लेखांक 11 : Towards Freedom
ज्ञानकोश : इंग्रजी
लेखक - डॉ. जगतानंद भटकर( समीक्षक, संपादक, भारतीय, जागतिक साहित्य)
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील 1937-47 हा गतिशील, निर्णायक काळ.या काळातील इतिहासाची प्राथमिक साधने Towards Freedom या कोश ग्रंथांमध्ये संपादित करण्यात आली आहेत.
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि धार्मिक स्थित्यंतरात इतिहास कळीची भूमिका बजावतो. आपण इतिहासाकडे आधीच एक दृष्टिकोन राखून बघतो; पण इतिहास हा सत्याचा एक केवळ भक्कम दृष्टिक्षेप असतो. एखादा समूह राज्यामध्ये परिवर्तित होत असताना त्या समूहाची सामूहिक नैतिकता, सहचरता आणि त्यांचा संघर्ष भूमिका बजावतो. पुढे राज्याला राष्ट्र म्हणून उभे राहण्यासाठी या संघर्षाचे ऐतिहासिक दृष्टिक्षेपच आधार देतात.भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा परंपरेच्या, तत्त्वाच्या, मूल्यांच्या सामाजिक भानाच्या दृष्टीने विविधांगी आहे. सरतेशेवटी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवायचा या एका उदात्त आणि भव्य उद्दिष्टापाशी येऊन हा लढा थांबत नाही तर भारत म्हणून भारतातल्या प्रत्येक माणसाची सममूल्यता प्रस्थापित करण्यासाठी हा लढा संघर्षरत राहिला आहे . त्यामुळे तळागाळातल्या सर्वसामान्य माणसापासून ते संस्थानिक म्हणून राजपदावर बसलेल्या प्रत्येक माणसाची सममूल्यता या स्वातंत्र्यलढ्याने निर्माण केली त्यामुळे या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाला अनेक आयाम आहेत. पत्रे, आदेश, तार, नियम, उपनियम, जाहीरनामे, ठराव, विधेयक, कायदा, पुरावशेष आणि छायाचित्रे ही इतिहासाची अस्सल आणि प्राथमिक साधने होत.अपवादानेच या साधनावर प्रश्न निर्माण होतात.
भारतीय इतिहासाची अशी अस्सल साधने जनतेसमोर यावीत यासाठी 1973 मध्ये Towards Freedom हा अनेकखंडी ऐतिहासिक साधनांचा कोशप्रकल्प भारतीय इतिहास संशोधन परिषदेने हाती घेतला. भारताचे स्वातंत्र दृष्टीपथात येऊ लागले ते 1935 नंतर. 1937 हे त्यातले अधिक निर्णायक वर्ष. या निर्णायक वर्षापासून ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत 1947 पर्यंत या दहा वर्षाच्या कालखंडातील सर्व ऐतिहासिक दस्ताऐवज एकत्रित प्रकाशित करावेत अशी टुवर्ड फ्रीडम या प्रकल्पाची योजना होती. त्यादृष्टीने पुढीलप्रमाणे त्या संपादकांनी वर्षनिहाय दस्तऐवज संपादित करून प्रकाशित केले आहेत.
टू वर्ड्स फ्रीडम डॉक्युमेंट्स ऑन द मुहमेंट फॉर इंडिपेंडेंस इन इंडिया असे या प्रत्येक खंडाचे शीर्षक आहे. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लेखनामध्ये ज्या मान्यवरांनी योगदान दिले आहे त्या सर्व मान्यवरांवर या खंडांच्या निर्मितीची जबाबदारी टाकण्यात आली होती.
खंडांचे वर्षनिहाय संपादक --
1937 पी. एन. चोप्रा
1938 वासुदेव चटर्जी
1939 मशरुल हसन
1940 के. एन. पणिकर, सव्यसाची भट्टाचार्य
1941 अमितकुमार गुप्ता, अर्जुन देव
1942 बिपीनचंद्र, सलील मिश्र, विसलाक्षी मेनन 1943-44 पार्थसारथी गुप्ता
1946 सुमित सरकार
1947 सुचेता महाजन
यातील 1937 या खंडामध्ये अखिल भारतीय आणि प्रांतीय स्तरावरील प्रमुख राजकीय, आर्थिक आणि सामाजिक-सांस्कृतिक घडामोडी, कॉंग्रेस आणि बिगर कॉंग्रेस मंत्रालयांचे कार्य आणि प्रांतांमधील धोरणे आणि संस्थानांमधील राजकीय क्रियाकलापांची होणारी वाढ यांचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. पुढील खंडांमध्ये अधिक व्यापक आणि विविध चळवळीची की डॉक्युमेंट संपादित करण्यात आली आहेत. काँग्रेस,कम्युनिस्ट,रॉयिस्ट, हिंदू महासभा, कामगार चळवळ, महायुद्धविरोधी चळवळ, प्रांतांतील घडामोडी; शेतकरी, विद्यार्थी, महिला, कामगार आणि स्वातंत्र्यलढा, भारतातील धार्मिक आणि जातीय चळवळी या सर्व घटकांच्या संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे या खंडांमध्ये संपादित करण्यात आले आहेत. दिराष्ट्र सिद्धांत संदर्भातील धार्मिक चळवळी, मुस्लिम लीग अशा संवेदनशील विषयावरील आवेदने, ठराव, पत्रे वाचकांना उपलब्ध होतात. प्रत्येक खंड किमान दोन ते तीन विभागांमध्ये विभागलेला आहे.
पृष्ठसंख्या आणि पृष्ठाचा आकार यावरून हे सर्व खंड एका बृहत प्रकल्पाचा भाग आहे हे लक्षात येते. आधुनिक भारताच्या इतिहासात या संदर्भीय खंडांचे खूप मोठे योगदान आहे. इतिहासाचा एक विवेकी दृष्टिकोन हे खंड आपल्यासमोर ठेवतात आणि अस्पर्शी विषयही नजरेसमोर आणतात.
लेखक - डॉ. जगतानंद भटकर( समीक्षक, संपादक, भारतीय, जागतिक साहित्य)