लेखांक 13 : भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश
ज्ञानकोश : हिंदी
लेखक - डॉ. जगतानंद भटकर( समीक्षक, संपादक, भारतीय, जागतिक साहित्य)
भारतीय चरित्र कोशमंडळ, पुणे यांनी मराठी भाषेबरोबरच हिंदी भाषेत निर्मिलेला अद्वितीय असा भारतीय उपखंडातील प्राचीन व्यक्तीचरित्र कोश.
पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहाच्या आसपास अगदी हमरस्त्यावर सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचं घर आहे. प्रारंभी ती घरावरची पाटी पाहून मी सद्गतीत झालो होतो. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये अत्यंत कष्टसाध्य असे कोशकार्य केले आहे . आपणाला हवे असणारे संदर्भ मिळविण्यासाठी आपण चित्राव यांचा कोश हाती घेतला की मग आपणाला इतर कोशाची गरज पडत नाही. अधिक सखोल, परिपूर्ण, विषयाच्या व्याप्तीचा पूर्ण विचार करून आणि सर्व उपलब्ध संदर्भग्रंथ वापरून त्यांच्या कोशग्रंथात लेखनिर्मिती केली असल्याचे लक्षात येते. भाषा,आशय आणि निवेदन यातली जैविकता कोशकर्त्याला साधावीचं लागते ही बाब त्यांनी कोशरचनेसाठी अधोरेखित केली आहे. भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश (१९३२ परिवर्धित संस्करण, भाग१, १९६८), भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश (१९६७),भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश हे मूलभूत कार्य त्यांनी केले आहे.
मौर्य वंशातील चंद्रगुप्त मौर्य यापर्यंत प्राचीन भारतात होऊन गेलेल्या व्यक्तींची चरित्रे या कोशात देण्यात आली आहेत. वैदिक काळ, पुराण, स्मृती, जैन संस्कृती, बौद्ध संस्कृती, महाकाव्ये आणि प्राचीन भारतीय साहित्यात उल्लेख झालेल्या लक्षणीय व्यक्तींची चरित्रे या कोशात आढळून येतात. एकूण बारा हजार नोंदी इथे घेतलेल्या आहेत. राजा, ऋषी, राणी, देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर, भूत, अप्सरा, राक्षस, राजनितीज्ञ, सूत्रकार, धर्मशास्त्रकार, गोत्रकार अशी वेगवेगळ्या प्रकारची चरित्रे यात आली आहेत. लोकसमूह, जातीसमूह, राज्ये, गणराज्ये या समूहघटकांची माहितीही दिली आहे.
एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून प्राचीन भारतासंदर्भात मूलभूत संशोधन झाले आहे. मॅक्समुलर,ओल्डनबर्ग, रॉथ या विद्वानांनी वैदिक साहित्य; पार्टींजर,हाजरा त्यांनी पौराणिक साहित्य;रामकृष्ण भांडारकर,वासुदेव शरण अग्रवाल यांनी पाणिनीय व्याकरण; राईस डेव्हीड्स यांनी बौद्ध साहित्य
अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मूलभूत संशोधन केले. याच संशोधनसामग्रीचा या चरित्रकोशाच्या निर्मितीसाठी उपयोग करण्यात आला आहे.
इतिहासाचा अभ्यास राजवंश आणि त्यांच्या रक्तवाही लढाया यांच्यापुरताच मर्यादित नसतो तर इतिहासाला मानवी भावभावनांचे त्यायोगे सांस्कृतिक संदर्भांचे एक आवरण असते. या सांस्कृतिक आवरणातील विविध पैलूंचे संशोधनात्मक आरेखन या कोशात झालेले आढळते. प्राचीन भारतातील व्यक्ती विषयी घटनेविषयी कोट्यावधी रुपयांचा प्रश्न कोण बनेगा करोडपती सारख्या व्यावसायिक मंचावर विचारला जातो. सर्वसामान्य माणसाला असे संदर्भ शोधावे कुठे हा नेहमी पडलेला प्रश्न असतो. सामान्य माणसाला महाकाव्य, पुराणे वाचण्याची सवय कुठे? अगस्त्य, अजामीळ, अभिमन्यू, अश्वस्थामा, इंद्र, उर्वशी, कद्रू, गौतम, जरासंध, दुशासन, दृष्टधुम्न, पतंजली, परीक्षित, बलराम, बौद्धायन अशा महत्वाच्या व्यक्तीचरित्र नोंदी या कोशात आल्या आहेत.
प्राचीन भारतीय साहित्य जिज्ञासा राखणारे अभ्यासक संशोधक विद्यार्थी यांच्यासाठी भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश अत्यंत उपयुक्त आहे.
लेखक - डॉ. जगतानंद भटकर( समीक्षक, संपादक, भारतीय, जागतिक साहित्य)