लेखांक ५ - संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश
ज्ञानकोश - मराठी
( लेखक - डॉ. जगतानंद भटकर समीक्षक, संपादक. भारतीय जागतिक साहित्य)
मराठी साहित्य आणि संस्कृती यांची समग्र आणि विवेचक मांडणी करणारा संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश हा तीन खंडांचा कोशप्रकल्प आहे.
मनुष्यजातीच्या मुखांतून जे जे म्हणून सार्थ व संपूर्ण विधान शब्दरूपाने भूत, वर्तमान व भविष्यकाली बाहेर पडले, तें तें सर्व साहित्य होय अशी इतिहासाचार्य राजवाडे यांनी साहित्याची व्याख्या केली आहे. हा सगळा साहित्य व्यवहार समाजगत असतो. समाजाचे आणि पर्यायाने राष्ट्राचे एक मूल्याधिष्ठित चित्र साहित्य व्यवहारातून प्रकट होते.ही बाब डोळ्यासमोर ठेवून प्रारंभापासून ते आजपर्यंतच्या मराठी साहित्याचा परिचय करून द्यावा या दृष्टीने प्रस्तुत मराठी वाङ्मयकोश या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. साहित्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी, अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचक यांना डोळ्यासमोर ठेवून या कोशाचा आराखडा तयार करण्यात आला. मराठी साहित्यात लक्षणीय असणारे सर्व ग्रंथकार, ग्रंथ, पंथ, संप्रदाय, चळवळी, नियतकालिके, साहित्य-प्रकाशनसंस्था, मुद्रक, वाङ्मयीन प्रवाह, समीक्षेतील संज्ञा इत्यादी विषयीच्या नोंदी या कोशात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
सदानंद भटकळ, जया दडकर, प्रभा गणोरकर आणि वसंत आबाजी डहाके या मातब्बर मराठी साहित्यविषयक तज्ञ मंडळींनी या कोशाला आकार दिला आहे. खरे तर या कोशांच्या निर्मितीमागे एक दु:खार्थ आणि भावनिक प्रेरणा आहे. या वाङ्मयकोशाची मूळ संकल्पना भटकळ फौंडेशन या मराठीतील प्रतिथयश प्रकाशन संस्थेचे विश्वस्त सदानंद भटकळ यांची. साधारणतः १९४० पासून प्रकाशन व्यवसायात कार्य करणारे सदानंद भटकळ यांनी ग.रा.भटकळ यांच्या जन्मशताब्दी निमित्त या प्रकल्पाची आयोजना केली. १९९५-९६ या साली हा प्रकल्प सुरु झाला.मात्र त्याच काळात भटकळ यांना कर्करोगाचे निदान झाले. आलेल्या परिस्थितीशी सामना करत त्यांनी डॉक्टरांशी सल्लामसलत केली आणि आपल्याला जो ही जीवितकाळ मिळेल त्या काळात संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश हा प्रकल्प पूर्ण करावा असे ठरविले. याच प्रेरणेतून हा प्रकल्प पूर्ण झाला. श्रीमती जया दडकर यांनी त्यांना मोलाची साथ दिली. संपादक ,लेखक आणि समीक्षक म्हणून प्रभा गणोरकर आणि वसंत आबाजी डहाके यांनी या कोशाची कार्यपूर्ती केली. प्रभा गणोरकर आणि वसंत आबाजी डहाके हे दोघेही मराठीच नव्हे तर भारतीय आणि जागतिक साहित्याचे प्रगाढ अभ्यासक. दोघांचाही मराठी साहित्यातील प्रत्येक सूक्ष्मतम घटकांचा अभ्यास असल्याने त्यांनी या कोशाला एक कष्टसाध्य अशी सर्वसमावेशकता दिली आहे.
‘संक्षिप्त मराठी वाङ्मयकोशा’चे हे प्रचंड काम तीन खंडांत पुरे केले गेले आहे. मराठी भाषा-साहित्याच्या आरंभापासून इ.स. १९२० पर्यंतच्या कालखंडातील साहित्यविषयक नोंदींचा प्रथम खंड आणि इ.स. १९२० नंतरच्या आजपर्यंतच्या साहित्याविषयीच्या नोंदींचा दुसरा खंड आणि वाङ्मयसमीक्षा-संज्ञाचा तिसरा खंड असे या कोशाचे स्वरूप आहे. वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश या खंडाचा यथावकाश स्वतंत्र परिचय करून देईल.या कोशाच्या निर्मितीसाठी ऑक्सफर्ड कम्पनिजन टु इंग्लिश लिटरेचर आणि केंब्रिज गाईड टु लिटरेचर इन इंग्लिश हे दोन ग्रंथ नजरेसमोर होते.मराठी वाङ्मयकोश खंड पहिला मराठी ग्रंथकार इ.स. १०५०-१८५७ या शीर्षकाचा श्री. गं. दे. खानोलकर संपादित वाङ्मयकोश महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाने १९७७ साली प्रकाशित केला होता.या कोशात केवळ ग्रंथकारांविषयीच्या नोंदी आहेत. त्यामुळे वाङ्मय इतिहास आणि स्वरूपाच्या दृष्टीने या कोशाला मर्यादा होत्या. खानोलकर, वि. ल. भावे, पांगारकर, अ. ना. देशपांडे या प्रभूतिनी मराठी साहित्याचा समग्र इतिहास लिहिला आहे. मात्र त्याचा व्याप केवळ लक्षात घेवून संक्षिप्तपणे वाचकांना हा समग्र इतिहास देता यावा हा हेतू ठेवून या कोशाच्या पहिल्या दोन खंडात मराठी साहित्याचे समग्र चित्र रेखाटलेले आहे.
लेखन, मुद्रण, प्रकाशन आणि वितरण या वाङ्मयव्यवहारातल्या चार पायऱ्या आहेत. चारही पायऱ्यांशी निगडित अशा व्यक्ती आणि संस्थांविषयीच्या नोंदी या कोशात घेतल्या गेल्या आहेत. साहित्यविश्वाच्या पर्यावरणात प्रत्येकाचे काही एक स्थान असते त्यामुळे मराठी वाङ्मयव्यवहाराचे यथार्थ आकलन होण्यासाठी मराठीतल्या एकूण एक लेखनाची नोंद या कोशात घेण्यात आली आहे. प्रत्येक नोंद ही परिपूर्ण असली आहे;परंतु तिचा विस्तार फार नाही,आवश्यक त्या सर्व गोष्टी येथे दिल्या आहेत. ग्रंथकाराचे अथवा साहित्यकृतीचे व्यक्तिमत्त्व मूर्त होईल एवढा मजकूर देवून एक संक्षिप्तता येथे जपली आहे.
दोन्ही खंडांना आमुख म्हणून विस्तृत आणि प्रदीर्घ प्रस्तावना वसंत आबाजी डहाके यांनी लिहिल्या आहेत.मराठी साहित्याचे एक प्रकट आणि विश्लेषक चित्र या प्रस्तावना रेखाटतात. मराठी साहित्य आणि इतिहास या संदर्भात संदर्भ मर्यादा हा एक मोठा विषय आहे. मूळ प्रत, लेखकाचे छायाचित्र अशा मर्यादा टाळून हा कोश अधिकाधिक सचित्र करण्यात आला आहे. अनेक ग्रंथकारांची छायाचित्रे या कोशात पाहायला मिळतात. मराठी साहित्य आणि संस्कृतीचा एक कोशात्म असा परिपूर्ण लेखाजोखा या यातून मांडला आहे. सदानंद भटकळ यांच्या कर्करोगाच्या निदानाने या कोशाच्या निर्मितीला एक भावनिक अंग होते. या कोशाच्या निर्मितीच्या ओढीने त्यांनी त्याकाळात कर्करोगावर मात केली होती.
प्रभा गणोरकर या फार तटस्थ अभ्यासक. कोशाचे कार्य गांभीर्याने आणि सखोल संदर्भ शोधून करायचे या भूमिकेवर त्या ठाम होत्या. सु. रा.चुनेकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोश अभ्यासक. त्यांनी या कोश कार्याबद्दल सकारात्मक मत दिले आहे. मराठी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या आणि जिज्ञासू यांच्यासाठी संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश या कोशाचे हे पहिले दोन खंड अत्यंत मोलाचे आहेत.
( लेखक - डॉ. जगतानंद भटकर समीक्षक, संपादक. भारतीय जागतिक साहित्य)