वादळमाथा ते १९६५ भारत पाक युध्द

वादळ माथा ते १९६५ भारत पाक युध्द

 - राम प्रधान



कै यशवंतराव चव्हाण ह्यांना दिल्लीत बोलवलं गेलं तेव्हा देश चीनच्या आक्रमणामुळे एका वादळात सापडला होता. राजकीय झंजावातात नेहरूंचे नेतृत्व हिंदकळत होते. नेफा आघाडीवर लष्करी नामुष्की पदरात पडली होती. अशा अवघड परिस्थितीत यशवंतरावांना संरक्षण मंत्री बनवले गेले.

हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री या शब्दात महाराष्ट्राने त्यांना निरोप दिला. दिल्लीत दाखल झाल्यानंतर या सह्याद्रीला काय म्हणून व्यथा सहन कराव्या लागल्या याची जाणीव जनतेला झाली नाही. यशवंतरावांनी सर्व व्यथा सहन केल्या आणि एका वर्षात पंडित नेहरूंचा विश्वास व दिल्लीत आपले विशिष्ट स्थान प्रस्थापित केले. 

 ज्या दिवशी यशवंतरावांनी संरक्षण मंत्री पदाची शपथ घेतली त्याच रात्री चिनने एकतर्फी युध्दबंदी जाहीर केली होती. 

आपल्या कारकिर्दीत यशवंतरावांनी चिन कडून झालेल्या नामुष्कीनंतर मनोधैर्य खचलेल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचे व सैन्याचे मनोबल वाढवण्या सोबतच त्यांनी संरक्षण खात्यात अनेक बदल केले. लष्कराला आधुनिक शस्राने सज्ज करताना प्रसंगी विरोध पत्करून आपल्या मतावर ठाम राहिले. यासाठी त्यांनी राजीनामा देण्याची सुद्धा तयारी केली होती. हे सगळे बदल दृश्य स्वरूपात १९६५ मध्ये पाकिस्तानने आक्रमण केले तेव्हा जाणवले. त्यावेळी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी त्यांना तोलामोलाची साथ दिली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना संरक्षण क्षेत्राशी काहीही संबंध आला नसताना अचानक मिळालेल्या या जबाबदारीने त्यांनी अभ्यासपूर्वक या खात्याची संपूर्ण माहिती करून घेतली त्यासाठी अनेक पुस्तके वाचावी लागली सगळ्यात मोठी मदत झाली ती ब्रुक्स अहवालाने. चिनी आक्रमणाने आपली दुर्दशा का झाली याचा तो अहवाल होता. 

चिनी आक्रमणासमोर घोर पराभवातून त्यांनी भारताच्या संरक्षण दलांना परत उभे केले होते आणि १९६५ च्या युद्धामध्ये भूसेना आणि वायुसेनेस भारतीय जनतेचा विश्वास आणि आदर परत प्राप्त करून दिला. संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राष्ट्राला दिलेले हे सर्वोत्तम योगदान आहे.

यशंवतरावांचे सचिव म्हणून राम प्रधांनांना दिल्लीची राजकीय परिस्थिती बारकाईने बघता आली. त्यामुळे त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. 

संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण ह्यांची राजकीय कारकीर्दीचे अवलोकन आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.