध्ये, प्रभाकर माचवे, यदुनाथ थत्ते, बा.द. सातोस्कर, पु. ल. देशपांडे अशा महनीय व्यक्तींचा परामर्श याकामी घेण्यात आला. भारत सरकार ,गोवा सरकार ,समाजातील दानशूर व्यक्ती यांच्या आर्थिक पाठबळातून हा चरित्रकोश आकारास आला आहे. त्यात असंख्य लेखक मंडळीनी योगदान दिले आहे. चरित्र ही एका व्यक्तीच्या संपूर्ण जीविताची वा त्यातील विशिष्ट कालखंडाची कहाणी असते. त्यामुळे सामाजिक व सांस्कृतिक इतिहास जाणून घेण्यास चरित्रकोशाची मदत होते. सर्वविषयसंग्राहक विश्वकोशापेक्षा चरित्रकोशात केवळ व्यक्तीची अधिक तपशीलवार माहिती अपेक्षित असते. चरित्रकोशामुळे सामान्य माणसाला त्यातील व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती मिळते. हा दृष्टीकोन समोर ठेवून या कोशाचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्या बरहुकूम या कोशाचे सहा खंड आजवर प्रकाशित झाले आहेत. मानवी संस्कृतीच्या अंशातही मोलाचे योगदान ज्या व्यक्तीने दिले आहे त्याची दखल या कोशात घेतली गेली आहे. मानवी मनाला खुपदा अपकीर्तीही अस्वस्थ करते,अशा अपचरित्र असणाऱ्या व्यक्तींच्याही नोंदी या कोशात घेतल्या गेल्या आहेत. भारतीय आणि मराठी संस्कृती हा प्राध्यान्यक्रम या कोशातील मांडणीत दिसत असला तरीही मानवी जीवनातील ७४० अंगांचा विचार करून त्यातील प्रत्येक लक्षणीय व्यक्ती या कोशात शब्दबद्ध झाला आहे. पाच खंडांमधून सुमारे १०००० नोंदी या कोशात आल्या आहेत. सहावा खंड हा ज्या व्यक्ती २००० नंतर उदयमान झाल्या त्यांच्याविषयी आहे. शिवाय या सहाव्या खंडामध्ये व्यक्ती नाम सूची दिली आहे. जी वाचकांना नोंद शोधण्यास उपयुक्त आहे.
लेखक - डॉ. जगतानंद भटकर( समीक्षक, संपादक, भारतीय, जागतिक साहित्य)