लेखांक ६ : महाराष्ट्र शब्दकोश
शब्दकोश : मराठी
लेखक - डॉ जगतानंद भटकर ( संपादक, समीक्षक. भारतीय जागतिक साहित्य)
महाराष्ट्र शब्दकोश हा मराठी भाषेतील मराठी - मराठी या स्वरूपाचा महत्त्वाचा कोश होय.
भाषेचे डोळे म्हणजे व्याकरण आणि कोश. कोशाशिवाय भाषेला सार्वत्रिक आणि सार्वकालिक अधिष्ठान आणि सामाजिक पाया मिळत नाही. मराठी मध्ये आज विपुल प्रमाणात शब्दकोश तयार झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र शब्दकोश हा एक महत्वाचा कोश आहे. १९२७ ते १९३९ या कालखंडात हा कोश तयार झालेला आहे. यशवंत रामकृष्ण दाते आणि चिंतामण गणेश कर्वे या महानुभावांनी या शब्दकोशाचे संपादन केले आहे. २०१७ साली वरदा प्रकाशनाकडून एकूण सात खंडांमध्ये या शब्दकोशाची नवी आवृत्ती प्रकाशित केली आहे. सोबत काही अद्ययावत शब्दांचे संपादन करून सोबत पुरवणी विभाग म्हणून आठवा खंडही दिला आहे.
महाराष्ट्र शब्दकोश हा प्रातिनिधिक आणि सर्वसमावेशक असा शब्दकोश आहे. मराठी भाषेत काही महत्वाचे शब्दकोश संपादित करण्यात आले आहेत. दत्तराज यांनी महानुभाव पंथातील साती ग्रंथातील कठीण शब्दांचा कोश केला आहे. हा मराठी भाषेतील पहिला मराठी कोश समजला जातो. कै.राजवाडे यांच्यामते हेमाडपंताने एक मराठी संस्कृत कोश केला होता, मात्र तो उपलब्ध नाही. राजशासनपर शब्दांचा फारसी -मराठी हा शिवकालीन राजव्यवहार कोश प्रसिद्ध आहे. केनेडी आणि मोलस्वर्थ-कँडी यांचे मराठी- इंग्रजी असेही कोश आहेत. हंसकोश हा गोडबोले यांचा संतसाहित्यातील शब्दांचा एक कोश आहे. असे अनेक कोश विसाव्या शतकाच्या प्रारंभी मराठी भाषेत उपलब्ध होते. परंतु एक सर्वसमावेषक मराठी शब्दांचा कोश त्या काळात उपलब्ध नव्हता.
मराठी भाषेत एक महाशब्द्कोश असावा असा विचार १९१७ मध्ये इंदोर येथील महाराष्ट्र साहित्य संमेलनात मांडण्यात आला होता. हा विचार संपादकांना या कोशासाठी प्रेरणादायी ठरला. मराठी भाषेतील प्रत्येक शब्द त्याचा मराठीत अर्थ असे एक सर्वसाधारण स्वरूप या शब्दकोशासाठी योजण्यात आले. पुढे मूळ शब्द, त्याचा ध्वातर्थ, प्रसंग विशेषणे त्याला लाभलेले अर्थ, त्याचे व्याकरणातील स्वरूप, त्याची शब्दजात, उदाहरणासह विशेष अर्थ,अशा पद्धतीने या कोशाची प्रारंभी रचना करण्यात आली.या शब्दकोशाच्या संपादक वर्गाने ग्रांथिक, प्रांतिक,पारिभाषिक आणि व्यावसायिक अशा स्तरातील शब्दांचा शोध घेवून त्याचे संपादन केले. प्रत्येक शब्दाची व्याकरणिक व्युत्पत्ती या शब्दकोशात दिली आहे.
मराठी भाषा आणि साहित्याला एक अभिजात असा इतिहास आहे. या इतिहासापासून ते आधुनिक काळापर्यंत सर्व मराठी साहित्याकृतीतील शब्दांचा संग्रह या कोशात केला आहे. शब्द संशोधनासाठी मराठी साहित्याचा प्रत्येक विभाग संपादकांनी लक्षात घेतला आहे. तत्कालीन परिस्थितीत जे मराठी शब्दकोश उपलब्ध होते त्यामध्ये मराठी भाषक ज्या ज्या प्रांतात राहत असत त्यातील बहुतेक प्रांतातील शब्द शब्दकोशात नसत. पुणे परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषेतील शब्दच अशा कोशांमध्ये असत. त्यामुळे जेथे मराठी भाषा आणि मराठी माणूस वावरतो त्या प्रत्येक प्रांतातील मराठी शब्द या कोशात घेतले गेले आहेत. त्यामुळे याला महाकोशाचे स्वरूप आले आहे. भारतीय आणि जागतिक स्तरावर प्राचीन ते समकालीन या काळाच्या पार्श्वभूमीवर जे शब्दकोश तयार झाले आहेत त्याचा परामर्श या कोशाच्या प्रथम खंडाच्या प्रस्तावनेत घेतलेला आहे. सोबत मराठी भाषेतील शब्दकोश रचनेचे आणि त्यातील शास्त्राचे विस्तृत विवेचन केले आहे.
अचिंत - वि. चिंतारहित ; काळजी नसलेला. 'जें अचिंतां अनाथांचे मायपोट '-ज्ञा.८.१९५. येथे अचिंत या शब्दाची प्रारंभी विशेषण ही जात दर्शविली आहे. आणि नंतर हा शब्द ज्ञानेश्वरीच्या ८ व्या अध्यायातील असल्याचे ओवीसह स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे विस्तृतपणे शब्दाचा अर्थासह सर्व व्याकरणिक आणि उपयोजनात्मक लेखाजोखा या कोशात आलेला आहे. मराठी भाषेत वापरला जाणारा प्रत्येक शब्द हा शब्दकोशात आला आहे. त्याचा मराठी अर्थ प्रथम येथे मिळतो.त्याचबरोबर त्या शब्दाची व्युत्पत्ती ,तो शब्द कोणत्या भाषेतून आला आहे,कोणत्या विद्याशाखेतून आला आहे ही माहिती मिळतो. शब्दाची व्याकरणिक स्थिती या कोशात स्पष्ट केली आहे. शब्दाच्या निर्मितीपासून ते त्याच्या उपयोजनापर्यंतची माहिती या कोशात दिली आहे. मराठी संतसाहित्य हे अपार नित्यनूतन शब्दांची खाण आहे. संतसाहित्यातील असे सर्व शब्द ओवी अभंगासह या कोशात दिले आहेत.
डॉ. जगतानंद भटकर. ( संपादक, समीक्षक. भारतीय जागतिक साहित्य)