संताजी घोरपडे
संभाजी महाराजांच्या पाशवी हत्येचे वृत्त आल्यापासून संताजी घोरपडेंच्या मनांत त्यांच्या व आपले पिता म्हाळोजी घोरपडे यांच्या बलिदानाचा बदला घेण्याची आकांक्षा ते बाळगून होते. त्यांनी पाहिले की औरंगजेब बादशहा संभाजी महाराजांचा वध केल्यापासून अजूनही भीमानदीच्या काठी तुळापूर येथेच छावणी करून आहे व येथूनच तो महाराष्ट्रातील गडकोट घेण्यासाठी मोहिमा पाठवत आहे.
या बादशहाच्या छावणीवरच हल्ला चढवावा आणि मोगली आक्रमणाचे केंद्रस्थानच धास्तावून टाकावे अशी अचाट कल्पना संताजीने धनाजीस सुचविली. कारण एक-दोन ठिकाणी छापे घालून व जय मिळवून मराठ्यांचे नीतिधैर्य वाढणार नाही.
त्याप्रमाणे त्यांनी आपल्या फौजा गोळा केल्या व ते शंभु महादेवाच्या डोगरांकडे आले. तेथे ठरले की, बादशाही छावणीवर संताजीने हल्ला करावा व त्याच वेळी फलटण-बारामती भागांत असणाऱ्या रणमस्तखान व शहाबुद्दीन खान या खानांचा समाचार धनाजीने घ्यावा. धनाजीने संताजीच्या मदतीस विठोजी चव्हाण हा दुसरा शूर सेनानी व दोन हजार स्वार दिले. याशिवाय संताजीचे बहिर्जी व मालोजी हे दोन बंधू सोबत होते.
प्रसंगाचे वर्णन करताना मल्हार रामराव म्हणतात–
“त्या समयीं जाधवराव यांस संताजी घोरपडे बोलिले की, “पादशहा याची फौज एक-दोन मुक्कामांवर आली आहे. फलटणचे आश्रयास आपण (धनाजीने) लढाई द्यावी. पाठीवर डोंगर असावा. माझ्याबरोबर दोन हजार स्वार सडेएकांडे निवडक द्यावे. शिवाय माझे पथकानिशी तुळापूरचे मुक्कामी जाऊन बरायबुद पादशाहा यांजवर मी छापा घालतो. (आम्ही) मराठे आहोत असे खाशास (औरंगजेबास) कळवून येतो.” याप्रकारे बोलिले असतां जाधवराव, फार चांगले शाब्बास, असे बोलून घोरपडे यांचे खास पथकाशिवाय दोन हजार निवडक एकांडे व विठोजी चव्हाण असे बरोबर दिले.
संताजीने ही योजना आखण्यापूर्वी मोगलांच्या फौजफाट्याची, त्यांच्या मुक्कामांची, त्यांच्या तंबूतील व्यवस्थेची संपूर्ण माहिती गोळा केली होती. झोपण्याच्या जागा, झोपण्याच्या वेळा, पहारे बदलण्याच्या वेळा, वगैरेंची खडानखडा माहिती त्यांनी आपल्या हेरांकडून मिळविली होती. संताजीने आपल्या स्वारांसह डोंगरांच्या आश्रयाने जेजुरीस येऊन दिव्या घाटाखाली जाऊन झाडींत मुक्काम केला. तेथून मध्यरात्रीचे तुळापूर छावणीस जाताना तीन कोस अलीकडे छबिन्याचे (राम पहाराचे) स्वारांची गाठ पडली. लष्करातील हिंदू सरदार शिर्के-मोहिते यांच्या पथकांतील आपण सैनिक आहोत, पहारा पालटल्याने छावणीत माघारी येत आहोत अशी बतावणी करून त्यांनी छावणीत प्रवेश मिळविला. नंतर निरनिराळ्या ठिकाणी अशीच बतावणी करीत त्यांनी “गुलालबार” या बादशहाच्या मुख्य तंबूकडे जाण्याचा मार्ग मोकळा केला आणि ते मुख्य गोटात शिरले. पहारेकऱ्यांना ठार करून संताजी, बहिर्जी, मालोजी व विठोजी चव्हाण या चौघांनी सर्वांत मध्यभागी उठून दिसणाऱ्या बादशहाच्या तंबूकडे धाव घेतली. परंतु बादशहाच्या डेऱ्याजवळ पोहोचताच त्यांची मोठी निराशा झाली. कारण औरंगजेब बादशहा नेमका यावेळी आपल्या डेऱ्यात नव्हता. नाहीतर या वेळीच औरंगजेब ठार झाला असता व मोगलांची दक्षिणेतील मोहीम संपुष्टांत आली असती.
आपली शिकार साधली नाही यामुळे संताजीची निराशी झाली खरी, पण आपण येऊन गेल्याची साक्ष बादशहाच्या चिरकाल स्मरणात राहावी, म्हणून त्यांनी डेऱ्यांचे तणाव तोडले व शामियान्यावरील सोन्याचे दोन कळस काढून घेतले आणि कापाकापी करीत सर्वत्र गोंधळ माजवून संताजी आपल्या साथीदारांसह छावणीतून बाहेर पडला, जे जे कोणी प्रतिकारासाठी धावले ते सर्व कापले गेले.
त्याच रात्री दौडत संताजी घोरपडे व त्यांची फौज सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या झाडीत पोहोचली. गडावर प्रतापराव गुजरांचा मुलगा सिधोजी गुजर हा किल्लेदार होता. तो गडाखाली संताजीस भेटावयास आला. आपल्या फौजेतील जखमींना शुश्रुषेसाठी त्यांच्या स्वाधीन केले व आपल्या लष्करास दोन दिवस विश्रांती देऊन संताजी रायगडाचे संधान राखून त्या रोखाने घाट उतरला. रायगडाला वेढा देऊन बसलेल्या झुल्फिकारखानाच्या लष्करावर विजेसारखा कोसळला. लढाई तेज झाली. मोगलांची मोठी हानी करून व त्यांचे पाच हत्ती पकडून संताजी आपल्या लष्करासह त्वरेने पारघाट चढून वाई साताऱ्यावरून तो राजाराम महाराजांच्या समोर किल्ले पन्हाळा येथे हजर झाला. (सप्टेंबर १६८९).
महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग २
वि. गो. खोबरेकर