📚 कशीर - सहाना विजयकुमार
अनुवाद - उमा कुलकर्णी
कशीर म्हणजे कशुर भाषेत काश्मीर.
काश्मीरच्या ९० च्या दशकातल्या जळजळीत वास्तवाला हात घालत या कादंबरीची कथा पुढे जाते.त्यावेळी झालेले काश्मिरी हिंदुंचे निर्मम हत्याकांड आणि पलायन, काश्मिरच्या प्रगतीला अडथळा आणणाऱ्या कलम ३७० चा विस्तृत विवेचन केले आहे. सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते माध्यमांना हाताशी धरून राष्ट्रीय मुद्दा आपल्याला हवा तशा पध्दतीने आणि हव्या तेवढ्या प्रमाणातच जनतेच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतात. हे ही दिसतं.
अभ्यासक विचारवंत नरेंद्र टिव्ही चॅनलवर चर्चा सत्रात कलम ३७० काश्मिरच्या प्रगतीला मोठा अडथळा ठरतयं हे सांगत असतांना तूम्ही तिथे कधी गेला आहात का अशी विचारणा झाल्यावर ते काश्मिरला जाण्याचं ठरवतात. काही दिवसांपूर्वीच त्यांचा आर्मीत असलेला धाकटा भाऊ अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेला असतो.घरच्या लोकांचा विरोध डावलून ते काश्मिरला जातात. तिथे त्यांची राहण्यासाठी व्यवस्था संजीवजीकडे केलेली असते ज्यांचं घर दंगलीत उध्वस्त झालेलं असतं.
त्याच कुटुंबाच्या परिचितांचे कैलाशचे तर घरासह संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालेले असते. घरासमोर अनेक वर्षांपासून राहणाऱ्या बशीर अहमद या जुन्या मुस्लिम मित्राचा मुलगा त्यांच्या मुलाला गोळ्या घालून मारतो आणि त्यांच्या तरुण मुलीला पळवून घेऊन गेलेला असतो. अनेक जणांंनी केलेल्या अत्याचारामुळे ती मरते. त्याच्या आईचा त्याला पाठिंबा असतो. अंगावर काटा आणणाऱ्या या घटना ऐकून ते विचलित होतात. या दहशतवादापासून दूर असलेला त्यांचा तरुण ड्रायव्हर आणि दहशतवाद्यांपासूनच सैन्याने वाचवलेला त्याचा मित्र जो अगोदर मौलवींच्या सांगण्यावरून हिंदूवर दगडफेक करीत होता आणि आपला फक्त वापर होतो आहे हे ज्याच्या लक्षात आलेल्ं आहे अशा दोघांकडे बघून, आणि पुरातन वेदांन्तात आजच्या समस्येचं उत्तर शोधणारे हृदयनाथ पंडित भेटल्यावर त्यांना आशेचा किरण दिसतो. बशीरला सुध्दा आपल्या मुलाच्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागतो.
कथानक अत्यंत प्रवाही मनाची पकड घेणारे असून काश्मिरचा ऐतिहासिक व सांस्कृतिक इतिहास वाचतांना लेखिकेने संशोधनासाठी घेतलेली मेहनत जाणवते. व काश्मिरच्या सद्यस्थितीला एकट्या नेहरुंना जबाबदार ठरवणे, या दोषारोपातून पटेलांना वगळणे व कलम ३७० काढल्याशिवाय गत्यंतर नाही ह्या विधानांच्या पुनरुक्तीने हा संवेदनशील विषय हाताळतांना लेखिकेच्या तटस्थ पणाची शंका येते. ही शंका खरी आहे की नाही हे ज्याचे त्याने ठरवावे.
एस एल भैरप्पा ह्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत केलेली टिका प्रचारकी थाटाची वाटते.
कन्नड भाषेत ही कादंबरी २०१८ साली प्रकाशित झाल्यावर लगेच अनुवाद प्रसिद्ध होणे, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लगेच काश्मिरमधील कलम ३७० रद्द करणे हा कदाचित योगायोग असावा.