लेखांक १२ : क्रीडा ज्ञानकोश
ज्ञानकोश : मराठी
लेखक - डॉ. जगतानंद भटकर( समीक्षक, संपादक, भारतीय, जागतिक साहित्य)
सुरेशचंद्र नाडकर्णी या प्रसिद्ध क्रीडा समलोचकांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेला मराठीतील क्रीडा ज्ञानकोश.
क्रीडा आणि मनोरंजन हे मानवी जीवनाला व्यापून टाकणारे दोन महत्त्वाचे विषय. असा एकही क्षण उलटत नाही किंवा जात नाही जेव्हा समाजामध्ये क्रीडा वा चित्रपट विषयक चर्चा होत नाहीत. एखाद्या क्रीडा प्रकाराचे धावते समालोचन ऐकल्यानंतरही सकाळी उठून वृत्तपत्रांमध्ये याच क्रीडा प्रकारातला थरार अनुभवणे ही आपल्यापैकी सर्वांची एक सुखद सवय. मराठीमध्ये कितीतरी वृत्तपत्र आणि नियतकालिकांमध्ये सातत्याने क्रीडा विषयक लेखन होत आलेले आहे. प्रसिद्ध क्रीडापटूंचे चरित्रे आत्मचरित्रे ही तर सर्वाधिक वाचली जाणारी पुस्तके.
क्रीडाविषयक लेखनासाठी खूप मोठा अवकाश प्रसिद्धी माध्यमे राखून ठेवून असतात. त्यातून मिळणारा पैसा ही गोष्ट वेगळी आहे. मात्र आपल्यातील प्रतिभा, कष्ट,धाडस, देशाभिमान अशा अनेक गोष्टींना प्रत्येक क्रीडा प्रकार न्याय देतो. त्यामुळे क्रीडा प्रकारातील लेखन खूप प्रसिद्ध असते.
सुरेशचंद्र नाडकर्णी हे मराठीतील एक सुप्रसिद्ध समालोचक. सर्व क्रीडा प्रकारांची संपूर्ण माहिती एका पुस्तकात देता यावी या हेतूने त्यांनी क्रीडा ज्ञानकोश या कोशाची निर्मिती केली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यांच्याकडून 1989 मध्ये या कोशाचे प्रकाशन झाले.
ऑलम्पिक आणि विविध जागतिक क्रीडा स्पर्धांमधील जवळजवळ सर्वच खेळांविषयीची माहिती या क्रीडा ज्ञानकोशात देण्यात आली आहे. त्या क्रीडा प्रकाराचा इतिहास, त्याचे नियम उपनियम, त्यातील प्रसिद्ध खेळाडू, प्रसिद्ध स्पर्धा अशी वर्णनपर माहिती या कोशात वाचायला मिळते.
स्वतः लेखक क्रीडा समालोचक असल्यामुळे त्या त्या खेळातील छोट्या छोट्या घटक उपघटकांची माहिती त्यांनी यातील लेखांमध्ये जोडली आहे. क्रिकेट विषयीची माहिती देत असताना एकूण 40 नियम त्यांनी यात नमूद केले आहेत. हे सर्व नियम क्रिकेटमध्ये घडणाऱ्या प्रत्येक कृतीशी निगडित आहेत.
साधारणता मराठीमध्ये क्रीडा प्रकारातील वेगवेगळ्या परिभाषा उपलब्ध नाहीत.मात्र नाडकर्णी यांनी इंग्रजी आणि त्याचा मराठी प्रतिशब्द देऊन मराठी वाचकांची भक्कम सोय केली आहे. प्रत्येक खेळाच्या मैदानाच्या आकृत्याही या लेखांसोबत दिल्या आहेत. केवळ माहिती द्यावी या उद्देशाने या कोशात नोंदी येत नाहीत तर त्या क्रीडा प्रकाराची शास्त्रीय माहिती नाडकर्णी यांनी येथे दिली आहे. एखाद्या क्रीडा प्रकारातील खेळ बघत असताना त्यातील नियम उपनियम प्रेक्षकांना माहीत नसल्यास त्या खेळातील थरार अनुभवता येत नाही. या कोशातील विस्तृत लेखांचे महत्त्व असे की, हे लेख वाचल्यानंतर तो क्रीडा प्रकार बघत असू तर आपला आनंद द्विगुणीत होतो. आपल्याला तो खेळ अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. प्रेक्षकांसाठी तर हा कोश उपयुक्त आहेस पण त्याचबरोबर खेळाडूसाठी एक गुरुकिल्लीच आहे. पंच,सामनाधिकारी,आयोजक या घटकांसाठीही या कोशातून उपयुक्त माहिती मिळते.
क्रीडा प्रकार लक्षात घेऊन यातील लेखांची योजना केली आहे. या कोशामध्ये स्वतंत्रपणे खेळाडूंविषयी माहिती येत नाही. लेखन मनोरंजक करण्यापेक्षा अधिक शास्त्रीय आणि माहितीपर असल्याने हा कोश क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
लेखक - डॉ. जगतानंद भटकर( समीक्षक, संपादक, भारतीय, जागतिक साहित्य)