भारतीय संस्कृती कोश

लेखांक  ४ - भारतीय संस्कृतिकोश
ज्ञानकोश - मराठी


 लेखक - डॉ. जगतानंद भटकर( समीक्षक, संपादक, भारतीय, जागतिक साहित्य) 



भारतीय संस्कृतीची तपशीलवार माहिती देणारा मराठीतील महत्वाचा ज्ञानकोश म्हणजे भारतीय संस्कृतिकोश. 

भारताची संस्कृती ही विविधांगी आहे. काळ, प्रदेश, भाषा,साहित्य या अनेक घटकांनी ती पृथगात्म झाली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या प्रारंभकाळातच या बहुआयामी संस्कृतीचे संवर्धन झाले पाहिजे यासाठी काही संस्थात्मक प्रयत्न करण्यात आले.साहित्य अकादमी, नाट्य अकादमी, ललितकला अकादमी या विविध कलासंस्था भारत सरकारने त्यासाठी निर्माण केल्या. 

आकाराने विशाल मात्र निरनिराळ्या संस्कृतीबद्ध आचारांनी भारतातील असंख्य समूह आपले जीवनयापन करत आहेत. मानव हा सभोवतीच्या निसर्गात किंवा निसर्गातल्या पदार्थांत आपल्या जीवनाला अनुकूल आणि उपयुक्त असे बदल करून किंवा प्रसंगी त्यांच्यावर इष्ट ते संस्कार करून आपली जीवितयात्रा चालवत असतो. अशी एक संस्कृतीची व्याख्या केली जाते. मानव जीवनाच्या अनुकूलतेकडे सातत्याने प्रवास करत आला आहे. या प्रवासाला त्याच्या स्वभाव, प्रदेश, निसर्ग, आचारविचार, तत्त्वज्ञान, कार्य अशा अनेक घटकांनी व्यापलेले असते. हा व्याप अगदी प्राचीन काळापासून ते आज आतापर्यंत कार्यरत असतो. 

भारतीय संस्कृतीचे असे व्यामिश्र तरीही एकसंध असे चित्र कोशात शब्दबद्ध करावे या हेतूने भारतीय संस्कृतीकोशाची निर्मिती करण्यात आली आहे. शीर्षकानुसार भारतीय संस्कृतीतील एकूण एक घटकांची सारबद्ध आणि ससंदर्भ माहिती या कोशात विविध नोंदीतून देण्यात आली आहे.

सांस्कृतिक प्रयत्न म्हणून या कोशाच्या निर्मितीसाठी १९५७ साली भारतीय संस्कृतीकोश मंडळाची स्थापना करण्यात आली. कोशकार्यात मुलभूत कार्य करणारे तज्ञ या मंडळाचे संस्थापक सभासद होते. त्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, डॉ. रा. ना. दांडेकर, श्री. अ. ह. लिमयें, श्री. शं. वा. किर्लोस्कर,श्री. बा. वा. पोतदार, प्रा. न. र. फाटक, श्रीमती दुर्गा भागवत, श्री. वि. पु. भागवत,प्रा. गोवर्धन पारीख, श्री. काशीनाथ नायक, श्री. चि. ग. कर्वे, बा. ग. जगताप,श्री. सि. ग. फडके, श्री. चि. श्री. नातू, श्री. जयंतराव टिळक, डॉ. ग. वि. देसाई, पं. महादेवशास्त्री जोशी, सौ. पद्मजा होडारकर अशा मान्यवरांचा समावेश होता.  

संस्कृत, पाली, हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, तेलुगु, तमिळ, इ. देशी भाषांतील आणि इंग्रजी आणि परदेशी भाषांतील भारतीय संस्कृति-विषयक ग्रंथसंपत्तीचे अवलोकन करून त्या आधारे भारतीय संस्कृतिकोश या नावाने भारतीय संस्कृतीचा व्यापक आणि तपशीलवार ज्ञानकोश मराठी व हिंदी या दोन्ही भाषांत तयार करणे, हा या मंडळाचा उद्देश होता.  सांस्कृतिक विषयांना वाहिलेला एक तपशीलवार व व्यापक कोश निर्माण करण्याचा उद्देश असल्याने हे महत्वाचे कार्य ठरले. 

संघर्ष, समन्वय, सामंजस्य आणि एकात्मता या क्रमाने भारतीय संस्कृती आकारास आली आहे. भारतात वास्तव्य करणाच्या जातीजमातींनी देश-काल-परिस्थितीला धरून आपापल्या सांस्कृतिक आविष्कारांच्या विविध पद्धती निर्माण केल्या आहेत. धर्म, पंथ आचार, विचार, श्रद्धा-संकेत, पूजास्थाने, देवता, यात्रा, उत्सव, व्रते, पर्वे, साहित्य, नृत्य, नाटक, शिल्प चित्र, त्याचप्रमाणे सामाजिक आणि कौटुंबिक चालीरीती, अशा असंख्य प्रकारांनी या विविधतेने विस्तृत रूप धारण केले आहे. भारतीय संस्कृतीचे हे विस्तृत रूप या कोशात पहावयाला मिळते. 

संस्कृतीची निर्मिति, तिचा संचय व एका पिढीतून दुसऱ्या पिढीत, दुसरींतून तिसरीत अशी तिची संक्रांती होत जाणे म्हणजे संस्कृतीची परंपरा होय. संस्कृती ही एका व्यक्तीची नसून ती समाजाची असते. व्यक्तीचें जीवन मर्यादित व अत्यल्प असतें; तर समाजाचे जीवन प्रदीर्घ व मोठ्या प्रदेशावर विस्तारलेलें असतें. संस्कृती ही व्यक्तीच्या आयुष्याची दिशा निश्चित करते; व्यक्ति युगधर्माला अर्थात् देशकालास अनुसरून संस्कृतीचा प्रवाह बदलीत असते. हवा, पाणी, सूर्यप्रकाश या गोष्टी जितक्या सहजतेने मानवाच्या जीवनात सोबत करतात, तितक्याच सहजपणे संस्कृतिही मानवाचे अंतर्बाह्य जीवन व्यापून राहते. या उदात्त विचारांना समोर ठेवून भारतीय संस्कृतीचे संपूर्ण संकल्पनाचित्र या कोशात रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतीय संकृतिकोशाचा पहिला खंड १९६२ मध्ये प्रकाशित करण्यात आला. या कोशाचे एकूण दहा खंड प्रकाशित झाले असून दहावा खंड १९७९ मध्ये प्रकाशित झाला आहे. या दहा खंडांमध्ये एकूण १२७१९ एवढ्या नोंदी प्रकाशित झाल्या आहेत. त्या १४० घटक विषयात विभागल्या आहेत. नोंदीचे स्वरूप सूक्ष्म,दीर्घ आणि व्याप्तीलेख  स्वरूपाचे आहे. वीस वर्ष या विस्तृत काळामध्ये या कोशाच्या निर्मितीचे कार्य चालू होते. धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास अशा विषयांशी संस्कृतीचा सातत्यस्पर्श असल्याने या कोशातील नोंदी ह्या परिपूर्ण आणि आश्वासक आहेत. या कोशाच्या द्वारे भारताच्या विविध सांस्कृतिक परंपरांचें, प्रवाहांचें  साररूप पण सर्वांगीण दर्शन वाचकांना आणि जिज्ञासूंना घडावे, हेच या कोश कार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यास अनुसरूनप्रस्तुत कोशांत पुढील घटकांची तपशीलवार माहिती दिली आहे - विषय पुढीलप्रमाणे - यज्ञसंस्था, वैदिक संस्कार, प्रांतीय व अखिल भारतीय सण व उत्सव, तीर्थे, क्षेत्र व सरोवरें, नद्यांचं माहात्म्य व त्यांचा परिचय, भारतातलीं सुप्रसिद्ध देवस्थानें, प्रायश्चित्तें, अग्नि, जल इ, विविध प्रकारची दिव्ये, देव-देवतांच्या पूजा आणि बलिदाने,शुभाशुभ मुहूर्त, पौराणिक व्रते, अरिष्टनिवारणार्थ विधी,  भारतातील सर्व जातीजमाती, भारतातील सर्व आदिवासी जमाती, जातिसंस्था, तिचा उगम, विकास, अस्पृश्यतेचा इतिहास, निसर्गोपासना,  संत व राष्ट्रपुरुष जन्मोत्सव व पुण्यतिथी, आस्तिक-नास्तिक दर्शनें, पंथोपपंथ, विद्या व कला, स्मृति, पुराणें, उपपुराणें आणि महाकाव्यें, वैदिक, पौराणिक व ऐतिहासिक राजवंश, प्रादेशिक भाषा, त्यांचा विकास, साहित्य व लोकसाहित्य, संस्कृत, प्राकृत, पाली, अर्धमागधी, प्रांतिक भाषासाहित्य, शास्त्रीय नृत्ये व लोक नृत्यें, मूर्तिकला, चित्रकला व तिच्या प्रादेशिक शैली, वेषभूषा व अलंकार, स्थापत्यशैली, शास्त्रीय संगीताचीं, ग्रामीण व आदिवासींची वाद्ये इत्यादी.

भारतीय संस्कृतीचे एक व्यापक चित्र या कोशातून उभे झाले आहे. अभ्यासक,विद्यार्थी आणि जिज्ञासू वाचकांसाठी हा कोश अमूल्य ठेवा आहे.

लेखक - डॉ. जगतानंद भटकर( समीक्षक, संपादक, भारतीय, जागतिक साहित्य) 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.