चतुरस्र लेखकाची रहस्यमय विज्ञान कादंबरी. मानवाने निर्माण केलेली अण्वस्त्रे काही क्षणात मानवजातीचा विध्वंस करु शकतात. त्याही पेक्षा मोठा धोक्याकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न काही शास्त्रज्ञ करीत असतात. लोकसंख्या वाढीचा प्रश्न अण्वस्रांपेक्षाही मोठा आहे.असे सांगणाऱ्या नोबेलचे मानांकन मिळालेल्या डॉ. मुंजेच्या काळजीकडे लक्ष द्यायला कोणालाही फुरसत नाही. कारण सगळ्यांचे लक्ष अमेरिकेत जगातील सगळ्या देशांच्या प्रतिनिधींच्या शिखर परिषदेत मानव जातीच्या हितासाठी अण्वस्त्रे नाश करण्यासंबंधी चर्चेकडे लागलेले आहे. एका छोट्या कारणांमुळे सुरक्षा यंत्रणांना काळजीत पाडलय. जगात जवळपास सगळ्याच देशांच्या टेलिकम्युनिकेशन नेटवर्क वर सुरुवातीला दशांश सेकंदापासून आता काही सेकंदापर्यंत एक अडथळा येत होता. त्याचं उगमस्थान समजत नसल्याने इंटरपोलने डॉ. मुंजेची मदत मागितली. जगातील कोणत्याही प्रयोगशाळेत पाहिजे त्या उपकरणे त्यांना मिळणार होती. पण डॉ. मुंजे स्वतःच्याच प्रयोगशाळेत अडथळा आणणाऱ्या फ्रिक्वेन्सीचा शोध घेणार होते. या संशोधनाच्या प्रगतीची माहिती घेण्यासाठी इंडियन इंटेलिजन्स चा अधिकारी डॉ. खन्ना त्यांच्या संपर्कात असणार होता. शिखर परिषदेच्या अगोदर झालेल्या पत्रकार परिषदेत डा. मुंजे सगळ्या जगाला सावध करण्याचा प्रयत्न करतात. अणुयुद्धातून जगातली दहा पंधरा टक्के लोकसंख्या वाचु शकेल. परंतु लोकसंख्या वाढीचा स्फोट इतका विलक्षण असेल की त्यातून कदाचित सारी मानवजातच नष्ट होईल. हे परखड शब्द गांभीर्याने ऐकण्याच्या परिस्थितीत कोणीही नसतं त्यांना काळजी असते अनुसराबाबत होणाऱ्या जागतिक शिखर परिषदेची.
इंटेलिजन्स चा अधिकारी डॉ. खन्ना फार अस्वस्थ झालेला असतो . त्याला आलेल्या संशयाचे निराकरण करण्यासाठी तो डॉ. मुंजेंच्या प्रयोगशाळेत चोरून घुसण्याचा प्रयत्न करतो मात्र अपयशी होतो.
ह्यानंतर घटना वेगाने घडत राहतात.पानापानावर उत्कंठा वाढवत धक्के देत वाचकाला खिळवून ठेवण्याची क्षमता या रहस्यमयी विज्ञान कादंबरीत नक्कीच आहे.