रामचंद्र चिंतामण ढेरे

रामचंद्र चिंतामण ढेरे  
  (२१ जुलै १९३० – १ जुलै २०१६). 


महाराष्ट्रातील धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती, लोकसंस्कृती, लोकसाहित्य, संतसाहित्य आणि काव्यशास्त्र याविषयी संशोधन करणारे व्रतस्थ संशोधक, अभ्यासक, लेखक आणि संपादक. ढेरे यांच्या ग्रंथनिर्मितीचा प्रवास १९५० पासून सुरू होतो; पण तत्पूर्वी म.म.चित्रावशास्त्रींच्या समर्थ या नियतकालिकातून त्यांनी काही कविता व लेख लिहिले. ढेरे यांचा मूळ पिंड काव्याचा. केसरी व साधना मासिक याचवेळी यामधून स्फुटलेखन केले. रेडिओसाठी सांगीतिका लिहिल्या. १९५० साली त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांचे लघुचरित्र लिहिले. पुढे महात्मा चक्रधर ,नृपनिर्माता चाणक्य  इत्यादी सहा लघुचरित्रे मुलांसाठी लिहिली. १९५२-५३ साली त्यांनी भोर संस्थानच्या शंकराजी नारायण पारितोषिकासाठी नाथ संप्रदायावरती लघुप्रबंध लिहिला. त्याला पुरस्कारही मिळाला आणि येथूनच ढेरे यांच्या शोधकार्यास आणि संशोधनात्मक लेखनाला प्रारंभ झाला, तो शेवटच्या श्वासापर्यंत चालूच राहिला. रा. चिं. ढेरे यांची वाङ्मयसूची लोकसंस्कृतीचे प्रातिभ दर्शन या त्यांच्या गौरवग्रंथात सविस्तर आहे. त्यांच्या ग्रंथांची संख्या जवळजवळ एकशे दहा आहे. यात स्वतंत्र, अनुवादित, आधारित व संपादनेही आहेत. अनेक महत्त्वाच्या ग्रंथांना ढेरे यांनी प्रस्तावना वा पुरस्कार लिहिले आहेत. शरीर व्याधींनी ग्रासलेले, आर्थिक स्वास्थ्य नाही अशा स्थितीत सत्तर वर्षाच्या लेखनप्रवासात त्यांनी जमा केलेली साधने, हस्तलिखिते, पोथ्या व प्रचंड संख्येने दुर्मीळ ग्रंथ पाहिले, तर लक्षात येईल की, ढेरे हेच एक विद्यापीठ आहे.महाराष्ट्र राज्य शासनाचे त्यांच्या वेगवेगळ्या ग्रंथांना नऊ वेळा पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय साहित्य अकादमी हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०) त्यांना देण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा पहिला ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारही त्यांना मिळाला आहे ( संदर्भ - मराठी विश्वकोश )

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.